नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:25 PM2024-10-03T13:25:15+5:302024-10-03T13:25:45+5:30
Shardiya Navratri 2024 Akhand Jyoti Diya: नवरात्रात अनेक घरात अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे. परंतु, अखंड ज्योत संकल्प सोपे नाही. याचे होणारे लाभ अनन्य साधारण असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या...
Shardiya Navratri 2024 Akhand Jyoti Diya: घटस्थापना होऊन नवरात्राची सुरुवात झाली आहे. ०३ ऑक्टोबर २०२४ पासून ते १२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. नवरात्रीनिमित्त घरोघरी देवीची उपासना केली जाते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे नऊ दिवस देवीपुढे लावला जाणारा अखंड दिवा. हा दिवा नऊ दिवस घरात तेवत राहिला पाहिजे. नवरात्रीत लावली जाणारी अखंड ज्योत अतिशय शुभ लाभदायक मानली जाते. जाणून घेऊया...
नवरात्रीच्या नऊ दिवसांत अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरु आहे. अखंड ज्योती म्हणजे असा प्रकाश जो विझत नाही. अखंड ज्योती अखंड तेवत ठेवावी. नवरात्रीत अखंड ज्योतीला खूप महत्त्व आहे. ज्योतीमध्ये दिव्याचा खालचा भाग डावीकडून उजवीकडे लावावा. या प्रकारचा दिवा आर्थिक समृद्धीचा कारक आहे. असे मानले जाते की या प्रकारच्या दिव्यामुळे भाग्य मिळते.
अखंड दिवा सदैव तेवत राहिल्याने सुख, शांती, समृद्धी येते
शास्त्रानुसार पूजेच्या वेळी साधारणतः दोन प्रकारचे दिवे लावले जातात. एक कर्मदीप, जो केवळ पूजेच्या वेळी लावला जातो आणि दुसरा अखंड दिवा, जो कोणत्याही सणाच्या किंवा शुभ कार्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रज्वलित केला जातो. ज्या घरांमध्ये नवरात्रीच्या कलशाची स्थापना झाली आहे, तेथे हा दिवा लावला जातो. अखंड दिवा सदैव तेवत राहिल्याने सुख, शांती, समृद्धी येते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, असे मानले जाते.
कोणत्या दिशेला अखंड दिवा लावावा?
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
दीपज्योति: परब्रह्म: दीपज्योति जनार्दन:
दीपोहरतिमे पापं संध्यादीपं नामोस्तुते।
शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तु ते।।
नवरात्रात अखंड दिवा ज्योत लावताना हा मंत्र अवश्य म्हणावा. देवी भागवत पुराणानुसार अखंड ज्योत दिवा पश्चिम दिशेला ठेवल्यास सुख, समृद्धी आणि संपन्नता येऊ शकते. शास्त्रामध्ये पूर्व दिशा पूजनासाठी सर्वोत्तम दिशा मानण्यात आली आहे. या दिशेला अखंड ज्योत दिवा प्रज्वलित केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होऊ शकते. उत्तर दिशेला अखंड दिवा ज्योत ठेवल्यास, घरात राहणाऱ्या सदस्यांना दीर्घायुष्य लाभते आणि अकाली मृत्यूची भीती दूर होते. परंतु, दक्षिण दिशेला अखंड दिवा ज्योत असू नये. ते शुभ मानले जात नाही.
नवरात्रोत्सवात अखंड दिवा ज्योत तेवत ठेवण्यासाठी काय करावे?
- अखंड दिवा ज्योत लावण्यापूर्वी मनात एक संकल्प करा व तो पूर्ण करण्यासाठी देवीकडून आशीर्वाद मागा.
- अखंड ज्योत रक्षासुत्राने केली जाते. सव्वा हाताचा रक्षासुत्र दिव्याच्या मधोमध ठेवावा. अखंड ज्योतीसाठी शुध्द देशी तुपाचा वापर करा. तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा वापर केला जातो.
- अखंड ज्योत लावण्यापूर्वी दुर्गामाता, गणपती, भगवान शीव यांचे ध्यान करावे नंतर 'ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते' मंत्राचा जप करावा त्यानंतर अखंड ज्योत लावावी. नऊ दिवस झाल्यावर हा अखंड दिवा आपणाहून शांत होऊ द्यावा.
- अखंड दिवा ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा. यामुळे दिव्यात तेल, तूप जास्त प्रमाणात राहू शकेल.
- अखंड दिवा ज्योत लावताना तूप किंवा तेलाचा वापर करावा. दिव्यातील तेल, तूप संपत आले की पुन्हा त्यात तेल - तूप घालावे.
- अखंड दिव्याची वात काहीजण कापूस वापरुन तयार करतात तर कधी रक्षा सूत्राचा देखील वापर केला जातो. जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तयार करुन घ्या. जर रक्षा सूत्राचा वापर करणार असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे. रक्षा सूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात यामुळे ज्योत अखंड तेवत राहते.
- अखंड दिवा लावण्यासाठी त्यात तेल - तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदळाचे दाणे घालावेत.
- अखंड दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा, जेणेकरुन त्याची ज्योत विझण्याची भीती राहत नाही.
- अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला विसरु नका. ठराविक तासांनी ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी. यामुळे दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते. काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विझत नाही, याउलट वात लहान असेल तर ती पटकन विझते यामुळे काजळी काढतांना विशेष लक्ष देणे गरजेचे असते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.