हरी आणि हर वेगळे नसून एकच आहेत याचा साक्षात्कार संत नरहरी सोनार यांना कसा झाला बघा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 07:00 AM2023-02-08T07:00:00+5:302023-02-08T07:00:02+5:30
आज संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी, त्यांची पांडुरंगाशी सोयरीक कशी झाली हे सांगणारी कथा त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊ.
नरहरी सोनार या नावाचे एक भक्त पंढरपुरात होऊन गेले. ते मोठे शिवभक्त होते. त्यांनी शिवशंकराची आराधना, उपासना करून त्याला प्रसन्न करून घेतले होते. सोनार पंढपुरात राहात असूनदेखील कधी विठोबाच्या दर्शनाला गेले नाहीत. त्यांची भक्ती, श्रद्धा शिवशंकरावर होती. शिवशंकरावाचून दुसऱ्या कोणत्याही देव दैवताची त्यांनी पूजा केलेली नव्हती. आज त्यांची पुण्यतिथी, त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या जीवनातील एक रोमहर्षक प्रसंग!
एका सावकाराने पंढरपुरात येऊन विठोबास नवस केला, की जर मला पुत्र झाला तर मी तुला सोन्याचा करगोटा घालीन. पुढे त्या सावकाराला पुत्र झाला. म्हणून तो नवस फेडण्यासाठी पंढरपुरात आला. सुवर्णाचा करगोटा करून त्यावर हिरे-माणके जडवील असा एखादा कुशल सोनार पंढरपुरात आहे का, याबद्दल सावकाराने पुजाऱ्याकडे चौकशी केली. तेव्हा पुजाऱ्याने त्याला नरहरी सोनाराचे नाव सांगितले.
सावकार नरहरी सोनाराकडे गेला आणि त्याला हिरेजडित सोन्याचा करगोटा करण्यास सांगितला. तेव्हा नरहरी सोनार सावकाराला म्हणाले, 'तुम्ही कमरेचे मोज घेऊन या म्हणजे मी करगोटा करून देतो.' त्याप्रमाणे सावकाराने विठोबाच्या कमरेचे मोज आणून दिले.
करगोटा तयार झाल्यावर सावकाराने विठ्ठलाची षोडशोपचारे पूजा केली व करगोटा कमरेस बांधू लागला. पण तो अपुरा पडला. म्हणून सावकाराने पुन: नरहरी सोनाराकडे जाऊन तो वाढवून आणला, तेव्हा तो ढिला होऊ लागला. करगोटा विठोबाच्या कमरेस ठीक बसत नव्हता. सावकार खंती झाला. अखेर सावकार नरहरी सोनाराकडे गेला व म्हणाला, 'तुम्ही देवळात येऊन करगोटा देवाच्या कमरेस नीट बसवून द्यावा.'
करगोटा बरोबर व्हावा म्हणून सावकाराने नरहरी सोनाराची खूप विनवणी केली. तेव्हा नरहरी सोनार म्हणाले, मी शिवशंकरावाचून दुसरे दैवत पाहत नाही. तसा माझा निश्चय आहे.'
सावकाराने खूप आग्रह केला, नरहरी सोनाराची खूप विनवणी केली, तेव्हा नरहरी सोनार डोळे झाकून विठ्ठल मंदिरात गेले. ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो लोक दूरदूरहून पंढरपूरात येतात, त्या विठ्ठलाचे दर्शन टाळण्यासाठी पंढरपूरचा रहिवासी डोळ्यावर पट्टी बांधून आला, याचे लोकांना आश्चर्य वाटू लागले. सावकाराने नरहरी सोनाराला हात धरून मंदिरात नेलेले पाहून लोकांनी त्यांची हेटाळणी केली.
नरहरी सोनार मंदिरात गेल्यानंतर विठ्ठलमूर्ती हातांनी चाचपू लागले. तेव्हा विठ्ठलाचे सर्व ध्यान त्याला शिवशंकराचे असल्याचे भासू लागले. भूजा, मुख, गळ्यात सर्पाचा अलंकार, मस्तकावर जटा असा जो नीलकंठ, तोच साक्षात विटेवर उभा असल्याचे त्यांना वाटले. 'हे तर माझे आराध्यदैवत!' असे नरहरी सोनारांनी उद्गार काढले आणि डोळ्यावरील पट्टी काढली. डोळे उघडून पाहिले तेव्हा विठ्ठलाची मूर्ती विटेवर दिसली. नरहरी सोनाराने पुन: डोळे झाले. तेव्हा त्यांना शंकराचे ध्यान हाताला लागले. पुन: डोळे उघडून बघितले, तर विठ्ठलाची मूर्ती! पुन: डोळे बांधून घेणार तोच त्या ठिकाणी त्यांना शिवशंकर दिसू लागले.
नरहरी सोनारांनी विठ्ठलाला साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांनी प्रार्थना केली, की `हे पंढरीनाथा, विठ्ठला, मी मनात द्वैतभाव धरला होता, तो तुझ्या कृपेने आता दूर झाला. मी तुला शरण आलो आहे. माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे.'
यावर विठोबा म्हणाले, `नरहरी तू मला फार आवडतोस. म्हणून मी हे कृत्य केले. मी आणि शिवशंकर एकच आहोत. तू तसा भेद मानू नकोस!'
'मी व्यर्थ नेत्र बांधून घेतले. देवा मला क्षमा कर!' नरहरी सोनारांनी देवासमोर हात जोडले आणि करगोटा विठ्ठलाच्या कमरेस बांधला आणि तो बरोबर झाला. सावकाराला, नरहरी सोनाराला आणि खुद्द पांडुरंगाला आनंद झाला.