Shani Amavasya 2023:मौनी अमावस्येला होतोय शनीचा शुभ संयोग, सर्वांवर होणार शनिदेवाच्या कृपेचा वर्षाव; पण....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 05:54 PM2023-01-20T17:54:53+5:302023-01-20T17:55:30+5:30
Shani Amavasya 2023: यावेळी मौनी अमावस्येला शनिदेवाचा शुभ संयोग होत आहे. अशा स्थितीत या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
हिंदू धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. हा उत्सव दरवर्षी पौष महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. यंदा पौष महिन्यातील मौनी अमावस्या २१ जानेवारी, शनिवारी येत आहे. या कारणास्तव ही अमावस्या अनेक प्रकारे विशेष मानली जाते. शनिवारी मौनी अमावस्या आल्याने यावेळी शनिदेवासाठी शुभ संयोग निर्माण होत आहे. अशा स्थितीत यावेळी मौनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा केल्यास अनेक शुभफल प्राप्त होईल असे भाकीत ज्योतिष शास्त्राने सांगितले आहे.
साडेसाती:
या वर्षी शनि अमावस्याही मौनी अमावस्येच्या दिवशी आहे. या मुहूर्तावर विशेषतः ज्यांना साडे साती आहे आणि ज्यांना नाही त्यांनीसुद्धा अंघोळ झाल्यावर सोवळ्यात शनी देवाची पूजा करावी. देवघरात शनी देवाची प्रतिमा नसेल तर तर मारुती रायासमोर बसून शनी स्तोत्र म्हणावे आणि शनिदेवाच्या नावे काळे तीळ आणि मोहरीचे तेल काढून शनी मंदिरात जाऊन अर्पण करावे. शनीच्या संक्रमणामुळे ज्या राशींवर शनीची साडेसाती आणि धैय्या सुरू झाल्या आहेत. त्यांना या उपायाने निश्चित फायदा होईल.
मुहूर्त:
हिंदू कॅलेंडरनुसार, या दिवशी मौनी अमावस्या २१ जानेवारी रोजी सकाळी ६. १७ ते २२ जानेवारी रोजी दुपारी २. २२ पर्यंत असेल. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू मौनी अमावस्येला प्रयागराजच्या संगमावर स्नान करण्यासाठी येतात. तसेच या दिवशी हरिद्वारमधील गंगा, उज्जैनमधील शिप्रा आणि नाशिकमधील गोदावरीत स्नान केल्यास अमृताच्या थेंबांचा स्पर्श होतो. मात्र आपल्यासारख्या संसारी लोकांना या संधीचा लाभ घेता आला नाही तरी घरच्या घरी स्नान करताना गंगा, गोदावरीचे स्मरण केले तरी मानसपूजेने पुण्यस्नान लाभेल.
उपासना :
यावेळी मौनी अमावस्या शनिवारी येत आहे. अशावेळी शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करावे आणि शनि चालिसाचे पठण करावे. याशिवाय शनिदेवाला काळे तीळ अर्पण करून शनिदेवाची आरती करावी. तसे केल्यास सर्वच राशीच्या लोकांवर शनिदेवाच्या कृपेचा वर्षाव होईल हे निश्चित!