Shiv Puja: सुंदर, सुकोमल केतकीचे फुल शापित का मानले जाते? महादेवाला ते का वाहू नये? वाचा त्यामागची कथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 01:48 PM2023-07-10T13:48:27+5:302023-07-10T13:48:42+5:30
Shiv Puja: महादेवाची पूजा करताना आपण बेल आणि पांढरे फुल वाहतो, मात्र त्यात केतकीच्या फुलांचा समावेश नसावा असे सांगितले जाते.
महादेवांना बेलाचे पान आणि पांढरी फुले प्रिय असतानाही केतकी अप्रिय का? त्यामागे सांगितली जाते एक कथा...
एक दिवस ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात वाद झाला की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? न्यायनिवाडा करण्यासाठी ते महादेवांकडे आले. निर्णय सुनावण्याआधी त्यांनी दोघांची परीक्षा घ्यायची असे ठरवले. महादेवांनी एक शिवलिंग प्रगट केले आणि दोघांना सांगितले, की या शिवलिंगाचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो सर्वश्रेष्ठ ठरेल.
ब्रह्मदेव निघाले पृथ्वी आणि पाताळाच्या दिशेने तर विष्णू देव निघाले स्वर्गाच्या सप्तपुरीमध्ये! बराच प्रवास विष्णूंना उत्तर न सापडल्याने ते हार पत्करून परत आले. तर ब्रह्मदेव स्पर्धा जिंकण्याच्या नादात पाताळात शिवलिंगाचा उगम आहे असे सांगत कैलासाकडे आले. येताना त्यांनी केतकीचे फुल साक्षीदार म्हणून आले.
स्पर्धा जिंकण्यासाठी ब्रह्मदेवांनी खोटे बोलले हे महादेवांना आवडले नाही, म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचे शीर धडावेगळे केले आणि खोटी साक्ष देणाऱ्या केतकीच्या फुलाला शाप दिला, की तू कितीही सुंदर असलीस तरी माझ्या पूजेमध्ये तुझा समावेश होणार आहे.
तेव्हापासून केतकीचे फुल इतर पूजेमध्ये समाविष्ट केले जाते पण चुकूनही महादेवांना वाहिले जात नाही. या पौराणिक कथेची सत्यअसत्यता माहित नाही पण कथेचे तात्पर्य हेच सांगते की आपला स्वार्थ साधायचा म्हणून कधीही खोटे बोलू नका, तसे करणे तुमच्या हिताचे तर नसतेच शिवाय परमेश्वरालाही ते आवडत नाही!