Shravan 2023: श्रावणातला प्रत्येक दिवस उत्सवासारखा का वाटतो? या आनंदामागे आहे खास कारण...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 07:06 AM2023-08-23T07:06:15+5:302023-08-23T07:14:01+5:30

Shravan 2023: मराठी माध्यमाच्या शाळांना श्रावण सोमवारी अर्धा दिवस शाळा असायची, आजच्या पिढीला श्रावणाची ओळख करून देताना आठवणींसह द्या ही माहिती!

Shravan 2023: Why every day of Shravan feels like a festival? There is a special reason behind this happiness...! | Shravan 2023: श्रावणातला प्रत्येक दिवस उत्सवासारखा का वाटतो? या आनंदामागे आहे खास कारण...!

Shravan 2023: श्रावणातला प्रत्येक दिवस उत्सवासारखा का वाटतो? या आनंदामागे आहे खास कारण...!

googlenewsNext

आजच्या पिढीला इंग्रजी बारा महिन्यांची नावे माहित आहेत, परंतु मराठी बारा महिने कोणते असे विचारले असता ते बुचकळ्यात पडतात. त्यांना आपल्या संस्कृतीचा परिचय करून द्यायचा असेल, तर आपल्याला सण-उत्सवांच्या मदतीने बारा महिन्यांची ओळख करून देता येईल व त्यातही 'मनभावन हा श्रावण' का आहे, ते पुढील माहितीद्वारे पटवून देता येईल. 

श्रावण मास येताच सृष्टीतील बदल आपल्याला जाणवू लागतात. बालकवींनी `श्रावणमासी हर्षमानसी' या कवितेत केलेल्या उल्लेखाप्रमाणे 
क्षणात येती सरसर शिरवे,
क्षणात फिरूनी ऊन पडे!
असा हा ऊन पावसाचा खेळ श्रावणात रंगतो. श्रावणसरींनी, व्रत वैकल्यांनी, सण-उत्सवांनी हा महिना चिंब भिजलेला असतो, म्हणून त्याला मराठी महिन्यांचा राजा म्हटले जाते. 

या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा आधी किंवा नंतर श्रवण नक्षत्र असते, म्हणून याला श्रावण या नावाने ओळखले जाते. श्रावण हा सणांच्या व्रत-वैकल्याच्या दृष्टीने चातुर्मासातीलच नव्हे तर बारा महिन्यातील महत्त्वाचा महिना म्हणावा लागेल. त्याचे महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे श्रावणातील प्रत्येक दिवशी प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते तरी व्रत केले जाते. इतर महिन्यातील व्रत वैकल्ये ही बहुतेक तिथीनुसार आलेली आहेत. पण श्रावणातील व्रते ही तिथीप्रमाणे, वारानुसार योजलेली असतात. 

दर श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांसाठी एकभुक्त उपास केला जातो. तसेच शिवाला शिवामूठ वाहिली जाते. मंगळवारी नूतन विवाह झालेल्या मुली मंगळागौरीची पूजा आणि जागरण करतात. बुधवारी बुधपूजन तर गुरुवारी बृहस्पतिपूजन करतात. शुक्रवारी लक्ष्मीच्या पूजेचे स्त्रियांसाठी खास व्रत आहे. या दिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक रांधून सवाष्णींना जेवू घालतात. शनिवारी मुंज झालेल्या मुलाला जेवू घालतात. तसेच मारुतीला किंवा शनिला तेल वाहून नारळ वाढवतात. रविवारी सूर्यपूजा करून खीरीचा नैवेद्य दाखवतात. 

श्रावणात मंदिरांमध्ये तसेच ठिकठिकाणी कथा, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन केले जाते. शुभमुहूर्त पाहून भागवत सप्ताह आयोजित केला जातो. त्यानिमित्ताने लोक भगवद्कार्य करणाऱ्या कथेकरीला शिधा, दक्षिणा देतात. 

याबरोबर श्रावणात अनेक मोठे सणही येतात. नागपंचमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्णजन्म, गोपाळकाला, पिठोरी अमावस्या, बैलपोळा इ. वैविध्याने युक्त असलेल्या सण समारंभातून आनंदाचा वर्षाव होतो. वर्षा ऋतूमुळे थबकलेल्या सणांना नागपंचमीपासून पुन्हा प्रारंभ होतो. त्यात पावसामुळे निसर्गानेदेखील चहुकडे `हिरवे हिरवे गार गालिचे' अंथरले असतात. निसर्गाचा सृजनसोहळा मानवी मनालाही उभारी देतो. म्हणून श्रावण सर्व महिन्यांचा राजा ठरतो.

Web Title: Shravan 2023: Why every day of Shravan feels like a festival? There is a special reason behind this happiness...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.