Shravan 2022: श्रावण कोकणातला, श्रावण मनामनातला; तुम्ही अनुभवलेला श्रावणही असाल असेल ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 01:18 PM2022-07-29T13:18:32+5:302022-07-29T13:18:56+5:30

Shravan 2022: श्रावणात लेकीसुनांच्या हसण्याने आणि बांगड्यांच्या किणकीणीने घर भरून गेलेले असायचे. माहेरवाशिणींचे कोडकौतुक व्हायचे. आबालवृद्धांच्या सहभागामुळे घराचे नंदनवन होत असे.

Shravan 2022: Shravan celebration at native place; You must have experienced Shravan too, right? | Shravan 2022: श्रावण कोकणातला, श्रावण मनामनातला; तुम्ही अनुभवलेला श्रावणही असाल असेल ना?

Shravan 2022: श्रावण कोकणातला, श्रावण मनामनातला; तुम्ही अनुभवलेला श्रावणही असाल असेल ना?

googlenewsNext

>> अस्मिता दीक्षित 

आषाढ अमावस्या झाली की श्रावण सुरु होतो. श्रावण महिना हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानला आहे. बाहेर रिमझिम पाऊस पडत असतो आणि हवेत सुखद गारवा असतो. झाडे झुडपे हिरवीगार होवून आपल्याच नादात डोलत असतात. मातीचा सुगंध, पानांवरील दव आणि हवेतील सुखद गारवा, मरगळलेल्या मनास उभारी देतो . सृष्टी कात टाकून पुन्हा नव्याने उल्हसित होताना पाहून, कवी मनांना कविता लिहिण्याचे स्फुरण चढले नाही तरच नवल. आसमंत आणि संपूर्ण जनजीवन चैतन्यमय होऊन जाते. ही उर्जा अध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाची असते आणि म्हणूनच या महिन्यात व्रत वैकल्यांची जणू रेलचेल असते. श्रावण मास आबालवृद्ध सर्वांनाच भुरळ पडतो. 

या श्रावण मासात सोमवार,शनिवार विशेष मानले जातात. नवविवाहित मुलींना मंगळागौरी निम्मित्त माहेरी यायची ओढ लागते. या श्रावण मासाचे सर्वत्र मोठ्या दिमाखात स्वागत होते. मंगलागौरी पूजन, नाग पंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन ,श्रावणी सोमवारची शिवामूठ ,श्रीकृष्ण जयंती , गोपाळकाला ह्या सणांची हजेरी लागते. महिला वर्गही सणांच्या स्वागतास सज्ज होतो. श्रावणात अनेक व्रते आणि सणांमुळे घरात विविध पक्वान्ने केली जातात आणि त्यामुळे बालगोपाळ मंडळीही खुश असतात. जिभेचे चोचले पुरवणाऱ्या या श्रावणाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत असतात. श्रावण लहानथोर सर्वांचाच आहे. घरातील वडिलमंडळी व्रते वैकल्यात मग्न होतात तर बच्चे कंपनी गोपाळकाला येणार म्हणून खुश असतात. शेतकरी वर्ग नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करतो आणि पाऊस चांगला झाला म्हणून सुखावतोही.

Shravan Shukravar Vrat 2022: श्रावणातल्या शुक्रवारी 'असे' करा देवीचे कुंकुमार्चन; वाचा सविस्तर विधी!

