सुखवस्तू घराला आदर्श घर म्हणावे का? घराला वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे कोंदण कसे द्यावे? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 02:53 PM2021-12-14T14:53:40+5:302021-12-14T14:54:07+5:30
दर तीन व्यक्तींमागे एक व्यक्ती नैराश्याने ग्रासली आहे. का? कशामुळे? तर आत्मकेंद्री झाल्यामुळे. मात्र पूर्वी तसे नव्हते...
'ज्याचा कोणी नसतो, त्याचा मोबाईल असतो आणि ज्याच्याजवळ मोबाईल असतो, तो कुणाचा नसतो.' असे मार्मिक आणि मजेशीर विधान समाज माध्यमांवर वाचले. आधी हसू आले, परंतु स्वयंकेंद्री झालेल्या समाजाचे वास्तव त्या एका वाक्याने अधोरेखित केले. सद्यस्थितीत, मी आणि माझे यापलीकडचे विश्व आपल्याला दिसतच नाही. समाज माध्यमांमुळे व्यक्ती सोशल होण्याऐवजी अधिकच एकटी पडत असताना दिसत आहे. दर तीन व्यक्तींमागे एक व्यक्ती नैराश्याने ग्रासली आहे. का? कशामुळे? तर आत्मकेंद्री झाल्यामुळे. सतत दुसऱ्यांच्या सुखाशी तुलना करता करता, मनुष्य स्वत:चे सुख हिरावून बसला आहे. आत्मभान विसरत आहे. जगण्याचे ध्येय विसरत आहे. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात,
आपुलिया हिता जो होय जागता, धन्य मातापिता तयाचिया।
कुळी कन्यापुत्र होती जी सात्त्विका, तयाचा हरिख वाटे देवा।
गीता भागवत करिती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे।
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही।
धन्य आहेत ते लोक, जे कितीही खडतर प्रसंग आले, तरी आपल्या ध्येयापासून ढळत नाहीत. ते स्वत:चा आणि आपल्या बरोबर कुटुंबाचा, समाजाचा, राज्याचा, राष्ट्राचा उद्धार करतात. नैराश्यावर मात करतात. त्यांना जन्म देऊन त्यांचे माता पिताही धन्य होतात. अडी अडचणींवर मात करून ज्या मुली स्वत:ला सिद्ध करतात, आपले कसब पणाला लावून लोकोपयोगी काम करतात, समाजाला दिशा देतात, जबाबदाऱ्या सार्थपणे सांभाळतात, त्यांना या पृथ्वीवर पाठवून देवालाही त्यांचा हेवा वाटत असावा.
आजच्या काळात सुखवस्तू घर आहे, परंतु घरात राहणारे सुखी नाहीत. कारण, त्यांचा आपापसात सुसंवाद होत नाही. चांगल्या विचारांची देवाण घेवाण होत नाही. चांगले विचार कानावरदेखील पडत नाहीत. पूर्वी आजी-आजोबा रामरक्षा, भीमरूपी स्वत: म्हणत आणि नातवांकडून म्हणवून घेत. आता कोणाचा पायपोस कोणाला नसतो. अशा घरात सुख समृद्धी कशी वास करणार? घराला सांधून ठेवण्यासाठी संस्कारांचा मजबूत पाया असावा लागतो. परमार्थाची गोडी असावी लागते. श्लोक, स्तोत्र, संतविचार यांचे ध्वनी उमटावे लागतात. तिथेच लक्ष्मी आणि सरस्वती नांदते.
तुकाराम महाराज म्हणतात, अशा घराचा आपणही आदर्श ठेवला पाहिजे. जिथे सत्संग घडेल, तिथे गेले पाहिजे. जिथे समाजकार्य घडत असेल, तिथे आपणही सहभाग घेतला पाहिजे. अशा ठिकाणी केलेली सेवा, ही ईशसेवेचा भाग आहे.