Shattila Ekadashi 2024: आज षटतिला एकादशीनिमित्त 'या' सहा प्रकारे करा तिळाचा वापर; होईल अपार लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 10:33 AM2024-02-06T10:33:12+5:302024-02-06T10:33:25+5:30
Shattila Ekadashi 2024: आज षटतिला एकादशीनिमित्त तिळाचे दान करण्याची प्रथा आहे, हे दान कशाप्रकारे आणि कुठे केले असता काय लाभ होतो ते जाणून घ्या.
आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशी मुख्य असल्या, तरीही वर्षभरातील उर्वरित एकादशींचे महत्त्व ओळखून त्यांना विशेष ओळख दिली आहे. त्यानुसार माघ शुक्ल एकादशीप्रमाणे पौष कृष्ण एकादशीलाही षटतिला एकादशी असे नाव आहे. पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते. त्या थंडीपासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उपयोग विविध व्रतांमध्ये कसा केला जाईल, हे बघितले आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही षटतिला एकादशी! मकरसंक्रांतीच्या निमित्ताने लाडवांचा गोडवा या मासाला लाभला आहे, तो वेगळाच! निसर्गचक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत आरोग्यदायी असल्यामुळे आरोग्यासाठी म्हणून हे व्रत जरूर करावे.
तिळाचेच दान का?
तीळ कणभर दिसत असला तरी त्याचे मणभर गुणधर्म आहेत. अत्यंत महत्वाच्या घटकयुक्त अशा तिळांमुळे मधुमेहाला प्रतिबंध करायला आणि त्याचे नियंत्रण करायला मदत होते. या शिवाय कॅन्सरचा धोका कमी करणे, हाडांची शक्ती वाढवणे, सूज प्रतिबंध, पचनक्रिया सुधारणे, पचनक्रियेत सर्व अवयवांची शक्ती वाढविणे इत्यादी गोष्टीदेखील हा इवलासा तीळ करतो. हृदयाची कार्यक्षमता वाढविणे, उच्च रक्तदाब कमी करणे, स्नायू आणि केसांची ताकत वाढविणे, अकाली वृद्धत्व टाळणे, इत्यादी गोष्टींसाठी तीळ फार उपयुक्त आहे. एवढासा तीळ असा अत्यंत बहुगुणी असल्यामुळेच मराठीत ' १ तीळ ७ जणांनी वाटून खावा ' ही वरकरणी विनोदी वाटावी अशी म्हण रुजली असावी. म्हणजेच तिळाचे दान करणे हे आरोग्याचे दान करण्यासारखेच आहे, हे त्यामागील शास्त्र.
इतर एकादशीप्रमाणे या व्रताचा विधी आहे. व्रत कर्त्याने प्रात:काळी स्नान करावे. विष्णूपूजा करून नंतर 'ऊँ श्रीकृष्णाय नम:' या मंत्राचा जमेल तेवढा जप करावा. दिवसभराचा उपास करावा. तिळमिश्रित पाण्याने स्नान करावे, तिळांचे हवन करावे, तीळ घातलेले पाणी प्यावे. तीळ घातलेल्या पाण्याचे दान करावे. तीळ असलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. असा सहा तऱ्हेने तिळाचा वापर या षटतिला एकादशीच्या व्रतानिमित्ताने आवर्जून केला जातो. सर्व पापनाशार्थ हे व्रत केले जाते.
तसेच या व्रताला तिलधीव्रत असेही म्हटले जाते. यानुसार षटतिला एकादशीला तीळ मिश्रित गोवऱ्यांचे हवन करणे अपेक्षित असते. परंतु आताच्या काळात शहरात गाईचे शेण मिळणे दुरापास्त आहे. तसेच त्याच्या गोवऱ्या स्वत: करणे देखील कोणी पसंत करणार नाही. त्याऐवजी पूजा हवन साहित्याच्या दुकानातून तयार शेण्या आणून त्याच्या बरोबर तीळ गेऊन दोन्हीचे एकत्रित हवन करणे सोपे होईल. अर्थात हवनही माफक प्रमाणात करणे उचित होईल. अन्यथा शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. थंडीच्या दिवसात सर्दी खोकला तसेच अनेक आजार होत राहतात. हवनाच्या निमित्ताने गोवऱ्यांचा वापर केल्याने वातावरणशुद्धी होते. घर प्रसन्न वाटते. असा अध्यात्मिक आणि शास्त्रीय हेतू पाहता षटतिला एकादशीचे व्रत आपल्यालाही सहज अनुसरता येईल.