Shravan 2022: माता पार्वतीबद्दल असे काय भविष्य नारादांनी वर्तवले, की हिमालयाला अश्रू अनावर झाले? वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 01:00 PM2022-08-04T13:00:38+5:302022-08-04T13:01:03+5:30
Shravan 2022: वडील आणि मुलीच्या प्रेमळ नात्याचा हा हृद्य प्रसंग अगदी घरोघरी घडणारा आहे.
दक्ष प्रजापती यांची कन्या सती, हिने शंकराशी विवाह केला, परंतु तो विवाह पित्याच्या मनाविरुद्ध झाल्यामुळे एका यज्ञ समारंभात दक्ष राजाने सतीला आणि शिवाला आमंत्रित केले नाही. मात्र ते सोडून सगळे देव, गंधर्व त्या सोहळ्याला उपस्थित राहणार होते. सतीला वाटले, की समारंभाच्या गडबडीत वडिलांकडून आपल्याला बोलावणे राहून गेले असेल. घरचाच सोहळा असल्याने आमंत्रणाची वाट न पाहता आपण समारंभाला जावे असे तिने शिव शंकराला सुचवले.
कोणी बोलावल्याशिवाय जाऊ नये, हा शिष्टाचार लक्षात घेता शंकरांनी स्वतः न जाण्याचा निर्णय आणि सतीनेही जाऊ नये असा सल्ला दिला. सतीला राहवेना. ती हट्टाने समारंभाला पोहोचली. परंतु पित्यासह कोणीच तिची दखल घेतली नाही. उलट तिला अपमानित केले. आपल्या पतीचे न ऐकता आपण सोहळ्यात आलो, वरून अपमानित झालो, या विचाराने सतीने योगाग्नीने स्वतःला भस्म केले. शंकरांना ही वार्ता कळताच त्यांनी आपल्या जटेतून वीरभद्र निर्माण केला आणि त्याने दक्षाचा यज्ञसमारंभ उधळून लावला. सती विरहाने शंकर व्याकुळ झाले. ते तपाचरणात मग्न झाले. भविष्यात सतीने हिमालय पर्वताची मुलगी पार्वती या नावे जन्म घेतला.
पार्वतीच्या जन्मामुळे हिमालयाचे सौंदर्य अधिकच वाढले. तिथे लता, वेली बहरू लागल्या. एकमेकांना शत्रू मानणारे पशु-पक्षी एकमेकांशी प्रेमाने वागू लागले. ऋषींनी आश्रम बांधले. नवीन औषधी झाडे बाहेर आली आणि तिथे रत्नांच्या खाणी तयार झाल्या. एवढ्या सद्गुणी मुलीचे भविष्य जाणून घेण्याची हिमालयाला उत्सुकता वाटली. त्यांनी महर्षी नारदांचे पाचारण केले.
नारद मुनी पर्वतराजांच्या घरी पोहोचले :
पर्वतराजांनी महर्षींचे स्वागत करून मुलीच्या गुण-दोषांचे भाकीत विचारले. नारद मुनी गूढपणे हसले आणि म्हणाले की ही मुलगी सर्व गुणांची खाण आहे. ती स्वभावाने सौम्य आणि हुशार आहे. पार्वती, उमा, अंबिका आणि भवानी अशा अनेक रूपांनी ती ओळखली जाईल. ती जगभर पूजनीय ठरेल. मात्र त्याबरोबरच....
असे म्हणून महर्षी थांबले, तेव्हा हिमालयाला चिंता वाटली. पण काय? असे विचारताच महर्षी म्हणाले, ती पतिव्रता असेल, परंतु तिचे पती योगी, जटाधारी, स्मशान प्रिय, वैरागी वृत्तीचे असतील. तिला सासरी वैभव मिळणार नाही. परंतु पतीचे भरपूर प्रेम मिळेल आणि मुलं हुशार असतील. हिमालयात लाडाकोडात वाढलेल्या आपल्या मुलीच्या वाट्याला दारिद्र्य येणार या कल्पनेने हिमालयाला अतीव दुःख झाले.
भविष्यात श्रीहरी विष्णूंचे स्थळ चालून आले, परंतु पार्वतीने त्या स्थळाला नकार दिला आणि लग्न करेन तर शंकराशी हा हट्ट केला. तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याशी विवाहाचा प्रस्ताव मान्य करून घेतला. मात्र हिमालयाला शंकराचे स्थळ पसंत नव्हते. मात्र विवाहानंतर पार्वतीला आनंदी पाहून तिचे पिता हिमालय समाधान पावले.