पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 01:06 PM2024-09-28T13:06:14+5:302024-09-28T13:06:41+5:30
Sarvapitri Amavasya Pitru Paksha 2024: सर्वपित्री अमावास्या विशेष महत्त्वाची मानली जाते. या दिवशी कोणाकोणाला श्राद्ध विधी करण्याचा अधिकार आहे? शास्त्रात काय सांगितले आहे? जाणून घ्या...
Sarvapitri Amavasya Pitru Paksha 2024: पितृपक्ष आता समाप्तीकडे जात आहे. ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्वपित्री अमावास्या आहे. पितृपक्षातील सर्वपित्री अमावास्या हा सर्वांत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी सूर्यग्रहण आहे. सर्वपित्री अमावास्येबाबत अनेक कथा, मान्यता सांगितल्या जातात. सर्वपित्री अमावास्येबाबत एक वेगळीच भावना जनमानसात असल्याचे पाहायला मिळते. परंतु, घरात कर्ता पुरुष नसेल, तर मग सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध विधी कुणी करावा? महिलांना श्राद्ध विधी करण्याचा अधिकार आहे का? शास्त्र काय सांगते? जाणून घेऊया...
पितृपक्ष आणि करण्यात येणाऱ्या श्राद्ध तर्पण विधींबाबत आपल्याकडे अनेक समजुती, मान्यता, धारणा आहेत. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव अधिक असल्यामुळे कोणतेही कार्य हे शक्यतो मुलगा, नवरा, भाऊ आदींकडून केले जाते. अन्य सर्व क्षेत्रात महिला वर्ग पुरुषांच्या खांद्याला लावून काम करताना दिसत असताना मात्र काही धार्मिक कार्ये केवळ घरातील पुरुष करताना दिसतात. सध्या सुरू असलेल्या पितृपक्षाबाबत बोलायचे झाले, तर श्राद्ध तर्पण विधी करण्याचे अधिकार घरातील मुलींना आहेत की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.
रामायणात उल्लेख, सीता मातेने केले होते दशरथांचा श्राद्ध विधी
वाल्मिकी रामायणात महिला श्राद्ध करू शकतात, असा उल्लेख आलेला आढळतो. याचे प्रमाण म्हणून सीता देवीने राजा दशरथाच्या नावाने श्राद्ध विधी केल्याचा एक प्रसंग दिसून येतो. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनवासात भोगत असताना पितृपक्षाच्या कालावधीत राजा दशरथाच्या नावाने श्राद्ध विधी करण्यासाठी गया धाम येथे गेले होते. गया येथे श्रीरामांनी लक्ष्मण आणि सीता देवी यांच्या उपस्थितीत दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले होते, त्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली असे सांगितले जाते. सीता देवीने रेतीचे पिंड तयार केले. फल्गु नदी, अक्षय वड, एक ब्राह्मण, तुळस आणि गोमातेला साक्षी मानून सीता देवीने पिंडदान केले. श्रीराम आणि लक्ष्मण पोहोचल्यावर सीतेने हकीकत सांगितली. यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण यांनी दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले, अशी कथा आढळते.
श्राद्ध विधी करण्याचा अधिकार नेमका कुणाला?
गरुड पुराणात पितृपक्ष पंधरवड्यातील श्राद्ध विधी कोण करू शकते, याबाबत सविस्तर विवेचन केल्याचे आढळते. गरुड पुराणातील ११, १२, १३ आणि १४ व्या श्लोकात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. 'पुत्राभावे वधु कूर्यात, भार्याभावे च सोदन:। शिष्यों वा ब्राह्मण: सपिण्डो वा समाचरेत।। ज्येष्ठस्य वा कनिष्ठस्य भ्रातृ: पुत्रश्च: पौत्रके। श्राध्यामात्रदिकम कार्य पुत्रहीनेत खग:।।' या श्लोकाचा अर्थ असा की, ज्येष्ठ किंवा कनिष्ठ, पुत्राच्या अनुपस्थितीत सून, पत्नी श्राद्ध विधी करू शकतात. यामध्ये ज्येष्ठ कन्या किंवा एकुलती एक कन्या यांचाही समावेश करण्यात आला आहे.
घरात कर्ता पुरुष नसेल, तर कोणाला श्राद्ध विधीचा अधिकार?
पत्नीचे निधन झाले असल्यास किंवा तिच्या अनुपस्थितीत सख्खा भाऊ, भाचा, नातू, नात श्राद्ध विधी करू शकतात. यापैकी कुणीही उपस्थित किंवा उपलब्ध नसल्यास शिष्य, मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट श्राद्धविधी करू शकतात. यापैकीही कोणी उपस्थित किंवा उपलब्ध नसल्यास कुळाच्या पुरोहितांना त्या कुटुंबातील पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी करण्याचा अधिकार प्राप्त होतो, असे गरुड पुराण सांगते. याचाच दुसरा अर्थ असा की, घरातील पुरुष उपस्थित नसेल, तर महिलांना श्राद्ध विधी करण्याचा अधिकार आहे, असे सांगितले जाते.