Shardiya Navratri 2023: यंदा देवीचे वाहन असेल गजराज, नवरात्र ठरेल खास; वर्षभर शुभ-लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 03:13 PM2023-10-07T15:13:03+5:302023-10-07T15:13:03+5:30
Shardiya Navratri 2023: देवी आगमनाच्या वाहनावरून आगामी वर्ष कसे जाऊ शकेल? देशातील परिस्थितीचा कशी असेल? याबाबत सांगितले जाते. वाचा...
Shardiya Navratri 2023: पितृपक्ष समाप्त झाल्यानंतर अश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. यानंतर पुढील नऊ दिवस नवरात्र साजरी केली जाते. संपूर्ण देशात नवरात्रौत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते. या नऊ दिवसांत देवीच्या विविध नऊ स्वरुपांची पूजा, आराधना, नामस्मरण केले जाते. वास्तविक पाहता मराठी वर्षात ४ नवरात्र साजरी केली जातात. मात्र, चैत्र आणि शारदीय नवरात्राला विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते. दसरा किंवा विजयादशमीला नवरात्राची सांगता होते. नवरात्रात देवीचे आगमन कोणत्या वाहनावरून यावरून अनेक गोष्टींचे अंदाज बांधले जातात. जाणून घेऊया...
यंदा सन २०२३ रोजी १५ ऑक्टोबर रोजी नवरात्र सुरू होत आहे. तर दुर्गा देवीचे वाहन गजराज असणार आहे. ज्योतिषशास्त्रात गजराजावरून होत असलेले देवीचे आगमन खूप शुभ मानले गेले आहे. येत्या वर्षभरात देश आणि जगावर काय परिणाम होईल, याबाबतही काही शक्यता वर्तवल्या जातात.
भरपूर आनंद, ज्ञान आणि समृद्धीचे वर्ष
देवी भागवतात असे सांगितले आहे की जेव्हा नवरात्र सोमवार किंवा रविवारी येते तेव्हा देवीचे वाहन गजराज असते. या दिवशी, नवरात्रीच्या वेळी देवी गजराजावर स्वार होऊन येते. देवीचे आगमन आणि त्याचे परिणाम देवी भागवत पुराणात तपशीलवार सांगितले गेले आहेत. देवी भागवत पुराणानुसार, गजराजावरून दुर्गा देवीचे होत असलेले आगमन खूप शुभ असणार आहे. दुर्गा देवी गजराजावर स्वार होऊन येते, तेव्हा ती भरपूर आनंद, ज्ञान आणि समृद्धी घेऊन येते. देशात संपत्ती आणि धान्यात वाढ होऊ शकेल. यासोबतच धान्य कोठारे भरली जातील. देशात सुख-समृद्धी नांदेल. येत्या वर्षभरात चांगला पाऊस होण्याचे हे द्योतक आहे. २३ ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा असून, नवरात्रौत्सव समाप्त होईल.
दरम्यान, नवरात्रौत्सव सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. यावेळी देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाईल. बरेच लोक या दरम्यान अखंड ज्योत लावतात. नवरात्रीत अखंड दिवा तेवत ठेवल्याने घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती होते अशी भक्तांची श्रद्धा आहे.