Shravan Shanivar 2021: श्रावणी शनिवारी ‘असे’ करा नृसिंह पूजन; जाणून घ्या, सोपी पद्धत, मान्यता आणि परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 05:45 PM2021-08-13T17:45:20+5:302021-08-13T17:46:12+5:30
Shravan Shanivar: श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन आणि नृसिंह पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. नृसिंह पूजनाची सोपी पद्धत, मान्यता जाणून घेऊया...
श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून, संपूर्ण महिनाभर विविध व्रते, सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने, भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आषाढ महिन्याच्या अमावास्येला दीपपूजनाने श्रावणाची सुरुवात केली जाते. याच दिवशी जिवतीचा कागद देवघरात चिकटवला जातो आणि त्याचे पूजन केले जाते. श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा यांनंतर प्रत्येक श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन आणि नृसिंह पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. नृसिंह पूजनाची सोपी पद्धत, मान्यता जाणून घेऊया... (narsimha puja vidhi on shravani shanivar)
देव-दानवांनी केलेले समुद्रमंथन भारतात नेमके कुठे झाले? पाहा, मान्यता आणि काही अद्भूत तथ्ये
जिवतीच्या कागदात प्रथम स्थान
श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी जिवतीचा कागद देवघरात चिकटवला जातो आणि त्याचे पूजन केले जाते. संपूर्ण श्रावण महिना जिवतीचा कागद मातृशक्तीकडून पूजला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केल्या जाते. यामधील एकही देवता किंवा त्यांचे स्थान आजतागायत बदललेली दिसत नाही. जिवतीच्या कागदात प्रथम विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्त प्रल्हादासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यांपासून संरक्षण करणे, याच मुख्य आणि मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह वा नृसिंह देवतेचे पूजन केले जाते. उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी यांसारख्या संकटांपासून नरसिंह देवता घरातील बाळाचा बचाव करतात, अशी मान्यता आहे.
श्रावणात जिवतीचा कागद का पूजला जातो? जाणून घ्या महत्त्व आणि नेमका भावार्थ
नृसिंह पूजनाची सोपी पद्धत
श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढावे. त्या चित्रावर तिळाच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे थेंब शिंपडून प्रोक्षण करावे. त्यानंतर साधी हळद, आंबेहळद, चंदन, लाल आणि निळी किंवा पिवळी फुले वाहून त्या चित्रातील नृसिंहाची पूजा करावी. कुंजरा नावाची पालेभाजी आणि तांदळाची खिचडी, असा नैवेद्य दाखवावा. सुखसंपत्ती आणि संततीसाठी नव्हे, पण प्रल्हादासाठी घेतलेल्या एका अवताराची आठवण म्हणून या व्रताकडे बघितले जावे, असे सांगितले जाते. प्रल्हादासाठी विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला. त्यावेळी तो खांबातून प्रगटला. त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा केली जाते. आजच्या काळात घरातील जागेच्या अडचणींमुळे एखाद्या खांबावर अथवा भिंतीवर असे चित्र रेखाटून वा चित्र लावून पूजा करणे शक्य नाही. दुष्टांच्या संहारासाठी देवाने घेतलेला हा आणखी एक अवतार! प्रल्हादाच्या जीवनाशी निगडित ‘होळी’ जशी सामूहिक पद्धतीने साजरी केली जाते, तशीच ही पूजादेखील कोणत्याही एका शनिवारी सामुदायिक पद्धतीने करावी, असे सांगितले गेले आहे. (shravani shanivar 2021 dates)
साडेसातीच्या त्रासाने त्रस्त असाल, तर श्रावण शनिवारी करा `शांतिप्रद शनिव्रत!'
श्रावण महिन्यातील आगामी शनिवार
श्रावण महिन्यातील दुसरा शनिवार - २१ ऑगस्ट २०२१
श्रावण महिन्यातील तिसरा शनिवार - २८ ऑगस्ट २०२१
श्रावण महिन्यातील चौथा शनिवार - ४ सप्टेंबर २०२१