गजानन महाराज प्रकट दिन: ‘गण गण गणात बोते’ सिद्धमंत्राचा नेमका अर्थ काय? जप करा, पुण्य मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 03:49 PM2024-03-02T15:49:26+5:302024-03-02T15:50:40+5:30
Gajanan Maharaj Prakat Din 2024: गजानन महाराजांचे लाखो भक्त या मंत्राचा जप, जयघोष आवर्जून करतात. याचा नेमका अर्थ जाणून घ्या...
Gajanan Maharaj Prakat Din 2024: शेगावीचेगजानन महाराज यांचा रविवार, ०३ मार्च रोजी प्रकट दिन आहे. माघ वद्य सप्तमी म्हणजे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. श्री गजानन महाराजांचा जन्म कुठे व कधी झाला हे अज्ञात आहे. ‘गण गण गणात बोते’, हा त्यांचा आवडता मंत्र. ते याचा अखंड जप करत असत. गजानन महाराजांचे लाखो भक्त यथाशक्ती हा मंत्र जपत असतात. या मंत्राचा जयघोष केला जातो. मात्र, या सिद्धमंत्राचा नेमका अर्थ काय होतो? जाणून घेऊया...
गजानन महाराज यांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले आहे, असे सांगितले जाते. सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे, याची जाणीव लोकांना झाली, तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला. आपली दुःखे, अडचणी सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी या सिद्धपुरुषाला विनवणी केली. तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला, तो म्हणजे ‘गण गण गणात बोते’! गजानन महाराज कोणत्याही घटनेविषयी सांगताना अचूकपणे ओव्या व ऋचा सांगून त्यांचे स्पष्टीकरण करीत असत. महाराज अंतर्ज्ञानी होते. त्यांचे बोलणे भरभर, परंतु त्रोटक असे. बोलत असताना समोरील व्यक्तीकडे न पाहता भिंतीकडे पाहत किंवा स्वत:मध्ये मग्न राहून ते बोलत असत. अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले.
भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी जाणीव
‘गण गण गणात बोते’ हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे, असे सांगितले जाते. या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला, तर ते समजू शकेल. पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा! प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो केवळ तुमच्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले, तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही.
आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति।। हेच तत्त्व भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक जीव माझाच अंश आहे. या देहात स्थित असलेला जीवात्मा मन आणि पंचभूतांना आकर्षित करून घेतो. म्हणून तर आपण म्हणतो, जिवा शिवाची भेट झाली. किंवा भेटीची आस लागली. ही आस म्हणजेच एका जीवाला दुसऱ्या जीवाप्रती असलेली ओढ. हे प्रेम उत्पन्न होणे, म्हणजेच गजानन महाराजांच्या मंत्रानुसार ‘गण गण गणात बोते’ अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे. ही जाणीव हृदयात नित्य होत राहावी आणि भगवंत भेटीची आस लागावी, म्हणून आपणही गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून यथाशक्ती या सिद्ध मंत्राचा जप केल्यास पुण्य मिळू शकते, असे म्हटले जाते.
।। गण गण गणात बोते ।।