Shakambhari Navratri: शाकंभरी नवरात्रीनिमित्त जाणून घ्या ललितात्रिपुरसुंदरीचे मंदिर आणि त्यामागील अद्भुत कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 10:32 AM2023-01-02T10:32:20+5:302023-01-02T10:32:45+5:30

Shakambhari Navratri: मुंबई-मंगळुरू महामार्गावरून कधी गेलात तर या मंदिराला अवश्य भेट द्या, सविस्तर जाणून घ्या.

Shakambhari Navratri: On the occasion of Shakambhari Navratri, know about the temple of Lalitatripursundari and the amazing story behind it! | Shakambhari Navratri: शाकंभरी नवरात्रीनिमित्त जाणून घ्या ललितात्रिपुरसुंदरीचे मंदिर आणि त्यामागील अद्भुत कथा!

Shakambhari Navratri: शाकंभरी नवरात्रीनिमित्त जाणून घ्या ललितात्रिपुरसुंदरीचे मंदिर आणि त्यामागील अद्भुत कथा!

googlenewsNext

>> सुजीत भोगले 

आदि शंकराचार्य लहान असतानाची गोष्ट. कालडी गावात एक श्री ललितात्रिपुरसुंदरीचे मंदिर होते. आचार्यांचे वडील शिवगुरू त्या मंदिराचे पुजारी होते. आचार्य रोज वडिलांबरोबर मंदिरात जात. देवीची पूजा करत. वडील देवीला प्रसाद अर्पण करत आणि नंतर ते दूध आचार्यांना देत असत आणि ते आचार्यांना सांगायचे देवीने निम्मे दुध प्यायले आहे आणि निम्मे मी तुला देतोय. 

एके दिवशी वडील बाहेरगावी जातात. आचार्य घरच्या नोकराबरोबर मंदिरात जातात. देवीची पूजा करतात. दुग्ध प्रसाद अर्पण करतात. देवी प्रकट होतच नाही, ना दुध पिते. आचार्य तिची विनवणी करतात परंतु तरीही देवी प्रकट होत नाही. मग आचार्य देवीसमोर हट्ट करतात. देवी द्रवते आणि प्रकट होते. आचार्य तिला प्रसाद ग्रहण करण्याची विनवणी करतात. आचार्यांचे लोभस रुपडे आणि गोड आळवणी यामुळे देवी प्रसन्न होते आणि दुध पिऊन टाकते. देवीने सर्व दुध प्यायलेले पाहून आचार्य रडू लागतात आणि देवीने समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी थांबत नाहीत. मग जगन्माता श्री ललिता त्रिपुरसुंदरी त्या बालकाला मांडीवर घेते आणि त्याला स्तनपान देते. 

असे म्हणतात देवीचे स्तन्य प्राशन केल्यावर आचार्यांचे देहभान हरपते आणि भानावर येतात तर देवी गुप्त झालेली असते आणि आचार्यांना देवीने दुग्धासह वेदांचे संपूर्ण ज्ञान प्रदान केलेले असते.  पुढे आचार्य मोठे होतात. गुरुकडून वेदविद्या लौकिकार्थाने ग्रहण करतात. संन्यास घेतात. श्री ललिता त्रिपुरसुंदरीचे मुल स्थानं कुटजशैल पर्वत आहे. आचार्यांची इच्छा असते की देवीच्या मुलस्थानी तिची उपासना करून तिला जागृत करायचे आणि तिला आपल्या जन्मगावी घेऊन जायचे आणि तिचा चेतनाअंश तिथे स्थापन करायचा. 

आचार्य कुटजशैल पर्वतावर जातात. तिथे आचार्य आले आहेत हे पाहून स्थानिक वनवासी आनंदित होतात. त्यांचा राजा आचार्यांच्या सन्मानार्थ तिथे एक ध्वजस्तंभ स्थापन करतो. हा ध्वजस्तंभ wrought iron अर्थात ओतीव लोखंडाचा आहे, त्या ध्वजस्तंभावर भगवा डौलाने फडकू लागतो. आचार्य देवीच्या मुलस्थानी असलेल्या गुहेत जातात. देवीची आराधना करतात. तिला प्रसन्न करून घेतात आणि आपला मनोदय सांगतात. देवी आचार्यांना सांगते मी तुझ्यासह येण्यास तयार आहे. पण माझी एक अट आहे. तू समोर चालायचे, मागे वळून पाहायचे नाही. माझ्या पैंजणांचा आवाज येत असेल. आचार्य मान्य करतात. 

