सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 11:56 AM2024-10-01T11:56:03+5:302024-10-01T12:00:06+5:30
Sarva Pitru Amavasya 2024: सर्व पितरांचे स्मरण करून श्राद्ध विधी करण्याचा सर्वपित्री अमावास्या पितृपक्षातील शेवटचा दिवस. या दिवशी काही गोष्टी आवर्जून कराव्यात, असे सांगितले जाते.
Sarva Pitru Amavasya 2024: ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. यंदाची सर्वपित्री अमावास्या ग्रहण योगात असणार आहे. या दिवशी सूर्यग्रहण आहे. सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध करून पितरांना तृप्त करावे. असे केल्याने पूर्वज समाधानाने पितृलोकात परतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व अनेक धर्मग्रंथांतून लिहून ठेवल्याचे सांगितले जाते. प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यंदाच्या सर्वपित्री अमावास्येला काही गोष्टी आवर्जून कराव्यात. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतील आणि समाधानाने परततील. तसेच शुभाशिर्वाद देतील, असे सांगितले जाते.
यंदाच्या सर्वपित्री अमावास्येला विविध प्रकारचे योग जुळून येत आहेत. चंद्र कन्या राशीत प्रवेश करत आहे. याच राशीत बुध, सूर्य आणि केतु विराजमान आहेत. त्यामुळे हे सूर्यग्रहण कन्या राशीत होणार आहे. तर चंद्र आणि राहु यांचा समसप्तम योग जुळून येणार आहे. तसेच वृषभ राशीतील गुरुसोबत चंद्राचा नवपंचम योग जुळून येत आहे. वर्षभरात किंवा पितृपक्षातील अन्य तिथींवर श्राद्ध करणे संभव न झाल्यास, सर्वपित्री अमावास्येला सर्वांसाठी श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण पितृपक्षातील ही अंतिम तिथी आहे. या दिवशी नेमके काय करावे, ते जाणून घेऊया...
दक्षिणेला दिवा लावा, अन्नदान करा
- सायंकाळी तिन्हीसांजेला दिवेलागणीवेळी घराच्या बाहेर दक्षिण दिशेला दिवा लावावा. पितरांसह देवी लक्ष्मीची कृपा होऊ शकेल. गोमाता, श्वान, कावळा यांना खायला द्या. अन्नाचा काही भाग निर्जन ठिकाणी किंवा नदी, तलावाजवळ ठेवा. असे मानले जाते की, ज्यांच्यासाठी श्राद्ध केले जात नाही, अशा लोकांचे अज्ञात पूर्वज ते अन्न ग्रहण करतात आणि मनापासून आशीर्वाद देतात.
पितृस्तोत्राचे पठण करावे
- पितृ स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे. पितरांना प्रार्थना करावी. घरात सुख-समृद्धी नांदावी. तसेच पुढच्या वर्षी पुन्हा यावे. सेवेची संधी द्यावी, असे सांगावे. पूर्वज प्रसन्न राहतील आणि त्यांचा आशीर्वाद सदैव राहू शकेल.
गरजूंना अन्नदान करावे
- शास्त्रामध्ये भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे हे सर्वांत मोठे पुण्य मानले गेले आहे. सर्वपित्री अमावस्येला घरात आलेली व्यक्ती उपाशी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. कोणी मनुष्य, प्राणी किंवा पक्षी अन्नाच्या इच्छेने दारात आले तर त्यांना नक्कीच काहीतरी खायला द्यावे. भुकेल्या माणसाला अन्न द्यावे. खीर आणि दूध असलेले अन्न घेणे चांगले. असे केल्यास देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
पूर्वजांच्या नावाने एखादे रोपटे लावा आणि काळजी घ्या
पूर्वजांचे नाव घेऊन एखादे रोप लावा. नियमित पाणी द्या. याने पितरांना नियमित समाधान मिळेल. जसजसे रोपटे वाढत जाईल तसतसे घरात सुख-समृद्धी वाढेल. झाडे घरातील सकारात्मकता आणि आनंदाचे प्रतीक आहेत, म्हणून सर्वपित्री अमावस्येला घरात एकतरी रोप लावावे.
पूर्वजांच्या नावाने एक पान काढून ठेवावे
- सर्वपित्री अमावास्येला आनंदी मनाने पूर्वजांच्या नैवेद्याची तयारी करावी. पूर्वजांच्या नावाने श्राद्ध कार्य आणि तर्पण विधी करून झाले की, पूर्वजांच्या नावाने एक पान काढून ठेवावे. हे पान गाय आणि कावळा यांना अर्पण करावे. पितृपक्षात पूर्वज कोणत्याही स्वरुपात येऊ शकतात, अशी मान्यता आहे.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.