Shakambhari Purnima 2025: आई तुळजाभवानीचे रूप असलेली देवी बनशंकरी हिच्या मंदिराची घेऊया माहिती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:26 IST2025-01-13T13:26:21+5:302025-01-13T13:26:46+5:30
Shakambhari Purnima 2025: आज शाकंभरी नवरात्रीचा शेवटचा दिवस, त्यानिमित्त भरपूर भाज्या देणाऱ्या या देवीचे मंदिर कुठे आणि कसे आहे ते पाहू.

Shakambhari Purnima 2025: आई तुळजाभवानीचे रूप असलेली देवी बनशंकरी हिच्या मंदिराची घेऊया माहिती!
>> योगेश काटे, नांदेड
आज पौष पौर्णिमा अर्थात् शाकंभरी पौर्णिमा (Shakambhari Purnima 2025). आज शाकंभरी देवीची पूजा करून या नवरात्रोत्सवाची सांगता केली जाते. या देवीचे वर्णन केले आहे- शाकंभरी नीलवर्णानीलोत्पलविलोचना। मुष्टिंशिलीमुखापूर्णकमलंकमलालया।। स्वतःला नीलवर्णी असूनही सर्व भाविकांना भरपूर प्रमाणात हिरव्या भाज्या देणारी ही देवी आहे.
ही शाकंभरी देवी म्हणजेच देवी बनशंकरी! ही देवी म्हणजे शक्तिपीठ आई तुळजाभवानीचे स्वरूप. महाराष्ट्राजवळील कर्नाटकात भगवतीचे हे मंदीर महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागातील अनेक कुटुंबांची ही कुलस्वामिनी म्हणजे बदामी येथील बनशंकरी आहे. पुराणांनुसार एकदा शंभर वर्षांचा दुष्काळ पडला, तेव्हा आई भगवतीने आपल्या शरीरातून शाकभाज्या निर्माण केल्या. (शाकान् बिभर्ति इति). त्याचप्रमाणे पाताळातून हरिद्रातीर्थाचे पाणी आणून लोकांच्या जीविताचे रक्षण केले. म्हणजेच भाविकांची भूक, तहान भागवले.
कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यातील बादामी शहराजवळच्या चोलचगुडू (या भागाचे प्राचीन नाव तिलकवन असे होते.) येथे असलेल्या शाकंभरीच्या मूळ मंदिराची बांधणी सुमारे तेराशे वर्षांपूर्वी झाली असावी. विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील निर्मल शहराचा राजा पद्मराज ह्याने हे मंदिर बांधले, असा पुराणग्रंथात उल्लेख आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर हरिद्रातीर्थ तलाव आहे. मूर्ती अष्टभुजा असून ती सिंहारूढ असल्याचे दिसते. सिंहाच्या गळ्यात रुंडमाळा आहेत. दुर्गेचे एक नाव कांतारवासिनी आहे. बनशंकरी ह्या नावाशी त्याचे साधर्म्य दिसते.
ह्या देवीच्या नवरात्राचा उत्सव पौष शुद्ध सप्तमीपासून (काही ठिकाणी अष्टमीपासून) सुरू होऊन, तो पौर्णिमेला संपतो. हे शाकंभरी नवरात्र होय.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।