सफला एकादशीचे व्रतपूजन कसे करावे? जाणून घ्या मुहूर्त, मान्यता व महत्त्व

By देवेश फडके | Published: January 7, 2021 11:29 PM2021-01-07T23:29:30+5:302021-01-07T23:33:53+5:30

मार्गशीर्ष महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशी सफला एकादशी नावाने ओळखली जाते. सफला एकादशीचे महत्त्व, व्रतपूजनाचा मुहूर्त, विधी आणि काही मान्यतांबाबत जाणून घेऊया...

saphala ekadashi 2021 know about shubh muhurat vrat puja vidhi vrat katha and significance | सफला एकादशीचे व्रतपूजन कसे करावे? जाणून घ्या मुहूर्त, मान्यता व महत्त्व

सफला एकादशीचे व्रतपूजन कसे करावे? जाणून घ्या मुहूर्त, मान्यता व महत्त्व

googlenewsNext
ठळक मुद्देसन २०२१ मधील पहिली एकादशीमार्गशीर्ष महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशी सफला एकादशी मुहूर्त, व्रतपूजन, महत्त्व व मान्यता जाणून घ्या

सन २०२१ ला सुरुवात झाली असून, या वर्षातील व्रत-वैकल्ये, सण-उत्सवही सुरू झाले आहेत. नववर्षाच्या सुरुवातीला संकष्ट चतुर्थीचे व्रत आचरण्यात आले. आता यानंतर या वर्षातील पहिली एकादशी शनिवार, ०९ जानेवारी २०२१ रोजी आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशी सफला एकादशी नावाने ओळखली जाते. सफला एकादशीचे व्रत आचरल्यास हाती घेतलेल्या कामात उत्तम यश मिळते, अशी मान्यता आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. मार्गशीर्ष महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या सफला एकादशीचे महत्त्व, व्रतपूजनाचा मुहूर्त, विधी आणि काही मान्यतांबाबत जाणून घेऊया...

सफला एकादशीचे व्रताचरण करताना श्रीविष्णू आणि त्यांच्या सर्व अवतारांचे पूजन केल्याने विशेष यशप्राप्ती होते, असे मानले जाते. 'मासांना मार्गशीर्षोऽहम्' या वचनाने भगवद्गीतेत मार्गशीर्ष महिन्याचा गौरव करण्यात आलेला आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. यामुळेच मार्गशीर्षातील वद्य पक्षात येणारी एकादशी महत्त्वाची मानली गेली आहे. 

सफला एकादशी : शनिवार, ०९ जानेवारी २०२१ 

- मार्गशीर्ष वद्य एकादशी प्रारंभ : शुक्रवार, ०८ जानेवारी २०२१ रोजी रात्री ९ वाजून ४० मिनिटे.

- मार्गशीर्ष वद्य एकादशी समाप्ती : शनिवार, ०९ जानेवारी २०२१ रोजी रात्री ७ वाजून १५ मिनिटे.

'असे' करावे सफला एकादशीचे व्रतपूजन

सकाळी स्नानानंतर बाळकृष्णाची चौरंगावर स्थापना करावी. यानंतर बाळकृष्णाचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. एक भरपूर पाणी असलेला नारळ फोडावा. नारळाचे सर्व पाणी एका चांदीच्या किंवा स्टीलच्या भांड्यात घ्यावे. (तांबे किंवा पितळेच्या भांड्यात नको कारण ते खराब होऊ शकते). बाळकृष्णाच्या मूर्तीवर १६ वेळा पुरुषसूक्त म्हणत या नारळपाण्याचा अभिषेक करावा. पुरुषसुक्त येत नसेल तर 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र सगळे पाणी संपेपर्यंत म्हणून पळीने अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे बाळकृष्णाला अर्पण करावीत. धूप, दीप अर्पण केल्यानंतर खोबऱ्यात साखर मिसळून त्याचा बाळकृष्णाला नैवेद्य करावा. यानंतर आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. या सफला एकादशीला अशी उपासना करणाऱ्याला श्रीकृष्ण महाराज चांगले फल देऊन आशिर्वाद देतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

 

Web Title: saphala ekadashi 2021 know about shubh muhurat vrat puja vidhi vrat katha and significance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.