गोष्ट चाराण्याची, शिकवण लाखमोलाची; वाचा एका शेतकऱ्याची गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 11:36 AM2021-10-11T11:36:51+5:302021-10-11T11:37:12+5:30
समाधान हे मानण्यावर असते. लोकांकडे लाख लाख पगार असूनही ते संतुष्ट नसतात. समाधानी नसतात. याचे कारण जाणून घ्या!
अनेक धनिक आपण पाहिले आहेत, ज्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही, पण त्यांच्या वाट्याला चाराण्याचेही सुख नाही. ऐषारामी जीवन जगायला पैसे हवेत, परंतु पैशांचे सुयोग्य नियोजन नसेल, तर ते पैसे मातीमोल ठरतात. अशा वेळी चाराणेच महत्त्वाचे ठरतात. ही शिकवण दिली, ती एका शेतकऱ्याने!
एक मोठा अधिकारी आपल्या गावाची पाहणी करत एका शेतावरून जात होता. शेतकरी कामात मग्न होता. त्याला थोडी आर्थिक मदत करावी या हेतूने अधिकाऱ्याने शेतकऱ्याला काही पैसे द्यायचे ठरवले. शेतकरी म्हणाला, `नको साहेब माझ्याकडे चाराणे आहेत. तेवढे मला पुरेसे आहेत.'
हे ऐकून अधिकारी चक्रावला व म्हणाला, `आताच्या काळात चाराण्यात कोणाचे भागणारे? चाराण्याचे नाणे बाद झाले. रस्त्यावरचे भिकारीसुद्धा पाच-दहा रुपयांच्या खाली पैसे घेत नाहीत आणि तू चाराण्यात समाधानी आहेस? मला कळले नाही...'
यावर शेतकरी म्हणाला, `साहेब, चाराणे म्हणजे माझ्या कमाईचा पाव हिस्सा, त्यात मी समाधानी आहे, असे म्हणालो.'
'कमाईचा पाव हिस्सा? मग पाऊण भागाचे काय?' अधिकारी विचारता झाला.
शेतकरी म्हणाला, 'चाराण्याच्या हिशोबात सांगायचे तर समजा, माझी कमाई १ रुपया आहे. तर त्यातील चाराणे मी माझ्या मुलांच्या, कुटुंबाच्या गरजांसाठी वापरतो, दुसरे चाराणे माझ्या वाडवडिलांनी कोणाकडून कर्ज घेतले असले किंवा मी कोणाला देणे लागत असेन तर त्यांच्यावर खर्च करतो. तिसरे चाराणे मी भविष्याची तरतूद म्हणून जमा करतो आणि या पाऊण भागाची व्यवस्था लागल्यावर मी स्वत:साठी पाव भाग वापरतो. तेच हे चाराणे!'
अधिकाऱ्याला शेतकऱ्याचा हेवा वाटला. तो म्हणाला, `तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. समाधान हे मानण्यावर असते. लोकांकडे लाख लाख पगार असूनही ते संतुष्ट नसतात. समाधानी नसतात. याचे कारण म्हणजे आपल्या कमाईचे नियोजन कसे करावे, कुठे थांबावे आणि कुठे समाधान मानावे, हे ज्याला कळले त्याला लाखभर रुपये मिळाले तरी आणि नाही मिळाले तरी तो कायम आनंदी राहू शकतो, तुमच्यासारखा!'