हिताचिया गोष्टी सांगू एकमेका, शोक, मोह, दु:खा निरसू तेणे -चांगल्या गोष्टींचे 'शेअरिंग' महत्त्वाचे! (पूर्वार्ध)
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: November 2, 2020 02:53 PM2020-11-02T14:53:37+5:302020-11-02T14:55:09+5:30
शेअरिंग करायचेच असेल, तर ते चांगल्या गोष्टींचे केले पाहिजे. वाईट गोष्टींच्या तुलनेत चांगल्या गोष्टी 'व्हायरल' होणे गरजेचे आहे.
ज्योत्स्ना गाडगीळ
समाज माध्यमांवर एक ऑप्शन दिलेला असतो, `शेअर' करण्याचा! तुम्हाला जी गोष्ट आवडते, माहिती मिळते, गोष्टी कळतात, त्या फक्त स्वत:पुरत्या मर्यादित ठेवू नका, तर त्या इतरांबरोबरही वाटत चला. शेअरिंग करण्याची मनुष्याला उपजत सवय असते. एखादी गोष्ट कळल्यावर ती दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्याला स्वस्थ वाटतच नाही. या संदर्भात एक मजेशीर गोष्ट आहे.
एक राजा होता. त्याला एक कान नव्हता. हे गुपित कोणाला कळू नये, म्हणून तो ठरलेल्या केशकर्तनकाराकडून केस कापून घेत असे. एकदा तो आजारी पडला. राजाने बोलावूनही येऊ शकला नाही. त्याने नाईलाजाने आपल्या मुलाला पाठवले. राजाने विश्वासाने त्याच्यासमोर मान झुकवली. मुलाने आपले काम सुरू केले. डाव्या बाजूचे केस कापण्यासाठी त्याने राजाची मान फिरवली, तोच राजाचे गुपित त्याला कळले. राजाला काही बोललो, तर तो आपला शिरच्छेदच करेल, या विचाराने मुलगा काम संपवून घरी परतला. वडिलांशी याबाबत बोलणार, तर ते आजारी! हे कोणालातरी सांगण्याची उबळ त्याला स्वच्छ बसू देईना. तो थेट जंगलात गेला. सभोवताली कोणी नाही, याची त्याने खात्री केली आणि तिथल्या एका झाडाजवळ जाऊन त्याने राजाचे गुपित सांगितले, तेव्हा कुठे त्याला बरे वाटले.
हेही वाचा : क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला, तर पश्चात्तापाचे शंभर क्षण वाचतात!
तो आनंदाने घरी परतला. आता राजाही त्यालाच केशकर्तनासाठी बोलावू लागला. सगळे काही सुरळीत सुरू होते. एक दिवस राजाच्या दरबारात गायन-वादनाची मैफल आयोजित केली होती. नृत्य झाले, गायन झाले आता बासरीवादनाने मैफल संपणार म्हणून सगळे जण जीवाचे कान करून बसले होते. बासरी वादकाने नवीन घडणावळीतल्या बासरीचा राजासमोर शुभारंभ केला आणि एक दोन सरांच्या पाठोपाठ बासरीतून आवाज येऊ लागला, `राजाला कान नाहीत, राजाला कान नाहीत.' वादकाने घाबरून वादन थांबवले. सर्वांच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले. राजाने सभा बरखास्त केली आणि केशकर्तनकाराच्या मुलाला आपल्या दालनात बोलावून घेतले. राजाने त्याला विचारले, `हे गुपित तू आणि तुझ्या वडिलांशिवाय अन्य कोणालाच माहित नाही. तुझ्या वडिलांवर माझा पूर्ण विश्वास आहे, पण तू माझा विश्वासघात केलास.'
मुलगा रडकुंडीला येऊन म्हणाला, `महाराज शपथेवर सांगतो, मी कुणालाच हे सांगितले नाही. फक्त एकदा जंगलात जाऊन मन मोकळे करून आलो होतो, पण तेव्हाही आजूबाजूला कुणीच नव्हते. तरी हे गुपित कसे बाहेर आले, मला खरच माहित नाही.' राजाने त्याला अभय दिले आणि बासरीवादकाला बोलावून घेतले. बासरीवादकाने सांगितले, `महाराज, ही बासरी मी आज प्रथमच वाजवत आहे. आपल्या राज्यातल्या एका कारागीराने मला ही बनवून दिली. मात्र, त्यातून जी सुरावट निघाली, त्यापासून मीसुद्धा अनभिज्ञ आहे.'
राजाने कारागीराला बोलावून घेतले, त्याला हे गुपित कसे कळले, याची माहिती घेतली. कारागीर माफी मागत म्हणाला, `महाराज, मला काय बी माहीत न्हाई. जंगलातून चांगले बांबू तोडून आणले, त्याची बासरी बनवली. अशा शेकडो बासऱ्या मी बनवतो. पण हा प्रकार मला अजिबात ठाऊक नाही.'
सर्व प्रकार ऐकल्यावर राजाला कळले, की केशकर्तनकाराच्या मुलाने जंगलात जाऊन हे गुपित सांगितले, ते बांबुच्या झाडांनी ऐकले. ते शब्द बासरीवाटे वादकाच्या वादनातून उमटले आणि आपले गुपित जगजाहीर झाले. यात चूक कोणाचीच नाही. सत्य कितीही दडपून ठेवले, तरी आज ना उद्या ते बाहेर येतेच.
म्हणून शेअरिंग करायचेच असेल, तर ते चांगल्या गोष्टींचे केले पाहिजे. वाईट गोष्टींच्या तुलनेत चांगल्या गोष्टी `व्हायरल' होणे गरजेचे आहे. त्या चांगल्या गोष्टी कोणत्या, ते पुढच्या भागात सांगत आहेत, संत नामदेव महाराज!
(क्रमश:)