श्रावण संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, बाप्पा करेल इच्छा पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ, महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 07:00 AM2023-09-02T07:00:07+5:302023-09-02T07:00:07+5:30

Shravan Sankashti Chaturthi 2023: काही दिवसांनी लाडक्या गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होत असून, त्यापूर्वी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. चंद्रोदय वेळ जाणून घ्या...

shravan sankashti chaturthi 2023 date time vrat vidhi puja significance and chandrodaya timing of sankashta chaturthi september 2023 | श्रावण संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, बाप्पा करेल इच्छा पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ, महत्त्व

श्रावण संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, बाप्पा करेल इच्छा पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ, महत्त्व

googlenewsNext

Shravan Sankashti Chaturthi 2023: व्रत-वैकल्यांची रेलचेल असणारा श्रावण महिना सुरू आहे. अगदी काही दिवसांनी घरोघरी सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होईल. तत्पूर्वी श्रावणातील वद्य चतुर्थीला गणरायाचे विशेष मानले जाणारे संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थीपूर्वी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते. श्रावणातील संकष्ट चतुर्थीचे व्रत कसे करावे? प्रमुख शहरातील चंद्रोदय वेळ कोणती? संकष्ट चतुर्थीचे महत्त्व जाणून घेऊया... (Shravan Sankashti Chaturthi 2023 Date And Time)

प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे.  मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते. (Shravan Sankashti Chaturthi 2023 Significance)

निज श्रावण संकष्ट चतुर्थी: रविवार, ०३ सप्टेंबर २०२३

निज श्रावण वद्य चतुर्थी प्रारंभ: शनिवार, ०२ सप्टेंबर २०२३ रोजी रात्रौ ०८ वाजून ४९ मिनिटे.

निज श्रावण वद्य चतुर्थी समाप्ती: रविवार, ०२ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०६ वाजून २४ मिनिटे.

भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चारचौघा मुलांसारखे वागावे म्हणून यशोदामातेने हे व्रत केल्याचा उल्लेख आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते. काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात, तर काही ईच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्ट चतुर्थीचे व्रत ईच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता, गणरायाची कृपादृष्टी लाभून ईच्छापूर्ती होते, असा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे. या दिवशी उपासाइतकेच उपासनेलाही महत्त्व असते. आपली ईच्छा देवासमोर प्रगट करावी आणि ईच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. ईच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल, तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही, असे सांगितले जाते. (Shravan Sankashti Chaturthi 2023 Vrat Puja Vidhi In Marathi)

‘असे’ करा व्रत, गणपती बाप्पा करेल इच्छा पूर्ण!

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे.

बहुला चतुर्थी व्रत

या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन करणे शुभ मानले गेले आहे. हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात, दीर्घायुष्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते. या सर्व अद्भूत योगांमुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे सांगितले जात आहे. 

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ 

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून २३ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून २३ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून २० मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे
अहमदनगररात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून १३ मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून १० मिनिटे
वर्धारात्रौ ०८ वाजून ५७ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०९ वाजून ०० मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून ११ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून १८ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून ५५ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
अकोलारात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)रात्रौ ०९ वाजून १२ मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजता ०९ मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे
नांदेडरात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०९ वाजून १० मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून ५५ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०९ वाजून ०८ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून २३ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून २२ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून १९ मिनिटे
इंदौररात्रौ ०९ वाजून ०७ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे

 

 

Web Title: shravan sankashti chaturthi 2023 date time vrat vidhi puja significance and chandrodaya timing of sankashta chaturthi september 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.