Saturday Ritual: दर शनिवारी उपासनेत 'या' गोष्टींचा समावेश करा; शनी देवांच्या कृपेने करिअरमध्ये यश मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 11:25 AM2022-09-17T11:25:43+5:302022-09-17T11:26:25+5:30
Shani Puja Tips: शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी पूजेच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे भाग्य उजळू शकते. त्यासाठी दर शनिवारी दिलेला उपाय करा!
धर्मशास्त्रानुसार पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. देवापाशी दिवा लावल्याने केवळ देव्हाराच नव्हे तर आपले अंतर्मनदेखील उजळून निघते. मन प्रसन्न होते. सकारात्मकता वाढते. मनातील भीती नष्ट होते. यादृष्टीने आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो. काही जण तुपाचा तर काही जण तेलाचा दिवा लावतात.
शनी देवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावलेला पसंत असल्याने आपण शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो. त्यात फक्त एका गोष्टीची भर घालायची आहे. ती म्हणजे तेलाच्या दिव्यात एक लवंग देखील टाका. लवंगीचा वापर वास्तुशास्त्राने देखील सुचवला आहे आणि भाग्योदयासाठी ज्योतिष शास्त्रानेदेखील पुष्टी दिली आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार हा छोटासा उपाय केल्यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते. आर्थिक लाभ होतो. आणि या उपायात सातत्य ठेवले तर कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
या उपायाबरोबर पुढील गोष्टीदेखील लक्षात ठेवा:
>> हिंदू धर्मातील पूजा आणि धार्मिक विधी दरम्यान कापूर वापरला जातो. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कापूर जाळला जातो. मात्र कापूर नियमितपणे जाळताना लक्षात ठेवा की कापूर शुद्ध असावा.
>> त्याचबरोबर धर्मग्रंथांमध्येही दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. म्हणून आपल्या हाताने शक्य तितके दान करा. गरीब आणि गरजूंना मदत करा.
>> ज्योतिष शास्त्रानुसार जीवनात प्रगती होण्यासाठी पशु पक्ष्यांना घासातला घास काढून द्या! असे केल्यास करिअर आणि जीवनात प्रगतीसोबतच यश मिळते.
>> धनधान्याने घरात सुबत्ता राहावी म्हणून रोज तव्यावर केलेली पोळी गायीला, कुत्र्याला, कावळ्याला घाला. आर्थिक अडचणी दूर होतील.
>> आपल्या उत्पन्नाचा दशांश अर्थात दहावा भाग दान करावा असे धर्मशास्त्र सांगते. कारण आपण समाजाचे केवळ घेणेकरीच नाही, तर देणेकरी देखील असतो.
>> आपल्या सत्कार्याची आणि दुष्कृत्याची चित्रगुप्त नोंद ठेवत असतो. त्यामुळे प्रत्येक कार्य देवाला स्मरून करत राहा, कसलीही उणीव भासणार नाही!