कुटजशैल पर्वतावरून आचार्य आणि देवी यांचा प्रवास सुरु होतो. ( या पोस्टसह असलेले चित्र आचार्य आणि श्री ललिता त्रिपुरसुंदरीचे आहे ) एका विशिष्ट स्थानी आल्यावर पैंजणांचा आवाज थांबतो. आचार्य अनवधानाने मागे वळून बघतात. देवी सुंदर हास्य करते आणि वरदायिनी रुपात आचार्यांना दर्शन देते आणि सांगते. हे कोल्लूर स्थान आहे. इथे मी कोलासुर या राक्षसाचा वध केला होता. या स्थानी माझे मंदिर स्थापन कर. मी पुढे येणार नाही. 

देवी प्रकट होते त्या स्थानी एक स्वयंभू शिवलिंग दिसते. ज्याच्या एका बाजूला ब्रह्मा विष्णू आणि महेश ऐक्यरुपात स्थित आहेत आणि वामांगी महासरस्वती , महालक्ष्मी आणि महाकाली स्थित आहे. यांना विलग करणारी रेखा म्हणजे किराट-अर्जुन युद्ध प्रसंगी अर्जुनाच्या आघाताने शिवाच्या भाळी झालेला आघात आहे. या शिवलिंगासमोर आचार्य श्रीयंत्रारूढ अशी शिवशक्तीऐक्य स्वरूपिणी मूर्ती घडवून तिची स्थापना करतात. ते पूर्ण शक्तीपीठ म्हणजे श्री कोल्लूर मुकाम्बिका. देवीच्या ध्यान श्लोकातील उल्लेख : त्रिमुर्त्यैक्य स्वरूपिणी त्रिगुणात्मिका श्री मुकाम्बिका देवता असा आहे.

आचार्यांनी कुटज शैल पर्वतावर ज्या खडकावर बसून समुद्राकडे तोंड करून उपासना केली तिथे शंकराचार्य छत्री आहे. तिथून आपल्याला अरबी समुद्र दिसतो. कुटज शैल पर्वतावर आजही आपल्याला तो wrought iron चा ध्वजस्तंभ दिसतो. जसाच्या तसा आहे. पश्चिम घाटात, समुद्रापासून जवळ असूनही २४०० वर्षे झाली त्या स्तंभाला आजवर साधा गंज सुद्धा लागलेला नाही. या स्तंभाचे कार्बन डेटिंग आय आय टी बंगलोर वाल्यांनी केले. कालखंड कमीत कमी २४०० वर्ष पूर्वीचा आला. आचार्यांच्या जन्मतारखेला निश्चित करण्यासाठी हा एक मोठा वैज्ञानिक पुरावा आहे. कारण बहुसंख्य परंपरावादी मंडळी आचार्य इसवीसन ७९२ साली जन्मले असे म्हणतात.  

कसे जावे? 

  • कुटज शैल पर्वताचे स्थानिक नाव कोडचाद्री. 
  • कोल्लुर हे गाव मुंबई-मंगळुरू महामार्गावर बेंदूर फाट्यावरून तीस किलोमीटर आत आहे. 
  • कोल्लुर गाव हे श्री मुकांबिका butterfly sanctury च्या मध्यभागी आहे. 
  • इथून 60 किलोमीटर वर श्रुंगेरी आहे.
  • कोल्लुर वरून महिंद्राच्या उघड्या जीप आहेत. 
  • जायला चार तास , यायला चार तास .
  • पावसाळ्याचे चार महिने ही सेवा बंद असते.

महत्वाची गोष्ट: 

हे कर्नाटकात आहे. एकेकाळी हा भाग मराठा साम्राज्यात होता.  मंगळुरूच्या जवळ एक खेडे आहे. त्या संपुर्ण गावात फक्त चित्तपावन ब्राह्मण रहातात आणि आजही चित्तपावनी भाषेत बोलतात. ब्रिटिशांनी त्यांच्या सोईसाठी म्हणून जोग च्या धबधब्याच्या अलिकडे बॉम्बे प्रोव्हिन्स आणि पलिकडे मैसुर प्रोव्हिन्स केले. त्यात हा सगळा भाग मैसुरमध्ये गेला. 

Web Title: Shakambhari Navratri: On the occasion of Shakambhari Navratri, know about the temple of Lalitatripursundari and the amazing story behind it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.