पन्हाळगड काबीज केल्यावर महाराजांनी सोमेश्वर महादेवावर केला होता लक्ष सोनचाफ्याचा अभिषेक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 07:05 IST2025-02-19T07:00:00+5:302025-02-19T07:05:01+5:30
Shiv Jayanti 2025: आज शिव जयंती निमित्त शिवरायांची शिवभक्ती जाणून घेऊया आणि त्यानिमित्त आपणही तो क्षण महाराजांसवे अनुभवूया.

पन्हाळगड काबीज केल्यावर महाराजांनी सोमेश्वर महादेवावर केला होता लक्ष सोनचाफ्याचा अभिषेक!
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. आई जिजाऊंमुळे महाराजांवर बालपणापासूनच देव, देश, धर्माचे संस्कार झाले होते. एकीकडे शस्त्राचे तर दुसरीकडे शास्त्राचे प्रशिक्षण ते घेत होते. त्यांच्या देशभक्तीला देवभक्तीची जोड होती. 'हे राज्य व्हावे ही तर श्रीं ची इच्छा' हे त्यांचे भावोद्गार होते. बालपणी आईबरोबर कथा कीर्तनाला जात असल्यामुळे त्यांच्यावर रामायण, महाभारत, भागवत, हरीकथेचे संस्कार झाले होते. त्यांना उंच डोंगरावर असलेले देवीचे मंदिर, दऱ्याखोऱ्यात असलेले शिवालय विशेषतः आवडत असे. तिथे गेल्यावर ते ध्यानमग्न होत असत. अशाच एका शिवालयाचा प्रसंग जाणून घेऊया.
Shiv Jayanti 2025: शिवाजी महाराज होते थोर रामभक्त; जिजाऊंनी बालशिवबावर घातलेले रामकथेचे संस्कार!
स्वराज्याची मोहीम सुरू असताना पन्हाळगड ताब्यात घेण्याची जबाबदारी महाराजांनी आपले निष्ठावंत सरदार कोंडाजी फ़र्जंद यांच्यावर सोपवली होती. कोंडाजींनी मावळ्यांच्या छोट्याशा तुकडीसह मोठ्या शिताफीने गड ताब्यात घेतला आणि महाराजांना विजय वार्ता कळवली. पन्हाळगड प्रिय असल्याने महाराज स्वतः अभिनंदन करण्यासाठी गडावर पोहोचले. या विजयोत्सवाच्या निमित्ताने महाराजांनी पन्हाळ गडावरील सोमेश्वर महादेवाच्या मंदिरात एक लक्ष सोनचाफ्याच्या फुलांचा अभिषेक करण्याचा संकल्प केला आणि त्यानुसार तजवीज घडवून संकल्पपूर्ती करवून घेतली. शिवाजी महाराजांची भगवंतावरील दृढ श्रद्धा आणि भक्तिभावाचे दर्शन घडवणारा हा सुगंधी प्रसंग, कायमच स्मरणात राहणारा आहे.
पन्हाळा गडाचे पुराणकाळातील नाव 'ब्रम्हगिरी' असे होते. यामागची दंतकथा अशी सांगितली जाते की, ब्रम्हदेवाने प्रजा उत्पन्न 'करण्याच्या हेतूने येथे 'सोमेश्वर लिंग' व 'सोमेश्वर सरोवर' निर्माण करून तपश्चर्या केली म्हणून या गडाचे नाव 'ब्रम्हगिरी' असे पडले.जुन्या शिलालेखातील वर्णनानुसार पन्हाळगडाचे नाव 'प्रणालक' किंवा 'पद्मनाल' असे आले आहे. यातून 'पनाला' शब्दाची उत्पत्ती झाली असावी. पन्हाळगड विजापूरकरांच्या ताब्यात आल्यावर या गडाचे नाव 'शहानबी- दुर्ग असे ठेवले होते. पुढे शिवाजी महाराजांच्याकडे या गडाचा ताबा आल्यावर तो 'पन्हाळा' या नावाने ओळखला जात होता. शिवकाळातील भूषण कवीने आपल्या काव्यात यास 'परनालगड' असे म्हटले आहे. गडाच्या नावात अनेक भेदाभेद झाले तरी पन्हाळा अभेद्य राहिला, सोमेश्वरही आशीर्वाद देत राहिला आणि त्याच्यावर सोनचाफी अभिषेक करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही संस्मरणीय ठरला.