Shravan 2021 : भारतात ५१ शक्तिपीठे कशी निर्माण झाली, त्यामागील पौराणिक कथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 06:42 PM2021-08-23T18:42:28+5:302021-08-23T18:42:59+5:30
Shravan 2021 : वेगवेगळ्या स्वरूपातील देवीची ही रूपे अनेकांची कुलस्वामिनी आहे, कुलदेवता आहे.
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांबद्दल आपल्या माहिती आहेच, आज आपण देवी सतीमुळे भारतात निर्माण झालेल्या ५१ शक्तिपीठांची कथा पाहू.
नागाधिराज म्हणजेच पर्वतांचा राजा हिमालय. या पर्वत राजाची जी कन्या, ती पार्वती! शिवशंकराची शक्ती. सती, दुर्गा, आदिशक्ती, महालक्ष्मी, कालिका, अंबाबाई, जगदंबा, अपर्णा, भवानी, हरितालिका, कन्याकुमारी, योगेश्वरी, बनशंकरी अशी तिची अनेक नावे आहेत. यातील काही नावे तिच्या कौमार्यावस्थेतील आहेत तर काही नावे शिवाशी विावह झाल्यानंतरची वेगवेगळ्या अवतारांमधील आहेत.
वेगवेगळ्या स्वरूपातील तिची ही रूपे अनेकांची कुलस्वामिनी आहे, कुलदेवता आहे. यातील पार्वती हे तिचे कुमारी अवस्थेतील नाव आहे. हिमालय पर्वत आणि मेना यांची ही कन्या. हीच पूर्वाश्रमीची दक्ष प्रजापतीची कन्या सती होय.
सतीचा विवाह तिने स्वेच्छेने शिवाशी केला होता. तो दक्षाला पसंत नव्हता. त्याने पुढे हरिद्वारला एक यज्ञ केला. त्यासाठी शिव आणि सती सोडून बाकी सर्व देवांना आमंत्रित केले. सतीला वाटले, आपल्या पित्याकडून नजरचुकीने ही गोष्ट झाली असेल. म्हणून तिने शिवाला तिथे येण्याचा आग्रह केला. परंतु आमंत्रण नसल्याने शिवाने तिथे येण्यास नकार दिला. परंतु तिला एकटीला जाण्याची परवानगी दिली.
सती तेथे गेल्यावर दक्षाने तिचा अपमान आणि शिवाचा उपहास केला. सतीला तो सहन झाला नाही. म्हणून तिने त्या यज्ञात उडी टाकून स्वत:ला जाळून घेतले. पुढे शिवाने तिचे पार्थिव खांद्यावर घेऊन आकाशात संचार केला. देवीच्या तप्त देहाने जगात प्रलय येऊ नये म्हणून श्रीविष्णूंनी सुदर्शन चक्राने तिचा एक एक अवयव तोडला. तो जेथे जेथे पडला, तिथे तिथे ५१ शक्तिपीठे निर्माण झाली. पुढे या सतीने हिमालय कन्या म्हणून जन्म घेतला. त्यानंतर तिने भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी आराधना कशी केली याची कथा लवकरच, अर्थात हरतालिकेच्या निमित्ताने पाहू. जगदंब उदयोस्तु!