Shani Jayanti 2024: शनी जयंतीला शनी देवाच्या दर्शनाला जाल तेव्हा 'या' चुका आवर्जून टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 03:01 PM2024-06-05T15:01:40+5:302024-06-05T15:02:18+5:30
Shani Jayanti 2024: ६ जून रोजी शनी जयंती आहे, त्यादिवशी शनी देवाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते, त्याबरोबरच पाळावे लागतात काही नियम!
न्याय आणि शिस्तप्रिय देवता अशी ओळख असणारे शनिदेव यांची जर एखाद्या व्यक्तीला कृपा लाभली तर ती व्यक्ती आयुष्यात सर्व प्रकारची सुखं उपभोगते. आणि जी व्यक्ती त्यांच्या नाराजीला कारणीभूत ठरते ती अगदी रसातळाला जाते. यासाठी आपला आचार, विचार शुद्ध असावा लागतो. ६ जून २०२४ रोजी शनी जयंती आहे. त्यानिमित्त तुम्ही शनी मंदिरात दर्शनासाठी जाणार असाल तर पुढे दिलेल्या चुका आवर्जून टाळा!
लोक शनिदेवाला घाबरून त्यांची पूजा करतात. मात्र तसे करण्याचे काहीच कारण नाही. ज्याप्रमाणे आपण प्रामाणिकपणे खरेदी करत असू तर आपल्याला दुकानातल्या सीसीटीव्हीची भीती नाही, त्याचप्रमाणे आपले कर्म चांगले असेल तर शनी देवाचा कोप होईल ही भीती बाळगण्याचे कारण नाही! फक्त त्यांच्या उपासनेत पुढील गोष्टींची काळजी घ्या.
शनिदेवाच्या डोळ्यात पाहू नका
शनी देव हे सूर्यपुत्र आहेत. ज्याप्रमाणे सूर्याकडे आपण फार काळ पाहिल्यास डोळ्यासमोर अंधारी येते, त्याचप्रमाणे शनी देवाच्या डोळ्यातील प्रखर ऊर्जा आपल्याला मानवणार नाही. म्हणून शनिदेवाची पूजा करताना पूजेच्या वेळी डोळे बंद करा किंवा त्यांच्या पायांकडे पाहून पूजा करा. एकार्थी शनी देवासमोर नम्र व्हा असे शास्त्रकारांनी सुचवले आहे.
पाठ दाखवू नका
देवदर्शन घेताना सामान्यपणे आपण हा नियम पाळतोच, तो म्हणजे देवाला पाठ न दाखवण्याचा! शनी मंदिरात गेल्यावरही हा नियम लक्षात घेऊन दर्शन झाल्यावर मंदिराबाहेर पडताना देवाला पाठ दाखवू नका, तर देव दर्शन घेत बाहेर पडा. पाठ दाखवणे या संज्ञेचा मराठीत अर्थ पाठींबा काढून घेणे, मदत न करणे, दुर्लक्ष करणे असा होतो. म्हणून देवाचे दर्शन घेऊन निघताना आपण देवाला पाठ दाखवू नये, जेणेकरून आपण हाक मारल्यावर तोही आपल्याला पाठ दाखवणार नाही.
लोखंडी भांड्यातून तेल अर्पण करावे
शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीला मोहरीचे तेल अर्पण केले जाते. मोहरीचे तेल शनी देवाला प्रिय असते तसेच लोखंड हा शनी देवाचा आवडता धातू असल्याने लोखंडी भांड्यातून अर्पण केलेले तेल शनी देवाला अधिक प्रिय ठरते.
पश्चिम दिशेला पूजा
शनिदेवाची पूजा करताना दिशा लक्षात ठेवा. तसे, लोक पूर्वेकडे तोंड करून पूजा करतात. पण शनिदेव हा पश्चिमेचा स्वामी असल्याचे मानले जाते. त्यामुळे शनिदेवाची पूजा करताना पश्चिमेकडे तोंड करावे.