Shravan 2023: आहाराची पथ्य सांभाळत श्रावण पाळणे का महत्त्वाचे? जाणून घ्या शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 07:31 AM2023-08-23T07:31:53+5:302023-08-23T07:32:23+5:30
Shravan 2023: ज्यांना श्रावणातील व्रत वैकल्यांचे आचरण शक्य नाही, त्यांनी निदान आहारासंबंधित नियम पाळावेत असे धर्मशास्त्र सांगते!
श्रावण मासात जलवर्षावाने सुस्नात झालेली सर्व सृष्टी आपल्या समग्र ऐश्वर्यासह फुलून येते. चराचराला सुखावते. पुलकित, उत्साहित करते आणि आनंदाचा, नवसृजनाचा संदेश देते. म्हणून श्रावण मासात सण आणि उत्सवांनाही बहर येतो. श्रावण हा चार्तुमासातील विशेष महत्त्वाचा आणि पवित्र महिना आहे. म्हणून या मासात पूजा, व्रतवैकल्ये, कीर्तन, धार्मिक प्रबोधनाचा जणू महोत्सवच असतो. यातील प्रत्येक तिथी विशेष महत्त्वाची, उत्क्रांतीची आणि भाव, भक्तिसहित नानाविध सात्विक वृत्तीचे उत्कट दर्शन घडवणारी असते.
श्रावणात प्रत्येक रविवारी जाग येताच मौन धारण करून स्नान केल्यावर सूर्याची पूजा करून रविवारची आदित्यराणूबाईची कहाणी श्रवण करतात. दर सोमवारी उपास करून शंकराला अभिषेक, पूजा करून शिवामूठ अर्पण करून सोमवारच्या कथा ऐकतात. नवविवाहित स्त्रिया दर मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करतात. याव्यतिरिक्त श्रावण शुक्ल तृतीयेस गौर्यांदोलन उत्सवारंभ, पंचमीस नागपंचमीव्रत, दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मीव्रत, एकादशीस पुत्रदा एकादशीव्रत, पौर्णिमेस रक्षाबंधन तर वद्य पक्षातील अष्टमीस कृष्णजन्माष्टमीव्रत आणि अमावस्येस पिठोरीव्रत अशी विविध व्रते करतात. श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाचे, गुरुवारी बृहस्पतीचे, शुक्रवारी लक्ष्मीचे व जराजिवंतीकेचे तर शनिवारी शनि व मारुतीचे पूजन केले जाते.
चातुर्मासासाठी जे नियम सांगितले आहेत त्यापैकी विशेषत: मद्यमांस, कांदा, लसूण आदि निषिद्ध पदार्थांचे सेवन, स्त्रीसंग, केशकर्तन आदि वर्ज्य सांगितले आहेत. हे नियम किमान श्रावणात तरी पाळावेत असा शिष्टसंकेत आहे.
गायत्री महामंत्राची पुरश्चरणे, नवनाथ भक्तिसार, भक्तिविजय, काशीखंड, शिवलीलामृत इत्यादी पुराणग्रंथ तसेच गुरुलीलामृत, साईसच्चरित, गजाननविजय, गुरुचरित्र इ. संतचरित्रपरग्रंथांचे वाचन याशिवाज बिल्वार्चन, तुलस्यर्पण, नित्यप्रदक्षिणा आदि नियम याच महिन्यात केले जातात.
ज्यांना यापैकी काही शक्य नसेल त्यांनी आहाराविषयी नियम पाळावेत. या नियमात नित्य फलाहार, एकभुक्तव्रत, नक्तव्रत, शाकव्रत, पयोव्रत, भोजनसमयी मौनव्रत यापैकी एखादे तरी व्रत अवश्य करावे.
अशा प्रकारे सृष्टीसौंदर्याची व्रते, उत्सव, सणांची रेलचेल असलेला, आनंदाने बहरलेला आणि श्रद्धाभक्तीने ओसंडून वाहणारा श्रावणमास सर्वांनाच हवाहवासा वाटतो.