Shravan 2023: २४ ऑगस्ट रोजी दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमी यांचा संयोग; माता आणि पुत्राची 'अशी' करा उपासना!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 08:02 AM2023-08-23T08:02:15+5:302023-08-23T08:02:36+5:30
Shravan 2023: भाद्रपदात गणपतीच्या पाठोपाठ गौरी पाहुणचाराला येतेच, पण श्रावणातही हा छान संयोग जुळून येतो त्याचा लाभ घ्यावा.
दुर्गाष्टमीची तिथी दर महिन्याच्या अष्टमीला साजरी केली जाते. ही तिथी देवीची जन्मतिथी असल्याने दर महिन्यात तिचे स्मरण, पूजन आणि उपासना व्हावी म्हणून अनेक जण आठवणीने दुर्गाष्टमीचे व्रत करतात. तसेच श्रावण शुद्ध अष्टमीला गणेशाचे स्मरण म्हणून दुर्वाष्टमीचे व्रत करतात. श्रावण मासातील ही अष्टमी आणखी एका अर्थाने महत्त्वाची आहे, ती म्हणजे श्रावण वद्य अष्टमी, जिला आपण कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी, कृष्ण जन्म या नावे साजरी करतो. यंदा ६ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमी आहे. तेव्हा कृष्णपुजेने ती तिथी साजरी करूच, तूर्तास माता आणि पुत्राची उपासना श्रावण शुद्ध अष्टमीला अर्थात २४ ऑगस्टला करूया. कशी ते पाहू.
दुर्वाष्टमी :
या तिथीचे प्रयोजन करण्यामागे सांगितली जाते एक पौराणिक कथा : ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाचा राक्षस त्रास देत होता. देवतांच्या विनंतीवरून गणरायाने त्याच्याशी युद्ध केले आणि शेवटी त्या असूराला गिळून टाकले. तो असुर अग्नीसारखा तप्त होता. त्याला गिळल्यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ दुर्वांची जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेली अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली.त्यावेळी, गणरायाने सांगितले, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात व दुर्वाष्टमीचे व्रत केले जाते.
दुर्वा कशा वाहायच्या?
दुर्वा म्हणजे गवत. जे सहजपणे कुठेही उपलब्ध होते. दुर्वांच्या एका जुडीत २१ दुर्वा असतात. या जुडीसाठी प्रत्येक दुर्वा निवडताना त्यात त्रिदल असलेले पाते निवडले जाते. त्याची जुडी सुटू नये म्हणून दोऱ्याने बांधली जाते. अनेक ठिकाणी अशा २१ जुड्यांचा हार बनवून देवाला दुर्वांची कंठी घातली जाते. त्यानिमित्ताने दुर्वांची जुडी बनवताना अथर्वशीर्षाची २१ आवर्तनेदेखील केली जातात. वेळेअभावी ते शक्य नसेल, तर निदान एक जुडी तरी स्वहस्ते बनवून एक आवर्तन म्हणून गणरायाला दुर्वा अर्पण कराव्यात. तेही शक्य नसेल, तर निदान दुर्वाचे एक त्रिदल त्याचा अग्रभाग अर्थात टोकाची बाजू आपल्याकडे घेऊन निमुळती बाजू बाप्पाकडे ठेवून भक्तिभावे अर्पण करावी.
दुर्गाष्टमी
देवीने अनेक दैत्यांचे पारिपत्य केले. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिचे मासिक स्मरण म्हणून दुर्गाष्टमीचे व्रत केले जाते. या दिवशी देवीच्या मंदिरात जाऊन तिचे दर्शन घ्यावे. सामूहिक रित्या श्रीसूक्त, लक्ष्मी सूक्त आदी देविस्तोत्रांचे पठण करावे. देवीला कुंकुमार्चन करावे. देवीचे स्वरूप समजून एखाद्या सवाष्णीला हळदी कुंकवास बोलवावे, कुमारिकेला खाऊ द्यावा आणि त्यांच्या रूपातून देवीची अर्चना करून तिचे आशीर्वाद घ्यावेत व पुढच्या मासात अर्थात भाद्रपदात मुक्कामी ये असे आमंत्रण देऊन तिला दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करावा.
व्रताच्या संकल्पना अतिशय साध्या, सोप्या आणि रोजच्या व्यावहारिक जीवनाशी निगडित आहेत. एकमेकांचा सन्मान करणे, आनंद देणे-घेणे आणि सणांचे पावित्र्य जपणे हा यामागचा शुद्ध हेतू आहे. या सगळ्यात भक्ती भाव महत्त्वाचा! तो असला की आपली साधी आणि छोटीशी प्रेमभरित कृती सुद्धा देवापर्यंत पोहोचते हे नक्की!