Second Shravan Somvar 2021: दुसरा श्रावणी सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, अद्भूत शुभ योग व शिवपूजनाची सोपी पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 06:35 PM2021-08-14T18:35:24+5:302021-08-14T18:35:51+5:30
श्रावणातील दुसरा सोमवार, त्या दिवशी वाहण्याची शिवामूठ आणि काही शुभ योगांबाबत जाणून घेऊया...
भगवान महादेवांनी कामासूरावर विजय मिळवला होता, तसे आपल्या मनातील, विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रते आयोजली असल्याची मान्यता आहे. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते, ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते, असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो. महादेवांची उपासना, आराधना आणि पूजन करण्यासाठी श्रावण महिना सर्वांत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. यंदाच्या श्रावणाची सुरुवात आणि सांगता सोमवारी होत असून, हा शुभ संयोग असल्याचे मानले जात आहे. श्रावणातील दुसरा सोमवार, त्या दिवशी वाहण्याची शिवामूठ आणि काही शुभ योगांबाबत जाणून घेऊया... (Second Shravan Somvar 2021 Date)
देव-दानवांनी केलेले समुद्रमंथन भारतात नेमके कुठे झाले? पाहा, मान्यता आणि काही अद्भूत तथ्ये
दुसरा श्रावणी सोमवार १६ ऑगस्ट २०२१ रोजी असून, या दिवशी तीळ शिवामूठ म्हणून वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो.
श्रावणात जिवतीचा कागद का पूजला जातो? जाणून घ्या महत्त्व आणि नेमका भावार्थ
शिवपूजन कसे करावे?
श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, 'ॐ नमः शिवायै' या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे. अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे, असे सांगितले जाते. पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहताना 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।' असा मंत्र म्हणावा.
श्रावणी सोमवारचा उपास करा आणि कायमस्वरूपी 'हा' लाभ करून घ्या!
श्रावणी सोमवारचे शुभ योग
यंदाच्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी दुर्गाष्टमी असून, या दिवशी दूर्वाष्टमी व्रत आचरले जाते. या व्रतामध्ये दूर्वांना विशेष महत्त्व दिलेले आहे. व्रतकर्त्याने दूर्वा, गौरी, शिव आणि गणपती यांची पूजा केली जाते. यामुळे श्रावणी सोमवारचे व्रतपूजन करताना महादेवांसह पार्वती देवी आणि प्रथमेश गणपती यांचीही पूजा करावी. याने तीनही देवतांचे शुभाशिर्वाद आपल्याला मिळू शकतात, असे सांगितले जाते. दरम्यान, यंदाच्या वर्षी तिसरा श्रावणी सोमवार २३ ऑगस्ट, चौथा श्रावणी सोमवार ३० ऑगस्ट आणि पाचवा श्रावणी सोमवार ६ सप्टेंबर रोजी आहे.