Sarva Pitru Amavasya 2024: सूर्यग्रहणामुळे सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करता येणार की नाही? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 02:44 PM2024-09-24T14:44:08+5:302024-09-24T14:45:35+5:30
Sarva Pitru Amavasya 2024: यंदा २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्य ग्रहण आहे, तर ग्रहण कालावधीत श्राद्धविधी करावे की नाही ते पहा.
पितृ पक्षाची समाप्ती सर्वपित्री अमावस्येला होते. ज्यांची श्राद्धतिथी आपल्याला माहीत नसते अशा सर्वांचे श्राद्धविधी सर्वपित्री अमावस्येला केले जातात. यंदा २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या (Sarva Pitru Amavasya 2024) आहे. त्याच दिवशी भाद्रपद मासाची समाप्ती आणि सूर्यग्रहण (Solar Eclipse 2024) देखील आहे. यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार असल्याने अनेक विधी करण्याबाबत लोकांच्या मनात विविध शंका कुशंका उपस्थित झाल्या होत्या. पितृपक्ष संपत आले, पण आता सर्वपित्रीला श्राद्धविधी करायचे की नाही हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचे उत्तर जाणून घेऊ.
ग्रहण काळ शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जातो शिवाय पितृ पक्षातही शुभ कार्य केली जात नाहीत. तर हा काळ केवळ श्राद्ध विधीसाठी आणि पितरांच्या स्मरणासाठी राखीव ठेवलेला असतो. यंदा सर्वपित्री अमावस्येला सूर्य ग्रहण असणार आहे. भले ते भारतातून दिसणार नसले, तरी ग्रहण काळ देवकार्यासाठी निषिद्ध मानला जातो. त्यामुळे या काळात श्राद्धविधी करावे की नाही, याबाबतीत ज्योतिष तज्ज्ञांचे मत जाणून घेऊ.
सर्व पितृ अमावस्या कधी असते?
हिंदू कॅलेंडरनुसार, अमावस्या तिथी १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४० मिनिटांनी सुरू होईल.
सर्वपित्री अमावस्या तिथी २ ऑक्टोबर रोजी रात्री १२. १९ मिनिटांनी समाप्त होईल. म्हणजेच ही तिथी २ तारखेचा सूर्योदय पाहणार आहे म्हणून २ तारखेला सर्वपित्री अमावस्या धरली जाईल. तर, सूर्यग्रहण १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४० वाजता सुरू होईल आणि २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ३ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होईल.
सूर्यग्रहणामुळे सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हा ग्रहण काळ असल्याने शुभ कार्य वर्ज्य असेल परंतु श्राद्ध विधी करण्यास काहीच हरकत नाही असे शास्त्र सांगते. त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी सर्वपित्रीला श्राद्धविधी करावे.
सर्वपित्री अमावस्येचे महत्व
पितृपक्षाचा शेवट सर्वपित्रीने होतो. या दिवशी सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध विधी करता येतो. या दिवशी ज्यांच्या श्राद्धाची तारीख माहित नाही अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावावरही श्राद्ध केले जाते. म्हणूनच त्याला सर्व पित्री असे म्हटले आहे. सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.