Shani Vakri 2024: २९ जून रोजी शनी वक्र; 'या' सहा राशींना पुढील चार महिने मिळणार शुभ-अशुभ फळं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 02:59 PM2024-06-28T14:59:30+5:302024-06-28T15:00:06+5:30
Shani Vakri 2024: २९ जून ते १५ नोव्हेंबर हा काळ सहा राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे, शनी वक्री जात असल्याने काय बदल होणार आहेत ते जाणून घ्या.
>> चेतन साळकर (ज्योतिष भास्कर)
शनी महाराज दर वर्षी वक्री होत असतात. तसेच ते या वर्षी देखील वक्री होत आहेत. २९ जून ला शनी महाराज वक्री होऊन १५ नोव्हेंबर ला मार्गी होतील. चार महिन्यांचा हा कालावधी असणार आहे. ३ ऑक्टोंबर रोजी शनी महाराज शततारका नक्षत्रात प्रवेश करतील वक्री अवस्थेत.
शनी महाराज हे साधेसुधे ग्रह नाहीत. प्रचंड प्रभाव देणारे ग्रह मंडळातील सर्वार्थाने उच्च आणि सन्माननीय असणारे ग्रह आहेत. त्यांच्या जराशा हालचाली ने सुध्दा आपल्यावर प्रभाव येतात. नक्षत्र बदल , राशी परिवर्तन , वक्री - मार्गी भ्रमण हे शनी चे अवस्था रूप खूप बदल घडवत असत.
आज या लेखाच्या माध्यमातून हेच शनीचे वक्री भ्रमण आपण एकंदरीत कसे असेल हे जाणून घेऊयात. . !!
भ्रमणावस्था :
इतर ग्रह वक्री होणे आणि शनी वक्री होण्यात फार तफावत आहे. इतर ग्रह वक्री झाले तरी त्यांच्या फळांना तेवढा ठामपणा येईलच असे नाही पण, शनी महाराजांच्या फळांना तिथे प्रचंड झळाळी येते. त्यांची फळे अगदी निश्चित मिळतात. हेच शनी महाराज प्रत्येक लग्न आणि राशीला विविध प्रभाव देतात. इथे आपण शनी महाराज साधारण कसे आणि काय फळं देणार याचा ओझरता अंदाज घेणार आहोत.
वर्गीकरण :
खरंतर प्रत्येक राशी आणि लग्नाला शनी महाराज हे प्रभाव दिल्याशिवाय राहत नाही. इथे कोणत्या राशीला शुभ आणि कोणत्या राशीला अशुभ असे वर्गीकरण करण्यात अर्थ नाही. सर्वांनाच शुभ अशुभ दोन्ही फळे मिळणार आहेत. इथे कोणत्या राशीला शुभ आणि अशुभ हे बघण्यापेक्षा शनी महाराज नेमके कसे फळाचे स्वरूप ठेवणार आहेत ते पाहुयात. . .
फळाचे स्वरूप :
वक्री शनी महाराज म्हणजे आधीच संथ त्यात आणखी विलंब असे होईल. ज्या फळाची अपेक्षा आपण करत आहात त्या फळात विलंब तर होईलच पण ते मिळताना संघर्ष , स्ट्रगल होईल. आर्थिक व्यवहार असतील तर रखडतील किंवा मिळतील पण तुमच्या मनाप्रमाणे नाही. तुमची जी अपेक्षा असेल त्यापेक्षा कमी. लाभ होण्याशी संबंधित शनी असेल तर मिळताना अनेक प्रयास करावे लागतील.
ज्या स्थानावर दृष्टी असेल तिथे फळं सुध्दा कोलमडून पडेल. कोलमडून पडेल म्हणजे अशुभ फळं मिळणार असे नाही तर फळाची प्रत आणि दर्जा , तसेच त्यातून मिळणारा आनंद सुखावह नसेल. प्रयत्न करून करून हाती आलेले यश कापुरासमान भासेल. क्षणात विरून जाईल. ज्या ग्रहावर दृष्टी टाकेल त्या ग्रहाला तो मंद करेल. सध्या वक्री होताना त्याची दृष्टी मंगळावर आहे. मंगळ ग्रहाचे फळं मिळताना घुसमट होईल. फ्रस्ट्रेशन येईल. बुध्दी आणि विवेक काम करणे कमी करतील. मार्ग भटकल्याचा भास होईल. अशावेळी मुळ कुंडली चांगली असेल तर निभावून जाईल अन्यथा नैराश्य हाती लागेल.
ज्यांना साडेसाती आहे त्यांच्यासाठी हा वक्री काळ तर पितळ उघडे पडण्यासाठी शनी महाराजांचा सापळा आहे. तुमच्याच वागणुकीतून तुम्हालाच आपले परके यांची जाणिव होईल.
धनु - मकर - कुंभ - मेष - मीन - सिंह - कर्क या लग्न राशिंना काहीसा अशुभ फळांकडे झुकणारा हा काळ असेल. जर तुम्हाला दशा नसतील आणि मुळ कुंडलीत शनी महाराज सुस्थितीत असतील तर फार त्रास जाणवणार सुध्दा नाही. वक्री काळ कधी आला आणि कधी गेला कळणार सुध्दा नाही.
इतर राशिंसाठी काळ मध्यम राहील. कन्या - कर्क - मीन या लग्न राशींना मात्र थोडा त्रासदायक जाण्याची चिन्हे आहेत.
संपर्क : 7410190922