श्रावणी शनिवार: ‘असे’ करा अश्वत्थ मारुती पूजन; पाहा, व्रतकथा, मान्यता अन् महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 01:38 PM2023-08-18T13:38:55+5:302023-08-18T13:40:52+5:30
Shravan Shanivar 2023: श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुतीचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. व्रतपूजाविधी, महत्त्व, मान्यता आणि व्रतकथा जाणून घ्या...
Shravan Shanivar 2023: श्रावण महिना सुरू झाला आहे. यंदा चातुर्मासात श्रावण महिना अधिक असल्यामुळे आता निज श्रावण महिन्यात व्रत-वैकल्ये आणि सण-उत्सव साजरे केले जात आहे. पुढील महिनाभर श्रावणातील व्रत-वैकल्यांची रेलचेल असणार आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. श्रावणी सोमवार, मंगळवार, बुध-बृहस्पति पूजन, जरा-जिवंतिका पूजन यांसह श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन केले जाते. तसेच नृसिंह पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. अश्वत्थ मारुती पूजन कसे करावे? व्रतपूजनाचा विधी, महत्त्व, मान्यता आणि व्रतकथा जाणून घ्या...
श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. षोडषोपचार पूजन करावे. हनुमंताला आवडणारा नैवेद्य दाखवावा. धूप, दीप अर्पण करून आरती करावी. प्रसाद ग्रहण करावा. पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास हनुमंतांचे घरच्या घरी पूजन, नामस्मरण करावे, असे म्हटले जाते.
सिंधुसंस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक
शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो, असा समज आहे. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला. पुढे ऋग्वेदकाळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून बनविली जाई. उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले.
शनिवारची (मारुतीची) कहाणी
या पूजनाची एक कथा पद्यपुराणात आढळते. एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णूभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा घेण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले. परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले. ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून स्वत:चे रक्षण व्हावे, या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे. एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली. तत्क्षणी तिथे विष्णू प्रकटले. तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मलाच जखमा झाल्या आहेत, असे विष्णूंनी सांगितले.
विष्णू प्रसन्न झाले, कुबेराने श्रीमंत केले
विष्णूंचे कथन ऐकून धनंजय अतिशय दुःखी झाला. तत्क्षणी त्याच कुऱ्हाडीने स्वत:ची मान मोडून प्रायश्चित्त घेण्याचे धनंजयने ठरविले. त्याची भक्ती पाहून विष्णू प्रसन्न झाले. धनंजयांला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक पूजा करू लागला. पुढे कुबेराने त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले. प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये वृक्षांमध्ये जो अश्वत्थ तो मी होय, असे म्हटले आहे. काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी महिला वटवृक्षाप्रमाणेच अश्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात. दुष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो, असे सांगितले जाते.