श्रावण संकष्ट चतुर्थी: ‘हे’ उपाय अवश्य करा, वैभव-ऐश्वर्याचा लाभ; यश-समृद्धी, गणेश कृपा करेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 10:11 AM2024-08-19T10:11:09+5:302024-08-19T10:19:53+5:30
Shravan Sankashti Chaturthi 2024: कधी आहे श्रावण संकष्ट चतुर्थी? या दिवशी काही उपाय करणे शुभ लाभ फलदायी मानले गेले आहेत. जाणून घ्या...
Shravan Sankashti Chaturthi 2024: श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन झाले की, सर्वांना वेध लागतात, ते गणेशोत्सवाचे. श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाळा झाला की, गणपतीच्या तयारीला वेग येतो. गणेशोत्सवाच्या आधी येणारी श्रावणातील संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. यंदा श्रावणातील संकष्ट चतुर्थी गुरुवारी येत आहे. या दिवशी गणेशाच्या विशेष पूजनासह काही उपाय केल्यास त्याला उत्तम लाभ मिळू शकतो, गणपती बाप्पाची कृपा होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकते. प्रत्येक संकष्टीला भाविक आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण करीत असतात. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव असल्याचे म्हटले जाते. २२ ऑगस्ट २०२४ रोजी श्रावण संकष्ट चतुर्थी आहे.
संकष्ट चतुर्थीला कोणते उपाय करता येऊ शकतात?
गणपती बाप्पाचे पूजन, नामस्मरण करत असले तरी अनेकदा अनेक गोष्टींमध्ये अडचणी, अडथळे, समस्या येत असतात. प्रतत्न करूनही यश आणि प्रगती साध्य करता येत नाही. मेहनत केली जाते; परंतु, त्याचे यथायोग्य फळ मिळतेच असे नाही. अशा वेळी काही उपाय करावे, असा सल्ला दिला जातो. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्यास त्याचा लाभ होऊन सकारात्मक अनुकूलता अनुभवता येऊ शकते, असे सांगितले जाते.
- गणपतीला आवडणारी फुले आवर्जून अर्पण करावीत.
- राहु-केतुसह अन्य काही ग्रह दोष असल्याचे सांगितले असल्यास ‘ॐ दुर्मुखाय नमः’ या मंत्राचा १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा.
- यशप्राप्ती आणि प्रगतीसाठी गणपतीला ११ दुर्वांच्या ११ जुड्या अर्पण कराव्यात. २१ जुड्या अर्पण केल्या तर उत्तम.
- गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. म्हणता येणे शक्य नसेल तर मनोभावे श्रवण करावे.
- परीक्षेत, स्पर्धेत, अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण करावे. हे व्रत मनोभावे करावे.
- श्रावण हा महादेव शिवशंकरांना समर्पित असल्याचे मानले जाते. त्यामुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करण्यासह शिवपूजन आवर्जून करावे. गणपती शिवपुत्र मानला गेल्या असल्यामुळे शिवशंकर आणि गपणती बाप्पा दोघांचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
|||गणपती बाप्पा मोरया||