Sant Vani: दुसऱ्यांमुळे तुम्हाला मनःस्ताप होत असेल तर मनात एवढंच म्हणा, 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!'
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 3, 2023 09:21 AM2023-02-03T09:21:24+5:302023-02-03T09:21:56+5:30
Sant Vani: भगवंत प्रत्येकाच्या कृतीकडे बारीक लक्ष ठेवून आहे, जो जे कर्म करतो, त्याचे फळ त्याला भोगावेच लागते, हाच मतितार्थ जाणून घ्या या गाण्यातून.
>> ज्योत्स्ना गाडगीळ
पूर्वी रेडिओ स्टेशनवर लागणारं आणि अलीकडे सत्यनारायण पूजेत हमखास कानावर पडणारं गाणं म्हणजे, 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!' हे गाणं ऐकता क्षणी आठवण होते ती गायक प्रल्हाद शिंदे यांची. त्यांच्याशिवाय अन्य कोणी या गाण्याला न्याय देऊ शकलं असतं याची कल्पनाही करवत नाही. तो आवाज जणू काही या गाण्यासाठीच बनला होता, नव्हे तर ते गाणं जणू काही या आवाजासाठी बनलं होतं, एवढं छान समीकरण त्यात जुळून आलं आहे. गीतकार अनंत पाटील यांचे शब्द, मधुकर पाठक यांचं संगीत आणि प्रल्हादजींच्या आवाजात या गाण्यात गीतेतला कर्मयोगच जणू उलगडून सांगितला आहे...
जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर,
जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर!
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू तुझं कर्म कर, फळ काय द्यायचं ते मी बघतो. सगळ्या कर्माची नोंद घ्यायला चित्रगुप्त बसले आहेत. त्या कर्माची गोळाबेरीज करून उचित फळ द्यायला मी समर्थ आहे. मात्र कर्म करताना लक्षात ठेव, जे करणारेस तेच परत येणार आहे. पेरले ते उगवते या न्यायाने कर्म सुद्धा जसे पेराल तसेच उगवते. चांगलं फळ मिळालं तर पूर्वकर्म चांगलं आहे समज, वाईट फळ मिळालं तर चांगलं कर्म कमी पडतंय असं समज. तेच सार या दोन ओळीत सामावलं आहे. जे जितक्या लवकर कळेल (सत्वर) तेवढ्या लवकर शहाणा होशील.
क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट,
कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट,
देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,
एखादी गोष्ट उचित नाही हे मन सांगत असतानाही क्षणिक सुखाला बळी पडतो आणि गैरवर्तन करतो. छोटीशी चूक कोणाच्या लक्षात येणारे, असा आपला समज असतो. मात्र सीसीटीव्ही जसा प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवतो, तसा आपला आत्मा आपल्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार असतो आणि हातून चुकीची गोष्ट घडली की त्याची टोचणी मनाला देत राहतो. कोणी आयुष्यभर दुसऱ्यांना दुःख देऊन स्वतः सुखी होऊ पाहतो, तर कुणी दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यात आपलं सुख मानतो. या कर्माची किंमत देहाला चुकवावी लागते आणि तो सुखरूप सुटून गेला तरी आत्म्याला त्या यातना भोगाव्या लागतात आणि त्याची किंमत पुढच्या जन्मात चुकवावी लागते.
ज्ञानी असो की अज्ञानी, गती एक आहे जाण,
मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान,
सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,
मरताना आपल्याबरोबर काही येणार नाही, एवढंच काय तर मरणही कोणाला टाळता येणार नाही, हे माहीत असूनही मनुष्य अहंकारात वावरतो. खेळ संपायचा तो एका क्षणात संपतो. हे कळतंय पण वळत नाही अशी अवस्था असेल तर मनुजा वेळीच सावध हो, हा देह सोडल्यावर तुझ्या आत्म्याबरोबर तू आयुष्यभर केलेलं कर्म सोबत येणार आहे. त्याच्यावरच तुझा पुढचा प्रवास ठरणार आहे. तुझ्या मागे लोकांनी तुझ्या नावे बोटं मोडू नये वाटत असेल तर कर्म शुद्ध ठेव, जेणेकरून कोणत्याही क्षणी निरोप द्यावा लागला, तरी मागे काय उरलं याची चिंता आत्म्याला सतावणार नाही!
मना खंत वाटूनी ज्याचे, शुद्ध होई अंतःकरण,
क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण,
अंत पृथ्वीचा मग आला युगे चालली झरझर,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,
माणसाकडून चुका होतात मान्य, पण चुका सुधारायच्या सोडून त्यावर पांघरूण घालत बसलात तर लोकांच्या नजरेतून सुटाल, मात्र स्वतःच्या नजरेतून कधीच सुटका होणार नाही. त्यामुळे चुका वेळेवर मान्य करा, स्वतःशी आणि दुसऱ्यांशी! दुसऱ्यांना दुखवून तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. जो तुम्हाला आता त्रास देतोय, तो तुम्हाला आनंदी दिसत असला तरी त्यालाही त्याच्या कर्माची फळं आज ना उद्या भोगावीच लागणार आहेत. त्याची मोजदाद तुम्ही ठेवू नका. आपल्या चुका आपल्याला लक्षात येताच क्षमा मागा, त्यामुळे अंतःकरण शुद्ध होईल, मनावरचं ओझं कमी होईल, चूक सुधारण्याची आणि पुन्हा होऊ न देण्याची संधी भगवंत देईल. हे जर सगळ्यांनी लक्षात घेतलं तर ही सृष्टी सुजलाम सुफलाम होईल... पण लक्षात कोण घेतो? दिवस झरझर निघून चालले. संस्कृतीचे अधःपतन पाहता अंतकाळ डोळ्यांना दिसू लागलाय. पण त्यातूनही तरून जायचं असेल तर आपण आपल्यापुरती सुधारणा करूया, कारण...
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर॥
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