माटी कहे कुम्हार से...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2023 10:14 AM2023-06-04T10:14:34+5:302023-06-04T10:15:26+5:30

कबीरांचा विचार जन्म-मरणाच्या पलीकडचा आहे. आजच्या तारखेला त्यांचा लौकिकार्थाने जन्म आणि मृत्यू झाला असेल पण त्यांचे  दोहे कालातीत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त हा लेख.

sant kabir das remembrance on birth anniversary | माटी कहे कुम्हार से...

माटी कहे कुम्हार से...

googlenewsNext

डॉ. भालचंद्र सुपेकर प्रिन्सिपल कॉरस्पॉन्डंट, पुणे 

कबीर आजही संदर्भहीन होत नाहीत. कारण ते पोथी-पारायणाचा विषय नाहीत तर अनुभवाचा विषय आहेत. ते हृदयाला स्पर्श करत थेट मेंदूत शिरतात आणि तुमच्या जगण्याची परिभाषा बदलून टाकतात. साधे-सोपे शब्द, रोजच्या जीवनातले संदर्भ आणि बोजड तत्त्वज्ञानाऐवजी ‘सिंपल विज्डम’ देणारी भाषा ही कबीरांची अंगभूत वैशिष्ट्य. त्यांचा कुठलाही दोहा आयुष्यभर तुमच्या जीवनात रेंगाळत राहतो.

‘‘माटी कहे कुम्हार से, तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा, मैं रोंदूगी तोहे ।’’

कुंभार आणि मातीचं अगदी साधं उदाहरण कबीर देतात. माती कुंभाराला सांगते की तू मला काय पायाखाली घेशील? एक दिवस असा येईल की, मीच तुला पायाखाली घेईन. मडकं बनविण्याआधी कुंभार बराच वेळ माती मळतो. ती चांगली मळली जावी यासाठी पायाने ती तुडवतो. हाच पायाखाली तुडविण्याचा संदर्भ घेत कबीरांनी हा दोहा लिहिला आहे.

या दोह्यासंदर्भात आणखी एक उपप्रश्न तयार होतो तो म्हणजे माती बोलते का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. माती सगळ्यांशी बोलतच असते. कारण ती सगळीकडेच आहे. ‘माती केली’ याचा अर्थ नकारात्मक असला तरी या मातीत सगळी खनिजं, मूलद्रव्य समाविष्ट असतात, हे आपण विसरतो. ग्रामीण भागात आजही एखाद्याच्या अंत्यविधीला जात असताना किंवा आल्यावर ‘अमक्याच्या मातीला गेलतो’ असं म्हटलं जातं. तर तीच ही माती. 

भौतिकशास्त्राच्या परिभाषेत बोलायचं तर ‘म’टर इज मेड ऑफ एनर्जी’ आणि माती हे ‘म’टर’ आहे म्हणजेच तिच्यातही एनर्जी आहेच. आणखी एक अंत्यविधीनंतर चिताग्नी देणारी व्यक्ती पेटलेल्या चितेभोवती खांद्यावर मडकं घेऊन प्रदक्षिणा घालते. शेवटी ते मडकं पाठीवरून खाली टाकून देते. शरीररूपी घटात बंदिस्त असलेल्या सर्व भौतिक गोष्टी आणि अभौतिक वासना त्यातून मुक्त झाल्या, असा त्याचा प्रतिकात्मक अर्थ आहे.

तर अशी ही माती कुंभाराला सांगतेय की तू मडकं घडविण्याआधी मला पायाखाली मळतोस खरा पण तुझी वेळ, जीवन संपलं की मी तुला पायाखाली घेईन. इथं कबीर आपण सगळे मर्त्य, नाशवंत आहोत, हे अधोरेखित करतात. त्यामुळं कितीही आभाळाला हात टेकले तरी अंत मातीत होणार आहे, याची जाणीव सतत ठेवली पाहिजे, याचं हे सूचक आहे. मृत्यू हेच जर अंतिम सत्य असेल तर मग जगायचं कसं? जगण्याचं प्रयोजन काय? याविषयी तर कबीरांचे अनेक दोहे आहेत. त्या प्रत्येक दोह्यातून नवा अर्थ समोर येतो.

‘‘कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर, ना काहू से दोस्ती, न काहू से बैर।’’

या दोह्यात कबीर जीवन जगण्याचं सूत्र सांगतात. या जगाच्या बाजारात मी उभा आहे आणि सगळ्यांच्या भल्याची आशा करतोय. माझी ना कुणाची दोस्ती आहे ना कुणाशी वैर आहे, असं कबीर सांगतात. 

एखादी व्यक्ती आपल्या जीवनात येते, आपल्यासोबत काही काळ, मग तो काही तासांचा-दिवसांचा-वर्षांचा असेल, पण आपण त्या व्यक्तीतल्या त्रुटी पटकन हेरतो. त्या छोट्याशा काळातल्या सहवासावरून त्या व्यक्तीची ओळख बनविण्याचा प्रयत्न करतो. पण त्याऐवजी आपण त्या व्यक्तीकडे एक माणूस म्हणून बघितलं, तर अनेक द्वैत नष्टच होऊन जातील. एखाद्या व्यक्तीचं काही आवडत नाही म्हणून त्याच्याशी वैर आणि एखाद्याशी पटतंय म्हणून त्याच्याशी मैत्री, असं करून कसं चालेल?  शेवटी आपण सगळेच त्या मातीचीच लेकरं आहोत आणि आपला शेवटही त्या मातीच्या गर्भातच होणार आहे. ही समज आली की, ही दोस्ती, हे वैर, चढाओढ, ईर्ष्या, असूया सगळंच निरर्थक ठरतं. कबीराच्या नजरेतून जगाकडं पाहायला शिकलं तर सगळ्या जगाला व्यापून उरणारी ‘सबकी खैर’ मागण्याची दृष्टी आपसूकच विकसित होईल.


 

Web Title: sant kabir das remembrance on birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.