चित्ती असू द्यावे समाधान..!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 12:55 AM2020-08-09T00:55:32+5:302020-08-09T00:56:05+5:30
प्रत्येक मनुष्याची ओढ ही चिरंतन समाधानाकडेच असते...
माणूस सध्या सर्व सुख सोयी सुविधा असूनही दुःखाच्या खाईत गुरफटून गेला आहे. पैसा, बंगला, गाडी, नोकर चाकर, यश कीर्ती मिळूनही तो चार चौघात चेहऱ्यावर खोटे हसू आणून आपले दुःख ,अशांतता यांच्यावर पांघरून घालतो आहे.नेमकं काय हरवलं आहे,हवं ते अजून मिळालेलं नाही की काय हवंय याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. लाखो करोडो रुपये खर्च करून तो शांतता मिळवू इच्छित आहे. पण खरंतर एक छोटीशी गोष्ट जर त्याने आत्मसात करायला सुरवात केली तर बरेच प्रश्न आपोआप मिटून जातील. तो कितीही सुखात आणि पराकोटीच्या दुःखात उन्मळून पडणार नाही की अस्वस्थ होणार नाही. त्यासाठी माणसाला संत परंपरेने गौरविलेलं एक वाक्य मनी बिंबवावे लागेल ते म्हणजे चित्ती असू द्यावे समाधान..!
जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही, ते समाधान. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे. ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरूरी नाही. प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच. तेव्हा तसा तो सोडता येत नाही; तो एक 'राम' म्हटल्यानेच सुटू शकेल. कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा. त्यामुळे समाधान मिळून, मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही.
जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी; काही न करणारा हा खरा अडाणी होय.वासनेचे परिणत स्वरूप म्हणजे बुद्धी होय. जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय. बंधनाला न जुमानता वागणारी, ती स्वैराचारी बुद्धी होय.
वासना नष्ट होणे म्हणजे देह्बुद्धी नष्ट होणे होय. प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येतील हे शक्य नाही. त्याचे विषयाचे प्रेम रक्तात इतके भिनले आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे. ते घेतल्याने विषयाचे प्रेम नष्ट होईल.
मनापासून निश्चय करा. तो परमात्मा फार दयाळू आहे, तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी उभा राहील. दोष न पाहताही जो सगळ्यायांना जवळ करतो तो खरा दयाळू होय. नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम नष्ट होईल, आणि देहावरचे प्रेम नष्ट झाले की संसारावरचे प्रेम कमी होईल, आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल.
प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते. ती ओढ परमेश्वरप्राप्तीनेच पुरी होऊ शकते. ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल, आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल, तर एका नामानेच.
ज्याने नाम हृदयात अखंड बाळगले, त्याला सर्वत्र परमेश्वरच अस्तित्व नजरेस येईल..