आपल्या हिंदू धर्मात सणांची रेलचेल आहे आणि प्रत्येक सणाला होणारे पदार्थही वेगळे आहेत. आज गतिमान झालेल्या जगाने कुटुंबे विभक्त केली आहेत . घड्याळ्याच्या काट्यासोबत बांधलेल्या जीवनात वेळेअभावी  आणि  इच्छा असूनही अनेक गोष्टींचे पालन होवू शकत नाही .काळानुसार अनेक गोष्टी बदलत गेल्या. पूर्वी एकत्र कुटुंबे होती . स्वयंपाकघर जावा , नणंदा, सासू,  ,लेकीसुनांच्या हसण्याने आणि बांगड्यांच्या किणकीणीने भरून गेलेले असायचे. माहेरवाशिणींचे कोडकौतुक व्हायचे, पण आता एकत्र कुटुंबपद्धती नामशेष होत चालली आहेत. त्यामुळे पूर्वीसारखे एकत्र पंक्तीभोजन , पुरणपोळी वर ताव मारणे काळाच्या पडद्याआड गेले आहे .काही घराण्यात  सवाष्णीस गोडधोडाचे  भोजन करून तिची ओटी भरण्याची प्रथा आहे.

श्रावणाची खरी मजा लुटायची तर ती कोकणात.  हिरवागार शेला नेसलेल्या डोंगरदऱ्या, पाटातून वाहणारे झुळूझुळू पाणी, आल्हाददायक निसर्ग , हवेतील गारवा , सारवलेली जमीन आणि मातीचा सुगंध मन मोहून टाकतो. पाटाच्या पाण्यात कागदी बोटी सोडून आनंद घेणे यासाठी खरच नशिबी असावे लागते. झाडाच्या पारंब्याना झोका बांधून गाणी म्हणत  उंचच उंच झोका खेळताना मुलींना आकाश जणू ठेंगणे होते. असा हा श्रावणाचा गंध अनुभवणे आणि त्यात हरवून जाणे ह्याची मजा  ज्याची त्यांनीच अनुभवायची ,हे सर्व शब्दांकित करणे केवळ अशक्य.  गावातील आणि शहरातील जीवनशैली भिन्न असल्याने ही मजा शहरात पाहायला मिळणे विरळच. केळीच्या पानावरील गरम वरणभात , सुक्या बटाट्याची भाजी, नुकतेच घातलेले कैरीचे लोणचे ,लिंबाची फोड आणि त्यावर साजूक तुपाची धार ,जोडीस कुरडया ,पापड , खीर पुरण आणि आलेमीठ लावलेले ताक हे जेवण म्हणजे खरोखरच स्वर्गसुख. 

मंगळागौरी पूजन आणि फुगड्या खेळत रात्र जागवण्याची मजाही खासच .नागपंचमीला दिंड षष्ठीला पातोळे केले जातात .शिळा सप्तमीला सांदणी ह्या गोड पदार्थासोबत अळूची भाजीही केली जाते.गोकुळाष्टमीला दही, पोहे ,लाह्या एकत्र करून गोपाळकाला केला जातो तर नारळी पौर्णिमेला नारळी भात , करंज्यांचा खास असा मेनू असतो .श्रावण अमावास्येला म्हणजेच पिठोरीला खीर पुरी केली जाते. अनेक घरातून जिवतीपूजनही केले जाते.आजकाल मुलांना पारंपारिक पदार्थांची नावे सुद्धा माहित नसतात त्यामुळे न्ह्या निम्मित्ताने त्यांचीही तोंड ओळख होते.

ह्या सर्व सणांच्या निम्मित्ताने अनेक पिढ्यातील लोक एकत्र येतात, घरातील स्त्रीवर्गाची दागदागिने घालून मिरवण्याची हौस फिटते , एकमेकांच्या हातचे पदार्थ खायला मिळतात आणि कुटुंबातील एकोपा वाढतो. पुढील पिढीस आपल्या रीतीरिवाजांची ओळख होते , कुटुंबातील नात्यातील वीण घट्ट होते आणि प्रेम वृद्धिंगत होते. ते जुने दिवस परत यावेत आणि हा श्रावण पूर्वीसारखाच हासरा-नाचरा व्हावा ही देवाकडे प्रार्थना!

Email: antarnad18@gmail.com

Web Title: Shravan 2022: Shravan celebration at native place; You must have experienced Shravan too, right?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.