Shravan Shanivar Vrat 2022: कुमारिकापूजनाप्रमाणे श्रावण शनिवारी करा हनुमंताच्या बालरूपाची पूजा; कशी ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 07:20 PM2022-08-12T19:20:39+5:302022-08-12T19:21:41+5:30

Shravan 2022: कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय होणारे आणि भरपूर पुण्य देणारे हे व्रत तुम्हीसुद्धा सहज करू शकता!

Shravan Shanivar Vrat 2022: Worship Hanuman's child form on Shravan Saturday like Kumarika Puja; Learn how! | Shravan Shanivar Vrat 2022: कुमारिकापूजनाप्रमाणे श्रावण शनिवारी करा हनुमंताच्या बालरूपाची पूजा; कशी ते जाणून घ्या!

Shravan Shanivar Vrat 2022: कुमारिकापूजनाप्रमाणे श्रावण शनिवारी करा हनुमंताच्या बालरूपाची पूजा; कशी ते जाणून घ्या!

Next

शनिवार हा मारुती रायाचा वार. श्रावणात प्रत्येक दिवसाला जसे महत्त्व असते, तसे श्रावण शनिवारालाही आहे. या दिवशी घरातल्या तसेच ओळखीतल्या लहान मुलांना जमवून त्यांची पूजा केली जाते. ही पूजा हनुमंताच्या बालरूपाची समजली जाते. या पूजेचा विधी, नैवेद्य आणि महत्त्व जाणून घेऊ. 

हनुमंतांनी जन्मतः पराक्रम गाजवत सूर्य बिंब गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला.  पवन देवांची कृपा म्हणून तो वाचला अन्यथा काहीतरी आगळीक झाली असती. हनुमंताप्रमाणे प्रत्येक मूल बालपणी अशा खोड्या, उनाडक्या करत असते. मात्र वयोमानानुसार बदल घडत गेले की मुलांची समज वाढत जाते आणि उनाडपणा कमी होत जातो. बालपणीच मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला तर मोठेपणी तेदेखील हनुमंतासारखा भीम पराक्रम गाजवू शकतील, म्हणून श्रावण शनिवारच्या निमित्ताने त्यांचं कोड कौतुक करण्याची ही संधी शास्त्राने आखून दिली आहे. ती पाहता धर्मशास्त्राबद्दल कुतूहल आणि आदर वाढतो हे निश्चित! इथे प्रत्येक नात्याचा, वयोगटाचा, स्त्री-पुरुष समानतेचा विचार करून वेगवेगळ्या व्रत वैकल्यांची आखणी केली आहे. 

पूजा विधी : 

पूजा शब्द ऐकल्याने तुमच्या मनात हनुमंताचे प्रतिमा पूजन ही कल्पना येईल. मात्र वर उल्लेख केल्याप्रमाणे या व्रतामध्ये  बाळ गोपाळांमध्ये हनुमंत पाहून त्याचे औक्षण करायचे आहे. पूर्वीच्या काळी या व्रतासाठी मुलांना सकाळीच घरी बोलावून, त्यांच्या डोक्यावर तेल थापून, सुगंधी स्नान घातले जाई. मग औक्षण करून त्यांना एखादी भेटवस्तू दिली जाई. मात्र अलीकडे मुलांना कमी वयात जास्त समज आल्याने ती लाजतात. त्यावर पर्याय म्हणून मुलांना बोलवावे आणि नुसते केसांना तेलपाणी करावे. त्यांना आवडेल आणि उपयोगी पडेल अशी भेटवस्तू द्यावी. 

नैवेद्य: 

या दिवशी हिरव्या मुगाची खिचडी, कढी, पापड, लोणचे आणि एखादा गोड पदार्थ असा सर्वांना आवडणारा सुटसुटीत मेन्यू नैवेद्याला असतो. त्यामुळे अतिरिक्त खर्चाचा प्रश्न येत नाही. या छोट्याशा कौटुंबिक सोहळ्याने बाल हनुमान तृप्त झाला तर मोठ्या हनुमंताची कृपा व्हायलाही वेळ लागत नाही. 

अशा व्रताच्या निमित्ताने नव्या जुन्या पिढीमध्ये संवाद निर्माण होणे, संस्कृतीची देवाण घेवाण होणे, चिरंतर स्मृतीत राहतील अशा आठवणी तयार करणे आणि आपल्या देवी देवतांचे तेजस्वी ओजस्वी चरित्र अप्रत्यक्षरीत्या पुढच्या पिढीसमोर ठेवणे एवढा साधा या व्रताचा हेतू असतो!

Web Title: Shravan Shanivar Vrat 2022: Worship Hanuman's child form on Shravan Saturday like Kumarika Puja; Learn how!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.