संत सेना महाराजांना वाचवण्यासाठी पांडुरंगाने बादशहाची 'हजामत' कशी केली पहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 12:26 PM2021-09-04T12:26:59+5:302021-09-04T12:27:28+5:30
संतांचा अधिकार मोठा असूनही त्यांनी आपले दैनंदिन काम, व्यवसाय सोडले नाही. ते सांभाळून भक्ती केली आणि त्याचे त्यांना फळ मिळाले.
संत सेना यांचा जन्म भारताच्या उत्तर दिशेला बांधवगड येथे झाला. त्यांचे वडील हे ज्ञानेश्वरांचे वडील विठोबा यांचे गुरुबंधू होते. रामानंदस्वामी हे त्यांच्या गुरुंचे नाव होते. आज सेना महाराजांची पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांच्या चरित्रातील एक रोचक प्रसंग. शेवट्पर्यंत जरूर वाचा.
बालपणापासूनच सेना यांना परमेश्वरभक्तीची आवड होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना नाभिक व्यवसाय शिकवला होता. तो व्यवसाय करतच ते पांडुरंगाचे भजन कीर्तन करत. साधुसंत हे नेहमी सेना यांचया घरी येत असत. त्या संतांची ते सेवा करत असत. वडिलांप्रमाणे त्यांनीही रामानंदस्वामी यांचे शिष्यत्त्व पत्करले. सेना यांची भक्ती, आचरण व ज्ञान पाहून रामानंदस्वामी यांनी त्यांना सामाजिक समता भक्तिमार्गात आणण्याचे कार्य करण्यास सांगितले. गुरुआज्ञेने त्यांनी ही महत्त्वाची कामगिरी केली. लोकांची दाढी-डोई करण्यात ते प्रवीण होते. त्यांच्या हाताला मृदुमुलायम स्पर्श होता. त्यामुळे शरीराचा दाह कमी होत असे. लोक सेना यांच्याकडे हजामत करवून घेण्यासाठी येत, तसेच त्यांच्या भजन कीर्तनालाही गर्दी करत असत.
सेना यांची कीर्ती बादशहाच्या कानी गेली. त्याने सेनाला बोलावून घेतले व आपल्याकडे नोकरीला ठेवले.
एकदा सेना पांडुरंगाची पूजा करत बसले होते. बादशहाकडून तीन चार बोलावणी आली, 'ते घरात नाहीत' असेच प्रत्येक वेळी त्यांच्या पत्नीने सांगितले. परंतु त्यांच्या दुष्ट शेजाऱ्याने जाऊन बादशहाला कळवले, `सेना न्हावी घरात देवपूजा करत बसला आहे. त्याच्या बायकोने ते नसल्याचे खोटे सांगितले.'
ते ऐकून बादशहाला राग आला. सेनाची त्याने मोट बांधून त्याला नदीच्या उसळत्या प्रवाहात टाकून देण्याची आज्ञा केली. भक्तावर आलेला बिकट प्रसंग पाहून पांडुरंग सेना न्हावी यांचे रूप घेऊन बादशहासमोर गेला. त्याला पाहताच बादशहाचा राग शांत झाला. तो हजामत करायला बसला.
हजामत करत असताना बादशहा मान खाली करी त्यावेळी रत्नखचित वाटीतील तेलात बादशहाला पांडुरंगाचे प्रतिबिंब दिसे. वाटीतील रूप पाहून बादशहा अगदी मोहित झाला. त्याचे देहभान हरपले. हजामत झाल्यावर बादशहाने त्याला ओंजळभर होन दिले. पांडुरंगाने ते धोकटीत ठेवून, ती धोकटी सेना न्हावी यांच्या घरी नेऊन ठेवली आणि आपण गुप्त झाले.
बादशहाला ते ईश्वरी स्वरूप पाहण्याची ओध लागली. दोन प्रहरी त्याने सेना न्हावी यांना बोलावून घेतले. त्याला पाहताच त्याने ती सकाळची वाटी आणवली आणि म्हणाला, 'सकाळी मला या वाटीत जे चतुर्भुज रूप दिसत होते, ते मला पुन्हा दाखव!'
बादशहाचे उद्गार ऐकून सेना विस्मित झाले. प्रात:काली बादशहाला जे रूप दिसले तसे पुन: दोन प्रहरी दिसेना. तेव्हा आपल्या रूपाने पांडुरंग आला असावा असे समजून त्यांनी पांडुरंगाचा धावा केला. तेव्हा बादशहाला पुन: ते पांडुरंगाचे रूप दिसले. नंतर सेना यांना आपल्या धोकटीत धन दिसले. या चमत्कारामुळे बादशहा विरक्त होऊन श्रीहरीचे भजन करू लागला. सेना न्हावी यांना आनंद झाला.
या प्रसंगातून पांडुरंगाने दोन अर्थाने बादशहाची हजामत केली. एक म्हणजे सेना महाराजांच्या व्यवसायाचा भाग म्हणून हजामत केली आणि दुसरी म्हणजे सेना महाराज सर्वसामान्य नसून भक्तीपदाला पोहोचलेले संत आहेत, अशी कानउघडणी अर्थात मराठी वाकप्रचाराच्या अनुशंगाने अप्रत्यक्ष हजामत केली.
सेना महाराजांनी मध्य भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. नंतर त्यांनी पंढरपुरात वास्तव्य केले. त्यांना अनेक संत भेटले. पुढे ते आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला गेले. माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवताच त्यांना ज्ञानाई माऊलीने दर्शन दिलेले पाहून त्यांचे देहभान हरपले. निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतले. पुन्हा पंढरपुरात आले. पांडुरंगाचे दर्शन घेतले. नंतर बांधवगड या आपल्या मायभूमीत परतले आणि मग तृप्त शांत अंत:करणाने समाधिस्त झाले, तो आजचाच दिवस...संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचा!