मधल्या बोटात अंगठी घालावी की घालू नये? ज्योतिषशास्त्र काय सांगते? वाचा.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 03:55 PM2021-06-24T15:55:17+5:302021-06-24T15:55:44+5:30
नीलमच्या अंगठीचा डोळस पणे वापर करावा आणि ज्योतिषांच्या सल्ल्यानंतरच मधल्या बोटात अंगठी घालण्याचा निर्णय घ्यावा.
मधल्या बोटात म्हणजे मध्यमात अंगठी घालू नये हा गैरसमज आहे. परंतु हे मात्र खरे आहे, की त्यात शोभेची अंगठी किंवा अन्य रत्नजडित अंगठी घातल्याचा लाभ होणार नाही. तर त्या बोटात विशिष्ट अंगठीच घालावी लागते. ती अंगठी कोणती, ते जाणून घेऊया.
'मध्यमा' अर्थात मधले बोट हे शनीचे बोट मानले जाते. शनी ग्रहाची वृत्ती विलासी नाही. त्यामुळे सुखोपभोग वगैरे त्या ग्रहाला माहीतच नाही. त्यांना माहीत आहे, ती फक्त शिस्त, न्याय आणि प्रामाणिकपणा. ज्या व्यक्तीला हे तीन गुण आचरणात आणता येतील, त्यांनीच शक्यतो मधल्या बोटात आंगठी घालण्याचा अट्टाहास करावा.
त्या अंगठीमध्ये शनीचे प्रिय रत्न नीलम परिधान करता येऊ शकते. हे रत्न अन्य बोटातील अंगठीमध्ये वापरून उपयोग नाही. तिची योग्य जागा मधल्या बोटात असते. म्हणून इतर कोणतीही शोभेची अंगठी वापरण्याऐवजी नीलम ची अंगठी वापरल्यास त्याचा लाभ होऊ शकतो.
शोभेच्या किंवा सोन्या,चांदीच्या रत्न जडित अंगठ्या मधल्या बोटात वापरल्यास त्रास होऊ शकतो का? तर त्याचे उत्तर आहे हो, त्रास होऊ शकतो. एकवेळ शोभेच्या अंगठीचा त्रास होणार नाही, कारण ती तात्पुरती वापरली जाते. याउलट सोन्या-चांदीच्या अंगठ्या कायमस्वरूपी घातल्या जातात. त्या अंगठ्या घालण्याचे शास्त्र अथवा ज्योतिषी कारण समजावून घेतले नाही, तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हे बोट शनी देवांचे आहे. त्यांची विरक्त वृत्ती अशा चैनीच्या गोष्टींना विरोध दर्शवते. शनी ग्रहाचा साडेसातीशी आणि मृत्यूशी थेट संबंध असल्यामुळे विषाची परीक्षा न घेणे चांगले. वापरायची झाल्यास नीलम ची अंगठी वापरावी, ते सुद्धा तुम्हाला त्याची गरज असेल तरच! ज्योतिषी सल्ल्यानुसार ग्रहांना अनुकूल ठरणारे खडे वापरावेत. अकारण वापरल्यास त्याचा अतिरिक्त लाभ होत नाही. म्हणून रत्न असो किंवा रुद्राक्ष या गोष्टींचा ज्योतिष शास्त्राशी संबंध असल्यामुळे ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार त्यांचा केलेला वापर हितावह ठरतो.
साडेसातीच्या काळात नीलम अंगठी वापरण्याचा सल्ला विशेषतः दिला जातो. त्यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होऊन, ग्रहदशा अनुकूल होते. शनी ग्रहाची अनुकूलता लाभते. यासाठी नीलमच्या अंगठीचा डोळस पणे वापर करावा आणि ज्योतिषांच्या सल्ल्यानंतरच मधल्या बोटात अंगठी घालण्याचा निर्णय घ्यावा.