Shravan 2022: श्रावणातला प्रत्येक दिवस वैशिष्ट्यपूर्ण का व कसा ते सविस्तर जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 02:37 PM2022-07-28T14:37:06+5:302022-07-28T14:38:56+5:30
Shravan 2022: २९ जुलै पासून श्रावण मास सुरू होत आहे. त्याबरोबर मिळेल प्रत्येक वाराला, दिवसाला आगळे वेगळे महत्त्व!
>> विनय जोशी (भारतीय विद्या अभ्यासक )
श्रावणात महाराष्ट्रात ‘नागनरसोबाचा किंवा जिवतीचा कागद म्हणून ओळखला जाणार श्रावणपट देवघरात लावला जातो.महिनाभरआघाडा-दुर्वा कापसाचे वस्त्र वाहून याची पूजा केली जाते. श्रावण संपताच याचे वाहत्या पाण्यात विसर्जन केले जाते. या चित्रात नरसिंह,कालियामर्दन करणारा कृष्ण ,जिवती आणि बुध-बृहस्पती अशा वरवर पाहता परस्परांशी संबंध नसणाऱ्या देवतांच्या प्रतिमा असतात.विविध पुराणांमध्ये तसेच निर्णयसिन्धु , व्रतराज ,चतुर्वर्ग चिंतामणी इत्यादि ग्रंथात श्रावणातील अनेक व्रते सांगितली आहेत.यातील काही व्रतात भिंतीवर किंवा विविध ठिकाणी देवतेची चित्रे काढून पूजन करावे असे विधान सांगितले आहे. अशा काही व्रतांतील देवता या श्रावणपटावर दिसतात.
श्रावण शुक्ल पंचमीला नागपूजनाचे व्रत सांगितले आहे.पाटावर चंदनाने तसेच दाराच्या दोन्ही बाजूला शेणाने नागप्रतिमा काढाव्यात. या नागांची दूर्वा, गंध-फुले अर्पण करून पूजा करावी,दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवावा.या व्रताने सर्पभय दूर होत अखंड संपत्ती मिळते.श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी मुलाबाळांच्या रक्षण आणि कल्याणासाठी जिवंतिका व्रत सांगितले आहे.जिवती ही बाळांचे रक्षण करणारी आणि जरा त्यांना दीर्घायुष्य देणारी देवता मानली जाते. भिंतीवर मुलंबाळ यांनी वेढलेल्या जरा-जिवंतिका यांचे चित्र रेखाटावे.आघाडा-दुर्वा ,हळदीकुंकवाने पूजा करावी फुटाणे , पुरण यांचा नैवेद्य दाखवावा असे हे व्रत आहे.
श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीचे व्रत सांगितले आहे .घरात विविध ठिकाणी गंधाने दोन बाहुल्या रेखाटून त्याची पूजा करून दही-भाताचा नैवेद्य दाखवावा.पाळण्यावर चित्र काढल्यास संततीप्राप्ती ,तिजोरीवर काढल्यास धनप्राप्ती ,धान्याच्या कोठीवर काढल्यास धान्यवृद्धी ,शयनगृहात काढल्यास दाम्पत्यसुख ,दरवाजापाठीमागे काढल्यास प्रवासाला गेलेल्या प्रिय व्यक्तीचे सुखरूप आगमन अशी प्रतिमांच्या स्थानांप्रमाणे वेगवेगळी फळे सांगितली आहेत. श्रावणातील प्रत्येक शनिवारी घरातील खांबावर नरसिंहाचे चित्र काढावे. त्याचे तिळाचे तेल, हळद,चंदन, लाल निळी फुले वाहून पूजा करावी. कुंजरा नावाची पालेभाजी आणि खिचडी असा नैवेद्य दाखवावा. या व्रताने इहलोकी धनधान्यकीर्ती आदी सुख आणि वैकुंठप्राप्ती असे फळ सांगितले आहे.
श्रावणातील इतर व्रतांपेक्षा या चार व्रतात देवतांच्या प्रतिमा काढून पूजन सांगितले आहे. देवघरातल्या भिंतीवर एकाच ठिकाणी या प्रतिमा काढून पूजा करणे सोयीचे ठरते. पुढे छपाईचे तंत्र रुळल्यावर या देवतांच्या एकत्रित चित्रांचा कागद छापला जाऊन लोकप्रिय झाला. अशा या वैशिष्ट्यपूर्ण व्रतांचा श्रावणपट श्रावणाचे प्रमुख लक्षण ठरला आहे.
Email : vinayjoshi23@gmail.com