प्रकट दिन: स्वामी समर्थांचे दैवी शिष्य गजानन महाराज; भौतिकदृष्ट्या दोन, पण प्रत्यक्षात एकच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 04:25 PM2024-03-02T16:25:58+5:302024-03-02T16:28:12+5:30

Gajanan Maharaj Prakat Din 2024: स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते, असे अनेकांचे मत असल्याचे सांगितले जाते.

sant gajanan maharaj prakat din 2024 know about gajanan maharaj the divine disciple of shree swami samarth maharaj | प्रकट दिन: स्वामी समर्थांचे दैवी शिष्य गजानन महाराज; भौतिकदृष्ट्या दोन, पण प्रत्यक्षात एकच!

प्रकट दिन: स्वामी समर्थांचे दैवी शिष्य गजानन महाराज; भौतिकदृष्ट्या दोन, पण प्रत्यक्षात एकच!

Gajanan Maharaj Prakat Din 2024: शेगावीचेगजानन महाराज यांचा रविवार, ०३ मार्च रोजी प्रकट दिन आहे. माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे पूर्णवतार मानले जाते. स्वामींचे कोट्यवधी भक्तगण आहेत. स्वामींची शिष्यपरंपराही मोठी थोर आहे. याच शिष्यपरंपरेतील एक दैवी शिष्य असे सहज म्हणता येतील, असे शेगावीचे गजानन महाराज आहेत. स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्या चरित्रात अनेक साम्ये आढळतात, असे सांगितले जाते. गजानन महाराज प्रगट दिनी स्वामी महाराज आणि गजानन महाराज या दोघांचे केलेले पूजन, नामस्मरण, आराधना, जप-मंत्र पठण अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानले जाते, असे म्हणतात.

बीडकर महाराज, शंकर महाराज आणि काळबोवा (पुणे), नृसिंह सरस्वती (आळंदी), सीताराम महाराज (मंगळवेढे), साईबाबा (शिर्डी), देवमामलेदार (नाशिक), रांगोळी महाराज (मालवण), श्रीकृष्ण सरस्वती (कोल्हापूर), स्वामीसुत (मुंबई), बाळप्पा महाराज (अक्कलकोट), ब्रह्मनिष्ठ वामनबुवा (बडोदे), धोंडिबा पलुस्कर (पलुस) आणि गजानन महाराज (शेगांव) आदी अनेक नावे अगदी सहजपणे सांगता येतील. या शिष्यवृंदांची चरित्रेही साधकांना सदैव स्फूर्ती देत राहतात, असे सांगितले जाते. 

गजानन महाराज आणि स्वामी समर्थ महाराज

अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते, असे सांगितले जाते. दोघेही परमहंस सन्यासी होते, दोघेही आजानबाहू होते, दोघेही अत्यंत गूढ बोलत. गजानन महाराज स्वामी समर्थ समाधीस्त होण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रगट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली, असे अनेकांचे मत आहे. स्वामी समर्थांप्रमाणे गजानन महाराज हे स्वयंभू होते. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिक दृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते, असे अनेकजण म्हणतात. 

तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो

गजानन महाराज शेगावला येण्यापूर्वी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होते व तिथे त्यांनी आपले बालपण घालविले, असा उल्लेख तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी लिहिलेल्या एका पोथीत आढळून येतो, असे म्हटले जाते. अक्कलकोट स्वामींनी गजानन महाराजांना सांगितले की, तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वर केले तरी आत कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि तिथल्या देव मामेलदारला भेट आणि मग पुढे जा. स्वामींचा आदेश घेऊन महाराजानी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उबंरठव्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या, असे सांगितले जाते.

मी गेलो ऐसे मानू नका| भक्तित अंतर करू नका ||

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नही जिंदा है, असे स्वामी समर्थ महाराजांनी भाविकांना आश्वस्त केले होते. अगदी त्याचप्रमाणे देहत्याग करण्यापूर्वी गजानन महाराज म्हणाले की, मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका | कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच || दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच | तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे || यावरून स्वामी समर्थ महाराजांनी तसेच गजानन महाराजांनी आपल्या भाविकांना आपण कायम तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिल्याचे दिसून येते, असे म्हटले जाते. 

आजही लाखो भाविक गजानन महाराजांच्या चरणी लीन होतात. नतमस्तक होतात. ‘श्री गजानन विजय’ या ग्रंथांचे नित्यनेमाने पारायण केले जाते. प्रकटदिनानिमित्ताने महाराजांचे मनोभावे स्मरण करूया आणि म्हणूया...

।। श्री गजानन, जय गजानन।।

।। गण गण गणात बोते ।।

।। श्री स्वामी समर्थ ।।
 

Web Title: sant gajanan maharaj prakat din 2024 know about gajanan maharaj the divine disciple of shree swami samarth maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.