Sarva Pitru Amavasya 2024: पितृपक्षात श्राद्धविधी करता आले नाहीत? सर्वपित्रीला करा 'हा' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 01:18 PM2024-10-01T13:18:10+5:302024-10-01T13:18:55+5:30

Sarva Pitru Amavasya 2024: २ ऑक्टोबर रोजी सर्व पितृ अमावस्या आहे, त्यादिवशी कोणते उपाय करावेत, ते जाणून घ्या!

Sarva Pitru Amavasya 2024: Missed to perform Shraddha rituals in Pitrupaksha? Do 'this' solution to Sarvapitri! | Sarva Pitru Amavasya 2024: पितृपक्षात श्राद्धविधी करता आले नाहीत? सर्वपित्रीला करा 'हा' उपाय!

Sarva Pitru Amavasya 2024: पितृपक्षात श्राद्धविधी करता आले नाहीत? सर्वपित्रीला करा 'हा' उपाय!

एखाद्याला पितरांचे श्राद्ध करण्याची इच्छा असते, पण तिथी माहीत नसते, किंवा काही जणांना तिथी माहीत असते, पण वेळेचे गणित बसत नाही, किंवा सर्वांनी केले आणि आपल्याकडुन राहून गेले अशी पश्चात बुद्धी येते, यावर एकच उपाय तो म्हणजे सर्व पितृ अमावस्या (Sarva Pitru Amavasya 2024)! यंदा २ ऑक्टोबर रोजी ही तिथी असल्याने या दिवशी नेमके काय उपाय करायला हवे ते जाणून घ्या. 

मृत पूर्वजांना पितर म्हणतात. भाद्रपद कृष्णपक्ष अर्थात अनंत चतुदर्शी नंतरचा पंधरवडा, पितृपक्ष किंवा महालय म्हणून ओळखला जातो. महालय शब्दाचा अपभ्रंश `म्हाळ' असा झाला. या पंधरा दिवसांत, पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध विधी केला जातो. परंतु, आपल्या पिढीला आजोबा, पणजोबांच्या पुढचे पूर्वज नावानिशी माहीत नाहीत, तर त्यांची तिथी तरी कुठून माहीत असणार? यावर तोडगा म्हणून, ज्या पितरांची तिथी माहीत नसते, अशा सर्व पितरांचा श्राद्ध विधी सर्वपित्री अमावस्येला केला जातो.

गेलेली व्यक्ती आणि वेळ कधीच परत येत नाही. कोणाचे आभार मानायचे राहून जातात, तर कोणाची माफी. बरेच काही बोलायचे, सांगायचे राहून जाते. अशा आपल्यातून निघून गेलेल्या आप्त-स्वकीयांशी, संवाद साधण्याचा, ऋणनिर्देश करण्याचा आणि मनात दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा काळ म्हणजे पितृपंधरवडा आणि त्याचाच समाप्तीचा दिवस `सर्वपित्री अमावस्या.'(Sarva Pitru Amavasya 2024)

सर्वपित्री अमावस्येला कोणते विधी करावेत?

श्राद्ध कर्माचा विधी आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहेच. त्यातील प्रत्येक विधीला विशिष्ट महत्त्व आहे. गुरुजींना बोलावून मंत्रोच्चारांसह हे श्राद्ध कर्म केलं जातं. परंतु, अन्य कारणांमुळे हे सगळ्यांनाच जमेल असं नाही. अशा वेळी, विधी राहून जाईल, याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. विधी शक्य नसल्यास साधा, सात्विक स्वयंपाक करून कावळ्याला, कुत्र्याला आणि गायीला श्रद्धेने तो नैवेद्य दाखवावा. तसेच, पूर्वजांची स्मृती ठेवून यथाशक्ती अन्नदान, वस्त्रदान किंवा अन्य स्वरूपातील कोणतेही दान केले, तरीदेखील श्राद्ध विधीचे फल प्राप्त होते. गरजवंताला मदतीचा हात देऊन, पूर्वजांनी केलेल्या संस्काराची जाणीव ठेवणे, हा श्राद्धविधीचा गर्भितार्थ आहे. श्रद्धा असेल, तरच श्राद्ध. श्रद्धेने केलेली कोणतीही गोष्ट लाभते. 

वरील पैकी कोणत्याही गोष्टी आवाक्यात नाहीत, असे वाटत असेल, तर त्यावरही तोडगा आहे. सर्वपित्री अमावस्येला त्या समस्त पुण्यात्म्यांचे मनापासून स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद मागावेत. एखाद्या गोष्टीबद्दल क्षमा मागायची असल्यास, त्याची मनापासून कबुली द्यावी. आपले पूर्वज मोठ्या अंतःकरणाने आपल्याला आशीर्वाद देतात, अशी श्रद्धा आहे.  त्या आशीर्वादांमुळे नकारात्मकता संपून आयुष्य आशादायी वाटू लागते. पूर्वजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, आपल्यालाही जगण्याची नवी प्रेरणा मिळते. त्यांच्याकडून कळत-नकळत घडलेल्या चुका टाळता येतात आणि आपला प्रवास आनंदमयी होतो, असं अनेक ग्रंथांमध्ये धर्म-शास्त्र अभ्यासकांनी नमूद केलं आहे.

हा विधी का आणि कोणासाठी?

आपण स्वत:ला स्वयंभू समजत असलो, तरी तो आपला भ्रम आहे. आपल्या जडण-घडणीत अनेक लोकांचा हात असतो. साधा प्रवास करत असताना, आपल्याकडे जरी मर्सडिज असली, तरी प्रवासाचा रस्ता खाचखळग्यांनी भरलेला असेल, तर प्रवासाचा आनंद घेता येत नाही. पण तोच, जर एखादा रस्ता गुळगुळीत असेल, तर प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याची गाडी भरधाव वेगाने जावी, यासाठी आपल्या पूर्वजांनी तो मार्ग सुकर करून ठेवला आहे. मग या प्रवासात त्यांची आठवण ठेवून, त्यांचे आभार तर मानले पाहिजेतच ना? म्हणून तर वाहनांच्या मागे `आई-वडीलांची पुण्याई', `दादाचा आशीर्वाद', `आजीची माया' वगैरे संदेश लिहिलेले नजरेस पडतात. पूर्वजांची स्मृती जागृत ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी धर्मशास्त्राने पितृपंधरवड्याचा काळ निश्चित केला आहे.

Web Title: Sarva Pitru Amavasya 2024: Missed to perform Shraddha rituals in Pitrupaksha? Do 'this' solution to Sarvapitri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.