Shattila Ekadashi 2024: रोगमुक्तीसाठी षटतिला एकादशीला करा तिळाचे दान आणि विष्णूउपासना!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 07:00 AM2024-02-06T07:00:00+5:302024-02-06T07:00:02+5:30
Shattila Ekadashi 2024: आज षटतिला एकादशी आहे, त्यानिमित्त तिळाचे दान आणि विष्णूंची उपासना करताना दिलेले मंत्र आवर्जून म्हणा, लाभ होईल!
६ फेब्रुवारी रोजी षटतिला एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णूंना तीळ अर्पण करून पूजा केली जाते. या दिवशी तिळाचे दान केले जाते. असे मानले जाते की तिळाचे दान केल्याने भगवान विष्णूंची कृपा होते, सर्व प्रकारच्या रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते. यासाठी विष्णू पूजेला जोड द्या भगवान श्लोकांची!
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् , विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् |
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् , वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ||
अर्थ : क्षीरसागरात शेषशय्येवर भगवान महाविष्णू पहुडले आहेत. ते विश्वाचा आधार आहेत आणि सर्व विश्वावर लक्ष ठेवून आहेत. ते लक्ष्मीपती आहेत, आपल्या कमल नयनांनी विश्वाकडे कारुण्याने, ममत्वतेने पाहत आहेत. त्यांचा रंग सावळा आहे, परंतु, त्या रंगात अखिल विश्व सामावले आहे. अशा महाविष्णूंना माझा नमस्कार असो.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।।
अर्थ : भगवान महाविष्णूंनी समस्त जीवांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तरी सुद्धा आपण देवावर भार टाकून मोकळे होत नाहै, त्यावर भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला उपदेश करतात, जो अनन्यभावे मला शरण येतो, त्याच्या हाकेला मी नेहमी धावून जातो आणि त्याचा योगक्षेम म्हणजेच अन्न, पाणी, रोजगार मी पुरवतो।.
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा | बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् |
करोमि यद्यत् सकलं परस्मै | नारायणायेति समर्पयामि ||
अर्थ : आरतीच्या शेवटी, घालीन लोटांगण म्हणून झाल्यावर आपण हा श्लोक म्हणतो. मात्र, त्याच्या अर्थाकडे आपले लक्ष जात नाही. विष्णूंची उपासना करण्याच्या निमित्ताने त्याचा अर्थ समजून घेऊया. काया, वाचा, मन, इंद्रिये, बुद्धी, आत्मा या सर्वांचा मेळ होऊन आमच्याकडून कळत-नकळत जे जे काही कार्य घडते, ते आम्ही नारायणाला अनन्यभावे समर्पित करतो.
ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि, तन्नो विष्णू: प्रचोदयात।।
याला 'विष्णू गायत्री' असे म्हणतात. अनेकांना 'ओम तत्सवितु: वरेण्यम' हा एकच सूर्य गायत्री मंत्र माहीत असतो. परंतु, अशा एकूण २४ गायत्री आहेत. पैकी एक, विष्णू गायत्री, जिचा जप आपण विष्णू उपासना म्हणून करू शकतो.
'ओम नमो भगवते वासुदेवाय'
सरतेशेवटी एक मंत्र, जो सहज, सोपा आणि अतिशय परिणामकारक आहे. या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.