Shravan 2023: धेनु ऋण कशाला म्हणतात? मृत्यूपूर्वी ते का आणि कसे फेडता येतात? जाणून घेऊ!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 01:39 PM2023-08-17T13:39:52+5:302023-08-17T13:40:43+5:30
Shravan 2023: आपल्याकडे म्हण आहे, 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही'; या म्हणीचा अर्थ आणि त्याच्याशी संबंधित धर्माचरण जाणून घेऊया.
>> सुजित भोगले
मराठीत अनेक म्हणी आहेत, ज्यांचा वापर केला असता कमी शब्दात अचूक आशय पोहोचवता येतो. अशीच एक म्हण म्हणजे, 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही' म्हणजेच कुणाच्या बोलण्याने कुणाचे काम अडत नाही की त्यात विघ्नही येत नाही. हे सांगण्यासाठी कावळा आणि गाय यांचेच रूपक का योजले आहे ते पाहू.
दशक्रिया विधी केला जातो तिथे जर पिंडाला कावळा शिवला नाही.. अर्थात प्रेतात्मा पुढील गतीला गेला नाही हे उघड झाल्यावर सगळेच थोडेसे हतबल होतात.. मग दर्भाचा कावळा बनवला जातो आणि त्याने पिंडाला स्पर्श करतात आणि तो पिंड गायीला खायला घालतात..
गायीलाच का ?
तर ती सुद्धा मृत्यूलोक आणि मानवलोकातील दुवा मानली जाते.. तिला दिलेले अन्न अतृप्त आत्म्याच्या पापांचे शमन करून त्यांच्या मुक्तीचा मार्ग प्रशस्त होईल अशी श्रद्धा आहे..
थोडक्यात जिवंतपणे ज्याने गाईंना अन्न दिले नसेल तर ते ऋण बाकी आहे.. याला धेनु ऋण म्हणतात.. कारण गाईचे पदार्थ आपण भक्षण करतो. .पण त्याची परतफेड केली नाही तर धेनु ऋण शिल्लक आहे असे म्हणतात..
मग हे धेनु ऋण परतफेड करावी.. तिच्या आशीर्वादाने प्रेतात्म्याच्या अन्य वासनांचे शमन व्हावे आणि त्याने पुढील गतीला जावे हा हेतू..
या सगळ्या प्रक्रियेत.. प्रेतात्म्याचे अस्तित्व जाणवल्याने पिंडाला न स्पर्श करणारा कावळा उपाशीच राहिला ना..
तो उपाशी कावळा आपल्या वाटणीचा पिंड गायीला मिळाला म्हणून तिला शाप देतो...
परंतु गाय मुळातूनच दैवी प्राणी आहे त्यामुळे या शापाने तिला काहीही फरक पडत नाही....म्हणूनच म्हणतात... कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...!
तात्पर्य : कोणी काही शाप दिला, अपशब्द काढले म्हणून आपण खचून जाण्याचे कारण नाही. आपला स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्त्वावर विश्वास हवा आणि त्याबरोबरच आपल्या कार्याला ईश्वरी अधिष्ठान हवे याकरिता धर्मपालन केले पाहिजे. त्यामुळे यापूर्वी जर तुमच्याकडून गोसेवा झाली नसेल तर आजपासून सुरू झालेल्या श्रावण मासात गोसेवेची संधी दवडू नका. कारण 'धर्मो रक्षति रक्षित:' म्हणजेच जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे धर्म रक्षण करतो, हे लक्षात ठेवा!