Shravan 2023: श्रीकल्याणेश्वर शिव मंदिर; नागपूर येथील ऐतिहासिक घटनेची साक्ष देणारे शिवालय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 03:01 PM2023-08-23T15:01:53+5:302023-08-23T15:02:22+5:30
Shravan 2023: खाजगी मालकीचे तरी ऐतिहासिक ठेवा असलेले हे शिव मंदिर अतिशय प्रेक्षणीय आहे; सविस्तर जाणून घ्या.
>> सर्वेश फडणवीस
पवित्र असा श्रावण महिना. अनेक शिव मंदिरामध्ये रुद्र आणि श्रीशिवम्हिम्नस्तोत्राचे श्लोक निनादत असतात. दरवेळी प्राचीन श्रीकल्याणेश्वर शिव मंदिरात दर्शनार्थ प्रवेश करताक्षणीच विलक्षण अनुभूती आणि ऊर्जा मिळते. मंदिर म्हणजे केवळ एक वास्तू नसून तिच्यात इतिहास, अध्यात्म, वास्तुशास्त्र, शिल्पकला इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव असतो. मन स्थिर राहण्यासाठी, अहंकार गळून पडण्यासाठी, अध्यात्मिक भूक भागविण्यासाठी, आजही आपण मंदिरात जातो आणि देवतेपुढे नतमस्तक होत असतो. जीवन समृद्ध, सुखी होण्यासाठी, सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी आपल्याला मंदिरात जाऊन देवतेपुढे नतमस्तक व्हावेसे वाटते आणि मानवी मनाला आश्वस्त झाल्यासारखे वाटत असते. हेच औचित्य साधत श्रावण सोमवारी नागपूर शहरातील अशाच काही जुन्या शिव मंदिरांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
नागपूर शहराचा इतिहास, श्रीमंत राजे भोसले राजवंश व गोंड राजवंश यांच्या भोवतीचा आहे. या उभय राजवंशांनी नागपूरचे वैभव उभे केले होते. त्यातही विशेषतः द्वितीय रघुजी भोसले महाराजांच्या कारकीर्दीत नागपूरचा दर्जा सुशोभित अशा दिल्ली शहरासारखा होता. त्यावेळी बाग-बगीचे, पेठा, राजवाडे, मंदिर, मठ, स्थापत्य, स्मारक, स्तंभ यांच्या उभारणीची त्यांनी झपाट्याने सुरुवात केली होती. त्यातील त्यांनी बांधलेली मंदिरे आजही सुस्थितीत आणि या सगळ्या वैभवाची साक्ष देत उभे आहे.
तेलंगखेडी भागातील असेच पूर्वाभिमुख असलेले प्राचीन श्रीकल्याणेश्वर शिव मंदिर हे अद्भूत आणि ऐतिहासिक मंदिर आहे. काही कागदपत्रांनुसार या मंदिराचे बांधकाम श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी १७८५ मध्ये केले आहे असं म्हणतात तर काही इतिहासकारांच्या मते श्रीमंत राजे रघुजी भोंसले यांच्या आई म्हणजे चिमाबाईंनी १७९४ साली बांधले असे सांगतात. पण या मंदिराबद्दल लिखित माहिती उपलब्ध नाही. आज मंदिराला २२९ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. पण आजही मंदिर चांगल्या स्थितीत आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी सुरुवातीला काळा दगड आणि वाळूचे खडे वापरण्यात आले. गर्भगृह, सभामंडप आणि अंतराल अशी मंदिराची शैली आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की या मंदिराच्या सभामंडपात अनेक खांब आहेत.
खरंतर श्रीमंत भोसले यांचे मंदिरस्थापत्य हा एक स्वतंत्र विषय आहे. पण त्यालाही मर्यादा आहे. नागपूर शहरातील भोसल्यांनी बांधलेल्या या मंदिराचे वेगळेपण आजही दिमाखात उभे आहे.
नागपूरमधील हे प्राचीन कल्याणेश्वर शिव मंदिर म्हणजे स्थापत्यकृती, आणि मंदिराच्या बाहेरील शिल्पप्रतिमा यांचा परमोच्च बिंदू आहे. नागपूरातील वास्तुकलेचे वेगळेपण म्हणजे दगडी बांधणी असलेली ही मंदिरे अनेक प्रकारच्या जाळीदार नक्षीने सुशोभित अशी आहेत. आता हे मंदिर श्री आशुतोष शेवाळकर यांच्या खाजगी मालकीचे आहे आणि त्यांनी या मंदिराचे पावित्र्य, स्वच्छता यामुळे जपून ठेवले आहे. प्रत्येकाने आवर्जून बघायला हवे असे एकमेवाद्वितीय श्रीकल्याणेश्वर शिव मंदिर आहे.