Shravan Amavasya 2023: आज पिठोरी अमावस्येनिमित्त प्रत्येक महिलेने वाचावी ही पौराणिक कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:34 PM2023-09-14T12:34:42+5:302023-09-14T12:35:16+5:30

Pithori Amavasya 2023: आपल्या मुलाला निरोगी व दीर्घायुष्य मिळावे म्हणून पिठोरी अमावस्येची कथा श्रद्धेने वाचली जाते आणि त्यानुसार प्रार्थना केली जाते. 

Shravan Amavasya 2023: Every woman should read this mythological story on Pithori Amavasya today! | Shravan Amavasya 2023: आज पिठोरी अमावस्येनिमित्त प्रत्येक महिलेने वाचावी ही पौराणिक कहाणी!

Shravan Amavasya 2023: आज पिठोरी अमावस्येनिमित्त प्रत्येक महिलेने वाचावी ही पौराणिक कहाणी!

googlenewsNext

आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण होता. त्याच्या घरी श्रावणात अवसेच्या दिवशी बापाचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळी बाळंत होऊन पोर मरून जाई. असे झाले म्हणजे ब्राह्मण उपाशी जात असत. अशी सहा वर्षे झाली. सातव्या वर्षीही तसेच झाले. तेव्हा सासरा रागावला आणि मेलेले पोर तिच्या ओटीत ठेवले आणि तिला रानात हाकलून दिले. 

पुढे जाता जाता मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली `बाई, बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचे काय कारण? आलीस तशी लवकर जा. नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि मारून खाऊन टाकील!'
तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, `तेवढयाकरता इथे आले आहे.'
झोटिंगची बायको म्हणाली, `एवढी जीवावर उदार का झाली?'

ब्राह्मणाची सून आपली हकिकत सांगू लागली. ती म्हणाली, `मी एका ब्राह्मणाची सून, दरवर्षी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या आजेसासऱ्यांचे श्राद्ध असे. माझे असे झाल्याने ब्राह्मण उपाशी जात. अशी सहावेळा माझी बाळंतपणं झाली. सातव्या खेपेलाही असेच झाले. तेव्हा मामंजींना राग आला आणि ते म्हणाले, `माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला, तू घरातून चालती हो!'असे म्हणत मेलेले मूल ओटीत ठेवून मला घालवून दिले.'

हे सांगून ती रडू लागली. तशी झोटिंगची बायको तिला म्हणाली, `बाई तू भिऊ नकोस. घाबरू नकोस. अशी थोडी पुढे जा. तिथे झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, साती अप्सरा तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपूरीचा नैवेद्य दाखवतील आणि कोण अतिथी आहे म्हणून विचारतील. असे विचारल्यावर मी आहे असे म्हण. त्या तुला पाहतील, तुझी चौकशी करतील त्यांना तू सगळी हकीकत सांग.'

ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटले आणि तिथून उठून ती पुढे गेली. तिथे बेलाचे झाड पाहिले. इकडे तिकडे पाहिले. शिवलिंग नजरेस पडले. त्याला नमस्कार करून ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. रात्र झाली, तशी नागकन्या, देवकन्या, अप्सरा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली. अतिथी कोण आहे विचारले. सूनेने उत्तर दिले `मी आहे' तेव्हा सगळ्यांनी पाहिले. त्यांनी तिची चौकशी केली. तिने सगळी हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्या, अप्सरांनी तिची सातही मुले जिवंत केली व तिच्या हवाली केली. पुढे तिला हे व्रत करायला सांगितले. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली व मृत्यूलोकी हे व्रत करायला सांगितले. 

'हे  व्रत केले म्हणजे मुले बाळे दगावत नाहीत. सुखासमाधानात राहतात.' असे त्या म्हणाल्या. तिने सर्वांना नमस्कार केला. मुलांना घेऊन ती समाधानाने घरी परतली. तिने घरच्यांना सर्व हकीकत सांगितली. सगळे आनंदून गेले. गावकऱ्यांना आश्चर्य वाटले. तेव्हापासून ही प्रथा करण्याची प्रथा पडली. 

ही कथा आजच्या काळात विज्ञानवादी लोकांना पटणार नाही. परंतु ज्याप्रमाणे आजच्या काळात बालरोगतज्ज्ञ आहेत, तसेच वैद्यकीय ज्ञान नागकन्या, देवकन्या, अप्सरा यांना नसेल कशावरून? त्यायोगे त्यांनी तिचे व बाळाचे उपचार करून त्यांना परत पाठवले असेल. याचाच अर्थ, सगळी दारे बंद होतात तेव्हा नवे दार उघडते. हे आशेचे दार म्हणजे तत्कालीन व्रत कहाण्या आणि विधी! या व्रताचरणाने कोणालाही अपाय तर नाहीच, उलट एकमेकींना सहाय्य करण्याची वृती अंगी बाणली पाहिजे असा संदेशमिळतो.  हा गर्भितार्थ जरी आपण या कथेतून घेतला, तरी पिठोरी अमावस्येची साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होईल!

Web Title: Shravan Amavasya 2023: Every woman should read this mythological story on Pithori Amavasya today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.