Shravan 2022: उत्तर भारतीयांचा श्रावण आता सुरू झाला, पण आपला नाही; वाचा आणि गोंधळ दूर करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 01:08 PM2022-07-18T13:08:57+5:302022-07-18T13:09:30+5:30
Shravan 2022: दिनदर्शिकेत २९ जुलै पासून श्रावण सुरु होत असल्याचे दाखवले असताना अनेक ठिकाणी श्रावण सुरू झाल्याचे वाचनात येते, त्यामुळे गोंधळून जाऊ नका, दोन्ही पंचांगातील फरक जाणून घ्या!
दिनदर्शिकेत वेगळ्या रंगात रंगवलेला श्रावण त्याचे वेगळेपण दर्शवतो. मात्र समाज माध्यम तसेच बातम्यांमध्ये श्रावण सुरु झाल्याचे पाहून अनेक भाविकांचा गोंधळ होतो. असे कशामुळे होते ते आधी जाणून घेऊ.
खगोलीय दृष्टिने पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी २४ तासांचा कालावधी लागतो. यालाच आपण एक दिवस असे म्हणतो. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यासाठी एक वर्ष म्हणजे ३६५ दिवस लागतात. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिना हा दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. यालाच शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष असे म्हटले जाते. एका महिन्यातील हे दोन्ही पक्ष चंद्रकलेच्या आधारावर विभागले गेले आहेत. पौर्णिमेनंतर वद्य पक्ष आणि अमावास्येनंतर शुद्ध पक्ष सुरू होतो. उत्तर आणि पूर्व भारतातील पंचांगानुसार, कृष्ण पक्षापासून महिना सुरू करण्याची परंपरा आहेत. तर पश्चिम भारतासह अन्य भागात शुद्ध पक्षापासून महिना सुरू करण्याची परंपरा आहे. त्यामुळे देशभरात सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, परंपरा, संस्कृती तीच असली, तरी ती साजरी करण्याच्या कालावधीत तफावत आढळते. त्यामुळे उत्तर भारतीयांचा श्रावण १४ जुलै रोजी सुरू झाला पण महाराष्ट्रात श्रावण २९ जुलै रोजी सुरु होणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंडसह उत्तर आणि पूर्व भारतात श्रावण महिना सुरू झाला आहे. उत्तर भारतातील पंचांगानुसार, १८ जुलै, २५ जुलै, १ आणि ८ ऑगस्ट रोजी त्यांचा श्रावणी सोमवार आहे. मात्र, महाराष्ट्रासह गुजरात आणि भारताच्या अन्य भागांमध्ये मंगळवार, २९ जुलै २०२२ पासून श्रावण सुरू होत असून, १, ८, १५, २२ ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार आहे.
श्रावण मास येताच सृष्टीतील बदल आपल्याला जाणवू लागतात. बालकवींनी `श्रावणमासी हर्षमानसी' या कवितेत केलेल्या उल्लेखाप्रमाणे
क्षणात येती सरसर शिरवे,
क्षणात फिरूनी ऊन पडे!
असा हा ऊन पावसाचा खेळ श्रावणात रंगतो. श्रावणसरींनी, व्रत वैकल्यांनी, सण-उत्सवांनी हा महिना चिंब भिजलेला असतो, म्हणून त्याला मराठी महिन्यांचा राजा म्हटले जाते.
या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा आधी किंवा नंतर श्रवण नक्षत्र असते, म्हणून याला श्रावण या नावाने ओळखले जाते. श्रावण हा सणांच्या व्रत-वैकल्याच्या दृष्टीने चातुर्मासातीलच नव्हे तर बारा महिन्यातील महत्त्वाचा महिना म्हणावा लागेल. त्याचे महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे श्रावणातील प्रत्येक दिवशी प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते तरी व्रत केले जाते. इतर महिन्यातील व्रत वैकल्ये ही बहुतेक तिथीनुसार आलेली आहेत. पण श्रावणातील व्रते ही तिथीप्रमाणे, वारानुसार योजलेली असतात.
दर श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांसाठी एकभुक्त उपास केला जातो. तसेच शिवाला शिवामूठ वाहिली जाते. मंगळवारी नूतन विवाह झालेल्या मुली मंगळागौरीची पूजा आणि जागरण करतात. बुधवारी बुधपूजन तर गुरुवारी बृहस्पतिपूजन करतात. शुक्रवारी लक्ष्मीच्या पूजेचे स्त्रियांसाठी खास व्रत आहे. या दिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक रांधून सवाष्णींना जेवू घालतात. शनिवारी मुंज झालेल्या मुलाला जेवू घालतात. तसेच मारुतीला किंवा शनिला तेल वाहून नारळ वाढवतात. रविवारी सूर्यपूजा करून खीरीचा नैवेद्य दाखवतात.
श्रावणात मंदिरांमध्ये तसेच ठिकठिकाणी कथा, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन केले जाते. शुभमुहूर्त पाहून भागवत सप्ताह आयोजित केला जातो. त्यानिमित्ताने लोक भगवद्कार्य करणाऱ्या कथेकरीला शिधा, दक्षिणा देतात.
याबरोबर श्रावणात अनेक मोठे सणही येतात. नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्णजन्म, गोपाळकाला, पिठोरी अमावस्या, बैलपोळा इ. वैविध्याने युक्त असलेल्या सण समारंभातून आनंदाचा वर्षाव होतो. वर्षा ऋतूमुळे थबकलेल्या सणांना नागपंचमीपासून पुन्हा प्रारंभ होतो. त्यात पावसामुळे निसर्गानेदेखील चहुकडे `हिरवे हिरवे गार गालिचे' अंथरले असतात. निसर्गाचा सृजनसोहळा मानवी मनालाही उभारी देतो. म्हणून श्रावण सर्व महिन्यांचा राजा ठरतो.