Sant Muktabai Punyatithi: माउलींची माउली होऊन समजूत काढणाऱ्या संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी; त्या म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 07:00 AM2024-06-01T07:00:00+5:302024-06-01T07:00:02+5:30

Sant Muktabai Punyatithi: विश्वाचा ताप हरण करणारे संत ज्ञानेश्वर जेव्हा स्वतः उद्विग्न होतात, तेव्हा त्यांची समजूत काढताना चिमुकली मुक्ताबाई काय समजवते ते वाचा!

Sant Muktabai Punyatithi: Death anniversary of Sant Muktabai who was younger sister of Mauli, but look at her maturity; They say... | Sant Muktabai Punyatithi: माउलींची माउली होऊन समजूत काढणाऱ्या संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी; त्या म्हणतात...

Sant Muktabai Punyatithi: माउलींची माउली होऊन समजूत काढणाऱ्या संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी; त्या म्हणतात...

आपल्या गोड वाणीने अखिल जगाचा ताप दूर करणारे ज्ञानोबा माऊली, जेव्हा एका क्षणी उद्विग्न होतात, तेव्हा त्यांची धाकटी बहीण मुक्ता मोठ्या बहिणीसारखी समजूत काढत म्हणते, 

योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा।
विश्व रागे झाले वन्ही, संते सुखे व्हावे पाणी।
शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानाचा उपदेश।
विश्वपट ब्रह्म दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।

लटका राग धरण्याचे ते वय, मात्र परिस्थितीने अकाली आलेले प्रौढत्त्व, अशात समाजोद्धारासाठी निघालेली ही चार बालके. ती साधीसुधी बालके नव्हेत, हे तर साक्षात परब्रह्मच! निवृत्तीनाथ हे भगवान शंकर, श्रीज्ञानदेव हे भगवान महाविष्णू, सोपान म्हणजे ब्रह्मदेव आणि मुक्ता म्हणजे सर्व जगताची चिंता वाहणारी आदिमाया! 

ही विश्वरूपे आपेगावच्या विठ्ठलपंत आणि रुख्मिणी कुळकर्णी यांच्या उदरी जन्माला आली. संन्याशाची पोरे म्हणून हिणवली गेली. आई-वडिलांना समाजाने देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा सांगितल्यामुळे, चारही मुले बालवयातच पोरकी झाली. एकमेकांचा प्रेमाने सांभाळ करू लागली. समाजाने त्यांना वाळीत टाकले, तरी या चारही मुलांनी याच समाजाला आपल्या पदरात घेतले. 

मात्र, अशाच एका कठोर प्रसंगी, ज्ञानेश रागावले. भिक्षा मागण्यासाठी गावात गेले असता, त्यांना वाईट अनुभव आला. भिक्षा कुणीच घातली नाही, उलट अपशब्द सुनावले. ज्ञानाला फार वाईट वाटले. त्याने घरी येऊन झोपडीचे दार लावून घेतले. धाकटी मुक्ता आता समंजस झाली होती. नक्की काय घडले असेल, याची तिला कल्पना आली. तिने झोपडीच्या दारावर, अर्थात ताटीवर थाप मारून 'ज्ञाना दादा, ताटी उघड' अशी प्रेमळ साद घातली. 

८-९ वर्षाच्या मुक्तेचा कोमल आवाज ऐकून ज्ञानाला आणखीनच रडू कोसळले. त्याचे मुसमुसणे कानी येताच, मुक्ता म्हणाली, 

संत तेच जाणा जगी, दया क्षमा ज्यांचे अंगी।
लोभ अहंता न ये मना, जगी विरक्त तेचि जाणा।
इहपरलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी।
मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा।।

मुक्तेने माऊली होऊन, ज्ञानेश्वर माऊलीची समजूत काढली. त्यावेळेस जे अभंग गायले, तेच 'ताटीचे अभंग' म्हणून प्रसिद्ध आहेत. 

मुक्तेने केवळ झोपडीची ताटी उघड, असे ज्ञानेशाला सांगितले नाही, तर मनाची दारे उघड. क्षमाशील हो. लोकांचे बोलणे मनावर घेऊ नकोस. विरक्त हो. कोणाकडून कुठल्याही अपेक्षा ठेवू नकोस. या मायेत अडकून न राहता, निष्काम मनाने समाजोद्धाराचे काम करत राहा. संतांनी आई होऊन जगाचे अनंत अपराध पोटात घ्यायचे असतात. आपण उद्विग्न न होता, लोकांचा राग शांत करायचा असतो. लोकांनी अपशब्द काढले, तरी संतांनी शब्दसुमनांची परतफेड करायची असते. चांगले वागणारे आणि वाईटही वागणारे लोकही आपलेच. त्यांच्यात आप-परभाव करणे योग्य नाही. लोभ-अभिमानाचा स्पर्श मनाला होऊ देऊ नको, दादाऽऽऽ, ताटी उघडा ज्ञानेश्वरा....।

काय प्रसंग असेल तो, नुसत्या कल्पनेनेही मन व्याकुळ होते. मात्र इवलीशी मुक्ताई, ज्ञानियांच्या राजाची समजूत काढत म्हणते, 

तुम्ही तरुनि विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा!

मग, आपण आपल्या मनाच्या बंद केलेल्या ताटी कधी उघडणार???

Web Title: Sant Muktabai Punyatithi: Death anniversary of Sant Muktabai who was younger sister of Mauli, but look at her maturity; They say...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.