Shani Dev: शनी देव ज्यांच्या राशीला जातात त्यांना त्रास का होतो? ब्रह्मवैवर्त पुराणात सापडते कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 07:00 AM2023-07-08T07:00:00+5:302023-07-08T07:00:01+5:30
Shani Dev : शनी देव राशीला आले की अनेकांच्या जीवनात उलथा पालथ होते, त्यांच्या येण्याने आपल्याला त्रास का होतो यामागे सांगितली जाते कथा!
शनिदेवाचे नाव येताच काही लोक घाबरतात. लोकांना वाटते की शनिदेव नेहमी क्रोधित असतात आणि अशुभ परिणाम देतात. मात्र, तसे नाही. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. शनि हा सेवा आणि कृतीचा कारक आहे. असे म्हटले जाते की शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. तुमचे कर्म चांगले नसेल तर आपली वक्र दृष्टी टाकून शिक्षा देतात. ती शिक्षा मात्र अतिशय कठोर असते. परंतु शनी देवांचा स्वभाव वज्राहून कठोर का बनला, जाणून घेऊया त्यामागील पौराणिक कथा!
पिता पुत्राचे वैर :
शनी देव हे सूर्य पुत्र आहेत. असे असूनही शनिदेवाचा काळसर रंग पाहून सूर्यदेवाने पत्नी छायावर संशय घेतला आणि तिचा अपमान केला आणि सांगितले की हा माझा मुलगा होऊ शकत नाही. मातेच्या तपाचे सामर्थ्य शनिदेवातही आले होते आणि त्यांनी रागाने वडील सूर्यदेवांकडे पाहिले तेव्हा सूर्यदेव पूर्णपणे काळे झाले, त्यांच्या घोड्यांची हालचाल थांबली. त्रस्त झाल्याने सूर्यदेवांना भगवान शंकराचा आश्रय घ्यावा लागला. यानंतर भगवान शिवाने सूर्यदेवाला आपली चूक कळवून दिली. सूर्यदेवाने आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. त्यानंतर त्याला पुन्हा त्याचे खरे रूप मिळाले. पण पिता पुत्राचे बिघडलेले नाते सुधारले नाही. या प्रसंगाने शनी देवांची जन्मतः दृष्टी पालटली आणि प्रत्येक अपराध्याला कठोर शिक्षा देण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले.
तसेच आणखी एक कारण :
ब्रह्म वैवर्त पुराणानुसार शनिदेव हे श्रीकृष्णाचे परम भक्त होते. शनिदेव तरुण झाल्यावर त्यांचा विवाह चित्ररथाच्या कन्येशी झाला. शनिदेव भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये इतके लीन झाले होते की ते आपल्या पत्नीकडे लक्षही देऊ शकत नव्हते. हे पाहून त्याची पत्नी संतप्त झाली आणि तिने शनिदेवाला शाप दिला की ते ज्यांच्या सहवासात अधिक काळ राहतील त्याचा नाश होईल. शनिदेवाने त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. राग शांत झाल्यावर पत्नीलाही आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि ती आपला शाप परत घेऊ शकली नाही. या कारणास्तव असे मानले जाते की शनी देव ज्यांच्या राशीला जातात त्यांना फार जपून राहावे लागते आणि शनी देवांचा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांच्या परीक्षेला सामोरे जावे लागते!