महत्त्वाच्या कामाला जाताना 'या' गोष्टींचे दिसणे शुभ मानावे की अशुभ? ज्योतिष शास्त्र सांगते...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 02:23 PM2022-07-02T14:23:39+5:302022-07-02T14:24:04+5:30
घराबाहेर पडल्यावर अनेक गोष्टी नजरेस पडतात. ऐकीव माहितीनुसार त्या गोष्टींचे दिसणे शुभ मानावे की अशुभ, हा संभ्रम मनात निर्माण होतो. त्यासाठी ही माहिती...
घराच्या चार भिंतींच्या आड अनेक गोष्टी आपण टाळू शकतो. परंतु घराबाहेर पडल्यावर घडणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. त्यात पूर्वापार ऐकत आलेल्या गोष्टींमुळे मनात शंकेची पाल चुकचुकते. एकदा का मनात नकारात्मक भाव निर्माण झाले की होणारे कामही होत नाही, असा आपल्याला अनुभव येतो. यासाठीच ज्योतिष शास्त्राने काही सूचना केल्या आहेत, त्या ध्यानात ठेवून आपण सकारात्मकतेने कामाची सुरुवात केल्यास अन्य अडचणी येणार नाहीत.
ज्योतिष शास्त्रात घरातून बाहेर पडताना काही नियम सांगण्यात आले आहेत. घराबाहेर पडताना किंवा प्रवासाला जाताना देवाचा, वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा असे म्हणतात. त्यामुळे कामात अडथळे येत नाहीत. मात्र बाहेर पडल्यावर अनपेक्षित गोष्टी नजरेस पडतात, ज्यामुळे शुभ आणि अशुभ संकेत मिळतात. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
घरातून बाहेर पडताना कोणाची अंत्ययात्रा दिसली तर ती घटना अशुभ असली तरी देवाघरी जाणाऱ्या व्यक्तीचे दर्शन घडणे शुभ चिन्ह मानले जाते. त्यामुळे ती बाब अशुभ मानू नका. गेलेल्या व्यक्तीला दुरूनच नमस्कार करून तुमच्या कामाला निघा. कदाचित अडलेल्या कामाला गती आल्याचेही लक्षात येईल.
सकाळी सकाळी दारात भिकाऱ्याचे येणे आपल्याला त्रासदायक वाटते. परंतु अशा व्यक्तीला टाळण्यापेक्षा गरजेच्या वस्तू, जसे की अन्न, कपडे, चपला अशा गोष्टी दान कराव्यात. पैसे देण्यापेक्षा अशा गोष्टी दिल्याने ती व्यक्ती खरंच गरजू असेल तर तिची गरज भागेल आणि पैशांसाठी भीक मागत असेल तर परत येणे बंद करेल. त्यामुळे त्रागा करू नका तर तोडगा काढा.
कामासाठी बाहेर जाताना गोमातेचे दर्शन होणे शुभ संकेत मानले जातात. त्यातही वासराला दूध पाजणारी वत्सल गोमाता दिसणे त्याहून शुभ ठरते. असा प्रसंग दिसणे म्हणजे आजवर अडलेल्या कामांना गती मिळणार असल्याचे संकेत मानले जातात.
घराबाहेर पडताना मंदिरातून घंटानाद कानावर पडणे अतिशय शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ तुमच्यावर देवाची कृपा होणार आणि तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी देवाचे सहकार्य मिळणार हे निश्चित!