यशाच्या मार्गातला दगड बाजूला तर करून पहा, कदाचित तुम्हालाही सुवर्ण मोहरांची थैली सापडेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 08:00 AM2021-08-28T08:00:00+5:302021-08-28T08:00:07+5:30
यशाच्या मार्गात येणारे भले मोठे दगड हे अडचण न समजता आव्हान म्हणून स्वीकारा, जेणेकरून भविष्य सोन्यासारखे उजळून निघेल.
एक राजा होता. त्याला आपल्या प्रजेची परीक्षा घ्यावीशी वाटली. एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून त्यांची भूमिका ते कसे पार पाडतात, हे त्याला जाणून घ्यायचे होते. यासाठी राजाने सेवकांना सांगून एक युक्ती केली.
एका रात्री राजाने सैनिकांना सांगून राज्याच्या रोजच्या वर्दळीच्या जागी भला मोठा दगड टाकायला लावला. दुसऱ्या दिवशी सकाळपासून राजा गुप्त वेषात गावकऱ्यांवर नजर ठेवून होता.
सकाळ झाली, तशी लोकांची वर्दळ सुरू झाली. कामानिमित्ताने लोक त्या मुख्य रस्त्याने ये-जा करू लागले. तिथून जात असताना कोणी दगडाकडे दुर्लक्ष करत बाजून निघून गेले, तर कोणी राज्यकारभाराला दोष देत चिडचिड करत जाऊ लागले. मात्र कोणीही दगड बाजूला घेण्याचे कष्ट घेतले नाहीत.
एका दगडामुळे तिथल्या दळणवळणाच्या मार्गावर अडचण येत असल्याचे पाहून बाजारात आलेला एक शेतकरी दगडाजवळ गेला. हातातली पिशवी धोतराला खोचून त्याने पूर्ण ताकदिनीशी दगड हलवायला सुरुवात केली. आजूबाजूने जाणारे लोक त्याच्याकडे बघत होते, परंतु मदत करायला कोणीही सरसावले नाही. राजा ते पाहत होता. शेतकऱ्याने प्रयत्नांची शर्थ करून दगड बाजूला केला आणि पाहतो तर काय, तिथे मोहरांची थैली पडली होती. त्याने ती कुतुहलाने पाहिली, तेव्हा राजा तिथे येऊन म्हणाला 'कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून ही सुवर्ण मोहरांची थैली तुम्हाला भेट देत आहोत.'
या छोट्याशा गोष्टीवरून मोठा बोध घ्यायला हवा, तो म्हणजे अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, परंतु कोणी अडचणींकडे दुर्लक्ष करत जगत राहतो, कोणी अडचणींसाठी दुसऱ्यांना दोष देतो, तर कोणी अडचणी दूर व्हाव्यात म्हणून प्रयत्न करतो. अशा प्रयत्न करणाऱ्या माणसालाच भविष्यरूपी सुवर्ण मोहोरांची थैली मिळते. त्यामुळे यशाच्या मार्गात येणारे भले मोठे दगड हे अडचण न समजता आव्हान म्हणून स्वीकारा, जेणेकरून भविष्य सोन्यासारखे उजळून निघेल.