Sawarkar Jayanti 2022 : वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी स्वा. सावरकरांनी रचली होती शिवरायांची आरती; काय होते निमित्त? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 04:54 PM2022-05-27T16:54:33+5:302022-05-27T16:56:32+5:30
Sawarkar Jayanti 2022 : स्वा.सावरकरांनी लिहिलेली आरती म्हणजे एका स्वातंत्र्यवीराने दुसऱ्या स्वातंत्र्यवीराला वाहिलेली शब्द सुमनांजलीच!
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांची २८ मे रोजी जयंती आहे. १८८३ मध्ये नाशिकजवळील भगूर या गावी त्यांचा जन्म झाला. चापेकर बंधूंच्या निधनाची वार्ता ऐकून बाल विनायकाच्या मनात स्वातंत्र्य लढ्याचे स्फुल्लींग पेटले. विनायकासमोर रामायण, महाभारत याचबरोबर शिवचरित्राचा आदर्श होता. शिवरायांप्रमाणे आपणही स्वराज्य प्राप्तीची मोहीम फत्ते करायची असा त्यांनी चंग बांधला. शिवरायांनी जशी माणसांची पारख करून मावळे गोळा केले, तसे विनायकाने स्वातंत्र्य समरात स्वतःला झोकून देतील असे स्वातंत्र्य सैनिक तयार केले. एक दोन नाही, तर हजारो!
सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वात जणूकाही चुंबकीय आकर्षण होते. ते जिथे जात असत तिथे त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शेकडो जणांचा समूह गोळा होत असे. तरुणांचा समूह स्वातंत्र्य कार्यासाठी प्रेरित होत असे. सावरकरांनी त्यांच्यासमोरही शिवराज्याचा आदर्श ठेवला. स्वातंत्र्य मोहिमेची आखणी करण्यासाठी समस्त तरुण संघटित होत असत. भारतमातेच्या तसेच शिवरायांच्या प्रतिमेची पूजा करत असत.
सावरकर एक लढवय्या सैनिक होतेच , शिवाय एक प्रतिभावान कवी सुद्धाहोते . त्यांनी कवने लिहावीत आणि त्याच्या मित्रांनी पोवाड्यासारखी ती कवने गावीत, हे नित्याचेच झाले होते. इ. स. १९०२ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातील 'आर्यन संघ' नावाच्या संघामध्ये रोज म्हणता यावी, म्हणून सावरकरांनी शिवरायांची आरती लिहिली. ज्याप्रमाणे आपण समर्थ रामदास रचित 'सुखकर्ता दुःखहर्ता' आरती म्हणतो त्याच चालीत तेव्हा ती म्हटली जात असावी. स्वातंत्र्योत्तर काळात पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी ती आरती संगीतबद्ध केली आणि भारतरत्न लतादीदी यांनी त्या आरतीला आपला स्वरसाज चढवला त्यामुळे ती आरती अधिक लोकप्रिय झाली.
ज्याप्रमाणे भगवान विष्णूंनी दशावतार घेऊन पृथ्वीवरील संकट दूर केले, तसे शिवरायांनी पुनश्च जन्म घेऊन मातृभूमीला पारतंत्र्यातुन मुक्त करावे, असे आवाहन सावरकरांनी या आरतीत केले, तेही वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी! वास्तविक पाहता, ते त्यांचे प्रेमात पडण्याचे दिवस होते. तसे घडलेही! फक्त हे प्रेम होते मातृभूमीसाठी! आपली आई स्वतंत्र व्हावी म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांना सदर आरतीतून गाऱ्हाणे घातले आहे. आज स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त आपणही ती आरती वाचुन या दोन्ही शूरवीरांना वंदन करूया.
जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया
आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सद्गदीता भूमाता दे तुज हाकेला
करूणारव भेदूनी तव हृदय न का गेला
जय देव, जय देव, जय जय शिवराया
श्रीजगदंबा जी तव शुंभादीकभक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता
जय देव, जय देव, जय जय शिवराया
त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन् भगवद्गीता सार्थ कराया या
जय देव, जय देव, जय जय शिवराया!